YouVersion Logo
Search Icon

याकोब 1:2-12

याकोब 1:2-12 MARVBSI

माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हांला तोंड द्यावे लागते तेव्हा तुम्ही आनंदच माना. तुम्हांला ठाऊक आहे की, तुमच्या विश्वासाच्या परीक्षेने धीर उत्पन्न होतो; आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, ह्यासाठी की, तुम्ही कशातही उणे न होता तुम्हांला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी. जर तुमच्यापैकी कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने ते देवाजवळ मागावे म्हणजे ते त्याला मिळेल; कारण तो कोणास दोष न लावता सर्वांना उदारपणे देणग्या देतो; पण त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे; कारण संशय धरणारा वार्‍याने लोटलेल्या व उचंबळलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे. असा माणूस द्विबुद्धीचा असून आपल्या सर्व कार्यांत चंचल असतो. आपल्याला प्रभूपासून काही मिळेल असे त्याने समजू नये. दीन स्थितीतील बंधूने आपल्या उच्च स्थितीविषयी अभिमान बाळगावा, आणि धनवानाने आपल्या दीन स्थितीविषयी अभिमान बाळगावा; कारण तो ‘गवताच्या फुलासारखा’ नाहीसा होईल. सूर्य तीव्र तेजाने उगवला व त्याने ‘गवत कोमेजवले, मग त्याचे फूल गळाले,’ आणि त्याच्या रूपाची शोभा गेली; ह्याप्रमाणे धनवानही आपल्या उद्योगाच्या भरात कोमेजून जाईल. जो माणूस परीक्षेत ‘टिकतो तो धन्य,’ कारण आपणावर प्रीती करणार्‍यांना प्रभूने देऊ केलेला जीवनाचा मुकुट, परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळेल.