यशया 58
58
उपासांचे योग्य पालन
1“कंठरव कर, कसर करू नकोस; आपला स्वर कर्ण्याप्रमाणे मोठा कर; माझ्या लोकांना त्यांचे अपराध, याकोबाच्या घराण्यास त्याची पातके विदित कर.
2ते तर रोजरोज माझ्याकडे येतात, माझे मार्ग ते जाणू इच्छितात; नीतीचे आचरण करणार्या व आपल्या देवाचे नियमशास्त्र न सोडणार्या राष्ट्राप्रमाणे ते माझ्याजवळ रास्त निर्णय मागतात; देवाची समीपता ते इच्छितात.
3‘आम्ही उपास करतो ते तू का पाहत नाहीस? आम्ही आपल्या जिवास पीडा देतो ती तू का लक्षात आणत नाहीस?’ “पाहा, आपल्या उपासाच्या दिवशी तुम्ही आपले कामकाज चालवता, तुम्ही आपल्या सर्व मजुरांकडून काबाडकष्ट करवता.
4पाहा, तुमच्या उपासांचा परिणाम तर असा होतो की तुम्ही त्या वेळी कटकटी करता व दुष्टपणाने ठोसाठोशी करता; तुमचा शब्द उर्ध्वलोकी ऐकू जावा ह्यासाठी तुमचे हल्लीचे उपास आहेत असे नाही.
5मला पसंत पडणारा असा हा उपास आहे काय? मनुष्याच्या जिवास पीडा व्हावी असा हा तुमचा उपासाचा दिवस आहे काय? लव्हाळ्यासारखे आपले डोके लववणे आणि आपल्या अंगाखाली गोणपाट व राख पसरणे ह्याला उपास म्हणतोस काय? आणि असा दिवस परमेश्वराला मान्य होईल काय?
6दुष्टतेच्या बेड्या तोडाव्यात, जुवाच्या दोर्या सोडाव्यात, जाचलेल्यांना मुक्त करावे, सगळे जोखड मोडावे, हाच मला पसंत असा उपास नव्हे काय?
7तू आपले अन्न भुकेल्यांना वाटावे; तू लाचारांना व निराश्रितांना आपल्या घरी न्यावे; उघडा दृष्टीस पडल्यास त्याला वस्त्र द्यावे; तू आपल्या बांधवाला तोंड लपवू नये हाच तो उपास नव्हे काय?
8असे करशील तर तुझा प्रकाश प्रभातेप्रमाणे फाकेल, तुझी जखम लवकर भरेल, तुझी नीतिमत्ता तुझ्यापुढे चालेल व परमेश्वराचा गौरव तुझा पाठीराखा होईल.
9तेव्हा तू हाक मारशील ती परमेश्वर ऐकेल; तू धावा करशील तेव्हा तो म्हणेल, हा मी आहे. जर तू आपल्यामधून जोखड लादण्याचे सोडून देशील, बोट दाखवण्याचे व दुष्ट गोष्टी बोलण्याचे टाकून देशील;
10जर तू आपल्या जिवाला इष्ट ते भुकेल्यांना देशील, दुःखग्रस्त जिवांना तृप्त करशील; तर तुझा प्रकाश अंधकारात झळकेल, निबिड अंधकार तुला मध्यान्हाचे तेज असा होईल,
11परमेश्वर तुझा सततचा मार्गदर्शक होईल, तो अवर्षणसमयी तुझ्या जिवास तृप्त करील, तुझ्या हाडांना मजबूत करील; तू भरपूर पाणी दिलेल्या मळ्यांप्रमाणे होशील; पाणी कधी न आटणार्या झर्याप्रमाणे होशील,
12बहुत काळ मोडून पडलेली शहरे तुझे लोक पुन्हा बांधतील; पूर्वीच्या पिढ्यांनी घातलेले पाये तू पुन्हा उभारशील; मोडतोडीचा जीर्णोद्धार करणारा, वस्ती होण्यासाठी रस्त्यांची दुरुस्ती करणारा, असे तुझे नाव पडेल.
शब्बाथाचे पालन
13तू शब्बाथाची पायमल्ली करणार नाहीस, माझ्या पवित्र दिवशी आपला उद्योगधंदा करणार नाहीस, शब्बाथ आनंददिन आहे, परमेश्वराचा पवित्र व सन्मान्य दिन आहे असे म्हणून त्याचा आदर करशील; व त्या दिवशी आपले कामकाज करणार नाहीस, आपला धंदा चालवणार नाहीस, वायफळ गोष्टी बोलत बसणार नाहीस;
14तर तू परमेश्वराच्या ठायी हर्ष पावशील; तू देशाच्या उच्च स्थलांचे जयोत्साहाने आक्रमण करशील, असे मी करीन; आणि तुझा पिता याकोब ह्याच्या वतनाचा तुला उपभोग घेऊ देईन; परमेश्वराच्या तोंडचे हे शब्द आहेत.”
Currently Selected:
यशया 58: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.