YouVersion Logo
Search Icon

यशया 56

56
देवाचा करार पाळण्याबद्दल मिळणारे पारितोषिक
1परमेश्वर म्हणतो, “न्यायाचे पालन करा, नीतीचे आचरण करा; कारण माझे तारण जवळ आले आहे. माझे न्याय्यत्व प्रकट होण्यास आले आहे.
2जो मानव हे करतो व जो मानवपुत्र ह्याला धरून राहतो, जो शब्बाथ पाळतो, काही अपवित्र करीत नाही, जो कोणतेही दुष्कर्म करण्यापासून आपला हात आवरतो तो धन्य!”
3जो विदेशी परमेश्वरचरणी जडला आहे तो असे न म्हणो की, “परमेश्वर आपल्या लोकांतून माझा उच्छेद करील;” आणि षंढही न म्हणो की, “मी केवळ शुष्क वृक्ष आहे.”
4कारण परमेश्वर म्हणतो, “जे षंढ माझे शब्बाथ पाळतात, मला आवडणार्‍या गोष्टी पसंत करतात व माझ्या करारास दृढ धरून राहतात,
5त्यांचे माझ्या गृहात व माझ्या कोटाच्या आत कन्यापुत्रांहून श्रेष्ठ असे स्मारक मी स्थापीन व त्यांचे नाव राखीन; सर्वकाळ राहील असे त्यांचे नाव मी करीन, ते नाहीसे होणार नाही.
6तसेच परमेश्वराची सेवा करण्यासाठी, त्याच्या नामाची आवड धरण्यासाठी व त्याचे सेवक होण्यासाठी जे विदेशी त्याच्या चरणी जडले आहेत, त्यांतील जे कोणी शब्बाथ अपवित्र न करावा म्हणून जपतात व माझा करार दृढ धरून राहतात,
7त्यांना मी आपल्या पवित्र पर्वतावर आणीन आणि माझ्या प्रार्थनामंदिरात त्यांना हर्षित करीन; माझ्या वेदीवर केलेले त्यांचे होम व यज्ञ मला पसंत होतील; कारण माझे मंदिर हे सर्व राष्ट्रांसाठी प्रार्थनामंदिर आहे असे म्हणतील.
8घालवून दिलेल्या इस्राएल लोकांस एकत्र करणार्‍या प्रभू परमेश्वराचे हे वचन आहे की एकत्र केलेल्या इस्राएलांखेरीज इतरांनाही एकत्र करून मी त्यांच्यात मिळवीन.”
मूर्तिपूजेबद्दल इस्राएलाचा निषेध
9रानातील सर्व पशूंनो, वनातील सर्व पशूंनो, या, खाऊन टाकण्यास या.
10त्याचे जागल्ये आंधळे आहेत, ते सगळे ज्ञानशून्य आहेत; ते सगळे मुके कुत्रे आहेत, त्यांना भुंकता येत नाही; ते बरळणारे, पडून राहणारे, निद्राप्रिय असे आहेत.
11ते अधाशी कुत्रे आहेत; त्यांना तृप्ती कशी ती ठाऊक नाही; ते मेंढपाळ ज्ञानशून्य आहेत; चोहोकडून आपला स्वार्थ साधण्यासाठी ते एकंदर आपापल्या मार्गास लागले आहेत.
12ते म्हणतात, “चला, या, मी द्राक्षारस घेऊन येतो; आपण मद्याने मस्त होऊ; आजच्यासारखा उद्याचा दिवस होईल, तो अतिशय चैनीचा होईल.”

Currently Selected:

यशया 56: MARVBSI

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in