यशया 54
54
परमेश्वराची इस्राएलावरील शाश्वत प्रीती
1“मूल न झालेल्या वंध्ये, आनंदाने गजर कर; ज्या तुला प्रसूतिवेदना माहीत नाहीत ती तू आनंदाने जयघोष कर, आनंदाची आरोळी मार; कारण विवाहित स्त्रीच्या मुलांपेक्षा सोडलेल्या स्त्रीची मुले पुष्कळ आहेत असे परमेश्वर म्हणतो.
2आपल्या डेर्यांची जागा वाढव, आपल्या राहुट्यांच्या कनाथी पसरू दे; अटकाव करू नकोस; आपल्या दोर्या लांब कर, मेखा पक्क्या ठोक.
3कारण उजवीकडे व डावीकडे तुझा विस्तार होईल; तुझे संतान राष्ट्रांवर ताबा करील; व उजाड झालेली नगरे वसवील.
4भिऊ नकोस, तू लज्जित होणार नाहीस; घाबरू नकोस, तू फजीत होणार नाहीस; तुझ्या तारुण्यातील अप्रतिष्ठेचा तुला विसर पडेल; तुला आपल्या वैधव्याच्या बट्ट्याचे स्मरण ह्यापुढे होणार नाही.
5कारण तुझा निर्माणकर्ता तुझा पती आहे; सेनाधीश परमेश्वर हे त्याचे नाम; इस्राएलाचा पवित्र प्रभू तुझा उद्धारकर्ता आहे; त्याला सर्व पृथ्वीचा देव म्हणतात.
6सोडलेल्या व दुःखित मनाच्या स्त्रीप्रमाणे तुला परमेश्वर बोलावत आहे, तरुणपणी टाकलेल्या स्त्रीप्रमाणे तुला परमेश्वर बोलावत आहे, असे तुझा देव म्हणतो.
7केवळ क्षणभर मी तुला सोडले, तरी मोठ्या करुणेने मी तुला जवळ करीन.
8रागाच्या आवेशात मी आपले तोंड तुझ्यापासून क्षणभर लपवले; पण मी तुझ्यावर दया करीन, तुझ्यावर मी सर्वकाळ प्रसन्न राहीन असे तुझा उद्धारकर्ता परमेश्वर म्हणतो.
9नोहाच्या जलप्रलयाप्रमाणे हे मी लेखतो; नोहाचा जलप्रलय भूमीवर पुनरपि येणार नाही अशी मी शपथ वाहिली होती त्याप्रमाणे तुझ्यावर कोप करणार नाही, तुला दटावणार नाही अशी शपथ मी वाहिली आहे.
10कारण पर्वत दृष्टिआड होतील, टेकड्या ढळतील, परंतु माझी तुझ्यावरची दया ढळणार नाही; माझा शांतीचा करार हलणार नाही, असे तुझ्यावर करुणा करणारा परमेश्वर म्हणतो.
नवी यरुशलेम
11अगे पिडलेले, वादळांनी त्रस्त झालेले, सांत्वन न पावलेले, मी तुझे पाषाण सुरम्य प्रकारे बसवीन आणि नीलमण्यांनी तुझा पाया घालीन.
12तुझ्या भिंतीवरील कळस माणकांचे, तुझ्या वेशी लालांच्या, तुझ्या भोवतालचा प्रदेश रत्नखचित करीन.
13तुझी सर्व मुले परमेश्वरापासून शिक्षण पावतील; तुझ्या मुलांना मोठी शांती प्राप्त होईल.
14नीतिमत्तेने तू खंबीर होशील, जाचापासून दूर राहशील, कारण तुला भीतीच उरणार नाही; तू धाकापासून दूर राहशील, तो तुझ्याजवळ येणार नाही;
15पाहा, तुझ्यावर गर्दी झाली ती माझ्याकडून झाली नाही; तुझ्यावर कोण गर्दी करतो? जो करील तो तुझ्यामुळे पडेल.
16पाहा, लोहार विस्तव फुंकून आपल्या कामाला पाहिजे तसे हत्यार घडतो, त्याला मी उत्पन्न केले आहे; विध्वंस करण्यासाठी विध्वंसकही मी उत्पन्न केला आहे.
17तुझ्यावर चालवण्यासाठी घडलेले कोणतेही हत्यार तुझ्यावर चालणार नाही; तुझ्यावर आरोप ठेवणार्या सर्व जिव्हांना तू दोषी ठरवशील. परमेश्वराच्या सेवकांचे हेच वतन आहे, हीच माझ्याकडून मिळालेली त्यांची नीतिमत्ता आहे, असे परमेश्वर म्हणतो.”
Currently Selected:
यशया 54: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.