इब्री 9
9
जुने पवित्रस्थान नव्या पवित्रस्थानाचे दर्शक आहे
1पहिल्या करारातही उपासनेचे विधी होते व पवित्रस्थान होते; पण ते पृथ्वीवरचे होते.
2कारण पहिला मंडप तयार केलेला होता त्यात दीपवृक्ष, मेज व समर्पित भाकरी होत्या; त्याला पवित्रस्थान म्हटले आहे.
3आणि दुसर्या पडद्याच्या पलीकडे परमपवित्रस्थान म्हटलेला मंडप होता;
4त्यात सोन्याचे धुपाटणे व सोन्याने चहूबाजूंनी मढवलेला कराराचा कोश होता; ह्या कोशात मान्ना ठेवलेले सुवर्णपात्र, कळ्या आलेली अहरोनाची काठी व कराराच्या पाट्या होत्या;
5आणि त्याच्यावरचे गौरवशाली करूबीम दयासनावर छाया करत होते; ह्यांविषयी आता सविस्तर सांगत नाही.
6ह्या वस्तूंची अशी व्यवस्था केलेली असता याजक उपासना करण्यास पहिल्या मंडपात नित्य जात असतात;
7परंतु दुसर्यात प्रमुख याजक एकटाच वर्षातून एकदा जात असतो तेव्हा स्वतःबद्दल व लोकांच्या अज्ञानाने झालेल्या पापांबद्दल1 जे रक्त अर्पण करत असतो, ते घेतल्याशिवाय जात नाही.
8तेणेकरून पवित्र आत्मा दर्शवतो की, पहिला मंडप उभा आहे तोपर्यंत परमपवित्रस्थानाची वाट प्रकट झाली असे नाही.2
9तो मंडप वर्तमानकाळी दृष्टान्तरूप आहे; त्याच्या व्यवस्थेप्रमाणे उपासकाचा विवेकभाव पूर्ण करण्यास समर्थ नाहीत अशी दाने व यज्ञ अर्पण करण्यात येतात.
10खाणे, पिणे, नाना प्रकारची क्षालने ह्यांसह ती अर्पणे, केवळ दैहिक विधी आहेत; ते सुधारणुकीच्या काळापर्यंत लावून दिले आहेत.
ख्रिस्ताने केलेल्या स्वार्पणाच्या ठायी असलेले शुद्धिकारक सामर्थ्य
11ख्रिस्त हा पुढे होणार्या चांगल्या गोष्टींसंबंधी प्रमुख याजक होऊन आला व जो हातांनी केलेला नाही, म्हणजे ह्या सृष्टीतला नाही अशा अधिक श्रेष्ठ व पूर्ण मंडपातून,
12आणि बकरे व वासरे ह्यांचे नव्हे, तर स्वत:चे रक्त अर्पण करून एकदाच परमपवित्रस्थानात गेला, आणि त्याने सार्वकालिक मुक्ती मिळवली.
13कारण बकर्यांचे व बैलांचे रक्त आणि कालवडीची राख ही अशुद्ध झालेल्यांवर शिंपडल्याने जर देहाची शुद्धी होईल इतके पवित्र करतात,
14तर सार्वकालिक आत्म्याच्या योगे ज्याने निष्कलंक अशा स्वतःस देवाला अर्पण केले, त्या ख्रिस्ताचे रक्त आपली सदसद्विवेकबुद्धी जिवंत देवाच्या सेवेसाठी निर्जीव कृत्यांपासून किती विशेषेकरून शुद्ध करील?
15आणि तो नव्या कराराचा मध्यस्थ ह्याचकरता आहे की, पहिल्या कराराखाली झालेल्या उल्लंघनापासून खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती होण्यासाठी मृत्यू झाल्याने, सार्वकालिक वारशाचे अभिवचन पाचारण झालेल्यांना मिळावे.
16कारण मृत्युपत्र असले की मृत्युपत्रकर्त्याचा मृत्यू सिद्ध होणे अवश्य आहे.
17मृत्यू झाल्यावर मृत्युपत्र अंमलात येते; कारण मृत्युपत्र-कर्ता हयात आहे तोपर्यंत ते कधी अंमलात यायचे नाही.
18म्हणून पहिल्या कराराचीही स्थापना रक्तावाचून झाली नाही.
19नियमशास्त्राप्रमाणे सर्व आज्ञा सर्व लोकांना सांगितल्यावर मोशेने पाणी, किरमिजी लोकर व एजोब वनस्पती व त्यांबरोबर वासरांचे व बकर्यांचे रक्त घेऊन ग्रंथावर व सर्व लोकांवरही सिंचन करत म्हटले,
20“परमेश्वराने जो करार तुम्हांला आज्ञापिला
त्याचे हे रक्त आहे.”
21आणि तसेच त्याने मंडप व सेवेची सर्व पात्रे ह्यांवरही रक्त शिंपडले.
22नियमशास्त्राप्रमाणे रक्ताने बहुतेक सर्वकाही शुद्ध होते, आणि रक्त ओतल्यावाचून पापक्षमा होत नाही.
ख्रिस्ताच्या स्वार्पणाचे अनन्यत्व
23ह्याप्रमाणे स्वर्गातील गोष्टींचे नमुने अशाने शुद्ध होणे अवश्य होते; प्रत्यक्ष स्वर्गीय गोष्टी तर ह्यांहून चांगल्या यज्ञांनी शुद्ध होणे अवश्य होते.
24खर्या गोष्टींचे प्रतिरूप म्हणजे हातांनी केलेले पवित्रस्थान ह्यात ख्रिस्त गेला नाही, तर आपल्यासाठी देवासमोर उभे राहण्यास प्रत्यक्ष स्वर्गात गेला.
25आणि जसा प्रमुख याजक प्रतिवर्षी स्वतःचे नसलेले रक्त घेऊन परमपवित्रस्थानात जातो, तसे त्याला वारंवार स्वतःचे अर्पण करायचे नव्हते;
26तसे असते तर जगाच्या स्थापनेपासून त्याला वारंवार दुःख सोसावे लागले असते; पण आता तो एकदाच युगाच्या समाप्तीस आत्मयज्ञ करून पापे नाहीशी करण्यासाठी प्रकट झाला आहे.
27ज्या अर्थी माणसांना एकदाच मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे,
28त्या अर्थी ख्रिस्त ‘पुष्कळांची पापे स्वतःवर घेण्यासाठी’ एकदाच अर्पण केला गेला, आणि जे त्याची वाट पाहतात त्यांना पापसंबंधात नव्हे तर तारणासाठी तो दुसर्यांदा दिसेल.
Currently Selected:
इब्री 9: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.