YouVersion Logo
Search Icon

इब्री 11:1-19

इब्री 11:1-19 MARVBSI

विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरवसा आणि न दिसणार्‍या गोष्टींबद्दलची खातरी आहे. विश्वासाच्या बाबतीत पूर्वजांविषयी साक्ष देण्यात आली होती. विश्वासाने आपल्याला कळते की, देवाच्या शब्दाने विश्वाची रचना झाली, अशी की, जे दिसते ते दृश्य वस्तूंपासून झाले नाही. विश्वासाने हाबेलाने काइनापेक्षा अधिक चांगला यज्ञ देवाला केला, तेणेकरून तो नीतिमान आहे अशी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली. ती साक्ष ‘देवाने दानाच्या वेळी’ दिली; आणि तो मेला असूनही त्या विश्वासाच्या द्वारे अद्यापि बोलत आहे. हनोखाला मरणाचा अनुभव येऊ नये म्हणून त्याला विश्वासाने लोकांतरी नेण्यात आले, आणि ‘तो सापडला’ नाही; ‘कारण त्याला देवाने लोकांतरी नेले;’ लोकांतर होण्यापूर्वी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली की, ‘तो देवाला संतोषवीत असे;’ आणि विश्वासावाचून त्याला ‘संतोषवणे’ अशक्य आहे; कारण देवाजवळ जाणार्‍याने असा विश्वास ठेवला पाहिजे की, तो आहे, आणि त्याचा शोध झटून करणार्‍यांना तो प्रतिफळ देणारा आहे. तोपर्यंत जे पाहण्यात आले नव्हते त्याविषयी नोहाला सूचना मिळाली आणि आदरयुक्त भयाने त्याने आपल्या कुटुंबाच्या तारणासाठी विश्वासाने तारू तयार केले; त्या विश्वासाच्या द्वारे त्याने जगाला दोषी ठरवले, आणि विश्वासाने प्राप्त होणारे जे नीतिमत्त्व त्याचा तो वतनदार झाला. अब्राहामाला पाचारण झाल्यावर जे ठिकाण त्याला वतनादाखल मिळणार होते तिकडे ‘निघून जाण्यास’ तो विश्वासाने मान्य झाला; आणि आपण कोठे जातो हे ठाऊक नसताही ‘तो निघून गेला.’ परदेशात राहावे त्याप्रमाणे तो वचनदत्त देशात विश्वासाने ‘जाऊन राहिला;’ त्याच वचनाचे सहभागी वारस इसहाक व याकोब ह्यांच्याबरोबर डेर्‍यात त्याची वस्ती होती. कारण पाये असलेल्या व देवाने योजलेल्या व बांधलेल्या नगराची तो वाट पाहत होता. वयोमर्यादेपलीकडे असताही सारेलादेखील विश्वासाने गर्भधारणेची शक्ती मिळाली [व ती संतान प्रसवली], कारण तिने वचन देणार्‍यास विश्वसनीय मानले. त्यामुळे एकापासून, आणि त्याही निर्जीव झालेल्यापासून, संख्येने ‘आकाशातल्या तार्‍यांइतकी, व समुद्रतीरावरील वाळूइतकी अगणित’ संतती निर्माण झाली. हे सर्व जण विश्वासात टिकून मेले; त्यांना वचनानुसार फलप्राप्ती झाली नव्हती, तर त्यांनी ती दुरून पाहिली व तिला वंदन केले आणि आपण ‘पृथ्वीवर परके व प्रवासी’ आहोत असे पत्करले. असे म्हणणारे आपण स्वतःच्या देशाचा शोध करत असल्याचे दाखवतात. ज्या देशातून ते निघाले होते त्या देशाला उद्देशून हे म्हणणे असते तर त्यांना परत जाण्याची संधी होती. पण आता ते अधिक चांगल्या देशाची म्हणजे स्वर्गीय देशाची उत्कंठा धरतात; ह्यामुळे आपणाला त्यांचा देव म्हणवून घ्यायला देवाला त्यांची लाज वाटत नाही; कारण त्याने त्यांच्यासाठी नगर तयार केले आहे. ‘अब्राहामाने आपली परीक्षा होत असता विश्वासाने इसहाकाचे अर्पण केले;’ ज्याने वचने स्वीकारली होती तो आपल्या ‘एकुलत्या एक पुत्राचे’ अर्पण करत होता; त्याला असे सांगितले होते की, “इसहाकाच्याच वंशाला तुझे संतान म्हणतील.” तेव्हा मेलेल्यांतूनदेखील उठवण्यास देव समर्थ आहे, हे त्याने मानले आणि त्या स्थितीतून लाक्षणिक अर्थाने तो त्याला परत मिळाला.