हबक्कूक 3
3
हबक्कूकची प्रार्थना
1हबक्कूक संदेष्ट्याची प्रार्थना म्हणजे क्षोभस्तोत्र :
2हे परमेश्वरा, मी तुझी कीर्ती ऐकून भयभीत झालो आहे. हे परमेश्वरा, वर्षाचा क्रम चालू असता आपल्या कामाचे पुनरुज्जीवन कर. वर्षाचा क्रम चालू असता ते प्रकट कर, क्रोधातही दया स्मर.
3देव तेमानाहून येत आहे, पवित्र प्रभू पारानाच्या पर्वतावरून येत आहे.(सेला) त्याचा प्रकाश आकाश व्यापतो; त्याच्या स्तवनांनी पृथ्वी भरली आहे.
4त्याचे तेज प्रकाशासारखे आहे; त्याच्या हातांतून किरण निघत आहेत; त्याचा पराक्रम तेथे गुप्त आहे.
5मरी त्याच्यापुढे चालते, जळते इंगळ त्याच्या पायांजवळ निघतात.
6तो उभा राहिला म्हणजे पृथ्वी हेलकावे खाते; तो नजर टाकून राष्ट्रांना उधळून लावतो. सर्वकाळचे पर्वत विदीर्ण होतात, युगानुयुगीचे डोंगर ढासळतात, त्याचा हा पूर्वकाळापासून प्रघात आहे.
7कूशानाचे डेरे विपत्तीने घेरलेले मी पाहिले; मिद्यान देशाच्या कनाती थरथरत आहेत.
8परमेश्वर नद्यांवर रागावला आहे काय? नद्यांवर तुझा राग पेटला आहे काय? तुझा क्रोध समुद्रावर खवळला आहे काय? म्हणूनच तू आपल्या घोड्यांवर स्वार झालास काय?
9तुझे धनुष्य गवसणीबाहेर निघाले आहे. तू आपल्या शपथपूर्वक वचनाप्रमाणे शिक्षा केली आहे. (सेला) तू पृथ्वी विदारून नद्या वाहवतोस.
10पर्वत तुला पाहून विव्हळतात; जलप्रवाह सपाट्याने चालला आहे, डोह आपला शब्द उच्चारतो, आपले हात वर करतो.
11तुझे बाण सुटत असता त्यांच्या प्रकाशाने, तुझ्या झळकणार्या भाल्याच्या चकाकीने, सूर्य व चंद्र आपल्या स्थानी निश्चल झाले आहेत.
12तू संतापून पृथ्वीवर चालतोस, तू आपल्या क्रोधाने राष्ट्रांना तुडवून टाकतोस,
13तू आपल्या लोकांच्या सुटकेसाठी निघाला आहेस. आपल्या अभिषिक्ताच्या सुटकेसाठी निघाला आहेस; तू दुर्जनांचे घर पायापासून मानेपर्यंत उघडे करतोस, त्याच्या शिराचे आपटून तुकडे करतोस. (सेला)
14त्याच्या सरदारांचे शीर तू ज्याच्या-त्याच्याच भाल्यांनी विंधतोस; माझा चुराडा करण्यासाठी ते माझ्यावर तुफानासारखे लोटले; गरिबांना गुप्तरूपे गिळावे ह्यातच त्यांना संतोष वाटतो.
15तू आपले घोडे समुद्रातून, महाजलांच्या राशीवरून चालवतोस.
16मी हे ऐकले तेव्हा माझे काळीज थरथरले, त्याच्या आवाजाने माझे ओठ कापले; माझी हाडे सडू लागली; माझे पाय लटपटत आहेत; ज्या दिवशी लोकांवर हल्ला करणारा येईल, त्या संकटाच्या दिवसाची मला वाट पाहिली पाहिजे.
17अंजिराचे झाड न फुलले, द्राक्षीच्या वेलीस फळ न आले, जैतुनाचे उत्पन्न बुडाले, शेतात धान्य न पिकले, मेंढवाड्यातील कळप नाहीतसे झाले, व गोठ्यात गुरेढोरे न उरली,
18तरी मी परमेश्वराच्या ठायी हर्ष पावेन, मला तारण देणार्या देवाविषयी मी उल्लास करीन.
19परमेश्वर प्रभू माझे सामर्थ्य आहे, तो माझे पाय हरणाच्या पायांसारखे करतो, तो मला माझ्या उच्च स्थानांवरून चालू देतो.
[मुख्य गवयासाठी, माझ्या तंतुवाद्यांच्या साथीने गावयाचे]
Currently Selected:
हबक्कूक 3: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.