YouVersion Logo
Search Icon

उत्पत्ती 50

50
1मग योसेफ आपल्या बापाच्या तोंडाशी तोंड लावून रडला आणि त्याने त्याचे चुंबन घेतले.
2योसेफाने आपल्या सेवकांतील वैद्यांना आपल्या बापाच्या प्रेतात मसाला भरण्याची आज्ञा केली; त्याप्रमाणे त्या वैद्यांनी इस्राएलाच्या प्रेतात मसाला भरला.
3ह्या कामाला चाळीस दिवस लागले; प्रेतात मसाला भरायला इतके दिवस लागत असत; आणि मिसरी लोकांनी सत्तर दिवस त्याच्यासाठी शोक केला.
4शोकाचे दिवस संपल्यावर योसेफ फारोच्या घराण्यातल्या लोकांना म्हणाला, “तुमची कृपादृष्टी माझ्यावर असेल तर फारोच्या कानावर एवढे घाला की, 5माझ्या बापाने माझ्याकडून आणभाक घेऊन म्हटले की, ‘पाहा, मी आता मरणार; तर कनान देशात जी कबर मी आपल्यासाठी खोदवून घेतली आहे तिच्यात मला नेऊन मूठमाती दे.’ मला तिकडे जाऊन माझ्या बापाला पुरू द्यावे. मी परत येईन.”
6फारो म्हणाला, “जा, तुमच्या बापाने तुमच्याकडून आणभाक घेतल्याप्रमाणे त्याला मूठमाती द्या.”
7मग योसेफ आपल्या बापाला मूठमाती देण्यास निघून गेला, आणि फारोचे सर्व सेवक, त्याच्या घराण्यांतले वडील जन व मिसर देशातले सर्व वडील जन,
8योसेफाच्या घरचे सर्व लोक त्याचे भाऊ आणि त्याच्या बापाच्या घरचे लोक त्याच्याबरोबर गेले; आपली मुलेबाळे, शेरडेमेंढरे, गुरेढोरे ही मात्र त्यांनी गोशेन प्रांतातच मागे ठेवली.
9त्याच्याबरोबर रथ व स्वार गेले; असा तो मोठा समुदाय निघाला.
10यार्देनेपलीकडे अटादाच्या खळ्याजवळ ते आले तेव्हा त्यांनी तेथे फार आकांत करून मोठा विलाप केला; योसेफाने तेथे आपल्या बापासाठी फार आकांत करून सात दिवस शोक केला.
11देशातले रहिवासी कनानी ह्यांनी तो शोक पाहिला तेव्हा ते म्हणाले, ‘हा मिसरी लोकांचा भारी शोक आहे;’ त्यावरून त्या ठिकाणाचे नाव आबेल-मिस्राईम (मिसराचा शोक) पडले; ते यार्देनेपलीकडे आहे.
12इस्राएलाने आपल्या मुलांना आज्ञा केली होती त्याप्रमाणे त्यांनी केले;
13त्यांनी त्याला कनान देशात नेऊन मम्रेसमोरील मकपेला नावाच्या शेतातील गुहेत मूठमाती दिली; अब्राहामाने एफ्रोन हित्तीकडून आपल्या मालकीचे कबरस्तान व्हावे म्हणून शेतासह विकत घेतली होती तीच ही गुहा.
14योसेफाने आपल्या बापाला मूठमाती दिल्यावर तो, त्याचे भाऊ व त्याच्या बापाच्या मूठमातीसाठी त्याच्या-बरोबर गेले होते ते सर्व मिसर देशाला परत गेले.
योसेफाने आपल्या भावांना दिलेले आश्वासन
15आपला बाप मरण पावला हे मनात आणून योसेफाचे भाऊ म्हणू लागले, “आता योसेफ कदाचित आमचा द्वेष करील व आपण त्याचे जे वाईट केले त्याचे तो पुरे उट्टे काढील.”
16त्यांनी योसेफाला सांगून पाठवले की, “आपल्या बापाने मरणापूर्वी आम्हांला आज्ञा केली ती अशी :
17तुम्ही योसेफाला सांगा, तुझ्या भावांनी तुझे वाईट केले हा त्यांचा अपराध व पातक ह्यांची क्षमा कर; आता आपल्या बापाच्या देवाचे जे आम्ही दास, त्या आमचा अपराध क्षमा करा अशी आम्ही विनंती करतो.” हे त्यांचे भाषण ऐकून योसेफाला रडू आले.
18तेव्हा त्याचे भाऊ स्वत: त्याच्याकडे जाऊन त्याच्या पाया पडून म्हणाले, “आम्ही आपले दास आहोत.”
19योसेफ त्यांना म्हणाला, “भिऊ नका, मी का देवाच्या ठिकाणी आहे?
20तुम्ही माझे वाईट योजले, पण आज पाहता त्याप्रमाणे अनेक लोकांचे प्राण वाचावे म्हणून देवाने ते चांगल्यासाठीच योजले होते.
21तर आता भिऊ नका; मी तुमचे व तुमच्या मुलाबाळांचे संगोपन करीन.” ह्या प्रकारे त्याने त्यांच्याशी ममतेने बोलून त्यांचे समाधान केले.
योसेफाचा मृत्यू
22योसेफ आणि त्याच्या बापाचे घराणे मिसर देशात राहिले. तो एकशे दहा वर्षे जगला.
23योसेफाने एफ्राइमाच्या तिसर्‍या पिढीतली मुले पाहिली; तसेच मनश्शेचा मुलगा माखीर ह्याची मुले त्याने आपल्या मांडीवर घेतली.
24नंतर योसेफ आपल्या भावांना म्हणाला, “मी आता मरणार; देव खरोखर तुमची भेट घेईल. जो देश अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांना त्याने शपथपूर्वक देऊ केला आहे त्यात तुम्हांला ह्या देशातून घेऊन जाईल.”
25मग योसेफाने इस्राएल वंशजांना शपथ घालून म्हटले, “देव खरोखर तुमची भेट घेईल तेव्हा तुम्ही माझ्या अस्थी येथून घेऊन जा.”
26योसेफ एकशे दहा वर्षांचा होऊन मृत्यू पावला; त्यांनी त्याच्या प्रेतात मसाला भरून ते पेटीत घालून मिसर देशात ठेवले.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in