YouVersion Logo
Search Icon

उत्पत्ती 48

48
याकोब एफ्राईम व मनश्शे ह्यांना आशीर्वाद देतो
1ह्या गोष्टी घडल्यावर कोणी योसेफाला सांगितले, “पाहा, आपला बाप आजारी आहे,” तेव्हा तो आपले दोन मुलगे मनश्शे व एफ्राईम ह्यांना बरोबर घेऊन त्याच्याकडे गेला.
2आपला मुलगा योसेफ आपल्याकडे आला आहे असे कोणी याकोबाला कळवले तेव्हा इस्राएल सावरून पलंगावर बसला.
3याकोब योसेफाला म्हणाला, “सर्वसमर्थ देवाने कनान देशातल्या लूज येथे मला दर्शन देऊन आशीर्वाद दिला;
4आणि म्हणाला, “पाहा, मी तुला फलद्रूप करून बहुगुणित करीन, तुझ्यापासून राष्ट्रसमुदाय उत्पन्न करीन आणि तुझ्यामागे तुझ्या संततीला हा देश निरंतरचे वतन करून देईन.
5मी मिसरात तुझ्याकडे येण्यापूर्वी, तुला जे दोन मुलगे मिसरात झाले ते माझेच आहेत, जसे रऊबेन व शिमोन तसेच एफ्राईम व मनश्शे हेही माझेच होत.
6त्यांच्यामागून जे मुलगे तुला होतील ते तुझे; त्यांचे वतन त्यांच्या भावांच्या नावाने चालेल.
7मी पदन येथून येत असता एफ्राथ गाव काहीसा दूर राहिला तेव्हा कनान देशात वाटेतच राहेल माझ्याजवळ मरण पावली. एफ्राथ म्हणजे बेथलेहेमच्या वाटेवर तिला पुरले.”
8इस्राएलाच्या दृष्टीला योसेफाचे मुलगे पडले तेव्हा तो म्हणाला, “हे कोण?”
9योसेफ आपल्या बापाला म्हणाला, “हे माझे मुलगे, देवाने मला हे ह्या देशात दिले.” तेव्हा तो म्हणाला, “त्यांना माझ्याजवळ आण म्हणजे मी त्यांना आशीर्वाद देईन.”
10इस्राएलाची दृष्टी वयाच्या मानाने मंद झाली होती, म्हणून त्याला बरोबर दिसत नव्हते. योसेफाने त्यांना त्याच्याजवळ नेले. तेव्हा त्याने त्यांचे चुंबन घेऊन त्यांना आलिंगन दिले.
11इस्राएल योसेफाला म्हणाला, “तुझे तोंड पुनरपि माझ्या दृष्टीस पडेल ह्याची मला कल्पना नव्हती, पण आता पाहा, देवाने तर मला तुझी संततीही पाहू दिली आहे.”
12मग योसेफाने त्यांना त्याच्या मांडीवरून काढले आणि भूमीपर्यंत लवून नमन केले.
13मग त्या दोघांना एफ्राइमास आपल्या उजव्या हातात म्हणजे इस्राएलाच्या डावीकडे आणि मनश्शेस आपल्या डाव्या हातात म्हणजे इस्राएलाच्या उजवीकडे असे धरून त्याच्याजवळ नेले.
14इस्राएलाने आपला उजवा हात पुढे करून एफ्राइमाच्या म्हणजे धाकट्याच्या मस्तकी ठेवला आणि आपला डावा हात मनश्शेच्या मस्तकी ठेवला; त्याने आपले हात उजवेडावे केले; मनश्शे तर ज्येष्ठ होता.
15त्याने योसेफाला आशीर्वाद देऊन म्हटले, “ज्या देवासन्मुख माझे वडील अब्राहाम व इसहाक चालले, माझ्या जन्मापासून आजवर ज्या देवाने माझे पालन केले,
16ज्या दूताने मला सर्व आपदांतून सोडवले, तो ह्या मुलांचे अभीष्ट करो; माझे नाव व माझे पूर्वज अब्राहाम व इसहाक ह्यांचे नाव हे चालवोत आणि ह्यांची वाढ होऊन पृथ्वीच्या मध्यभागी ह्यांचा मोठा समुदाय होवो.”
17आपल्या बापाने एफ्राइमाच्या मस्तकावर उजवा हात ठेवला हे योसेफाने पाहिले तेव्हा त्याला वाईट वाटले आणि एफ्राइमाच्या मस्तकावरील बापाचा हात काढून मनश्शेच्या मस्तकावर ठेवावा म्हणून त्याने तो धरला.
18योसेफ आपल्या वडिलांना म्हणाला, “बाबा, असे नाही, ज्येष्ठ हा आहे, ह्याच्या मस्तकावर आपला उजवा हात ठेवा.”
19त्याचे म्हणणे नाकारून त्याचा बाप म्हणाला, “मुला, ठाऊक आहे, मला हे ठाऊक आहे; त्याचेही एक राष्ट्र होईल आणि तोही महान होईल. तथापि त्याचा धाकटा भाऊ त्याच्यापेक्षा मोठा होईल आणि त्याच्या वंशजांतून राष्ट्रांचा समुदाय निर्माण होईल.
20त्या दिवशी त्याने त्यांना आशीर्वाद दिला व म्हटले : इस्राएल लोक आशीर्वाद देताना तुझे नाव घेऊन म्हणतील की, “एफ्राईम व मनश्शे ह्यांच्याप्रमाणे देव तुझे करो!” अशा प्रकारे त्याने एफ्राइमास मनश्शेहून श्रेष्ठ केले.
21इस्राएल योसेफाला म्हणाला, “पाहा, मी तर आता मरणार, तथापि देव तुमच्याबरोबर राहील आणि तुम्हांला तुमच्या पूर्वजांच्या देशी परत नेईल.
22मी तुला तुझ्या भावांच्यापेक्षा जमिनीचा एक वाटा अधिक देतो, तो मी माझ्या तलवारीच्या व धनुष्याच्या जोरावर अमोरी लोकांपासून घेतला.”

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in