YouVersion Logo
Search Icon

उत्पत्ती 43

43
योसेफाचे भाऊ बन्यामिनासह पुन्हा मिसर देशास येतात
1देशात दुष्काळ कडक होता.
2त्यांनी मिसराहून आणलेले धान्य खाऊन संपवले तेव्हा त्यांचा बाप त्यांना म्हणाला, “पुन्हा जाऊन आपल्यासाठी थोडी अन्नसामग्री खरेदी करा.”
3तेव्हा यहूदा त्याला म्हणाला, “त्या मनुष्याने आम्हांला अगदी निक्षून सांगितले आहे की तुमच्या भावाला तुम्ही आपल्याबरोबर आणले नाही तर माझे तोंड तुम्हांला पाहता येणार नाही.
4तुम्ही आमच्या भावाला आमच्याबरोबर पाठवाल तर आम्ही जाऊन तुमच्यासाठी अन्नसामग्री विकत आणू, 5पण जर तुम्ही त्याला पाठवणार नसलात, तर आम्ही जाणार नाही; कारण त्या मनुष्याने आम्हांला सांगितले आहे की तुमच्या भावाला तुम्ही बरोबर आणले नाही तर माझे तोंड तुम्हांला पाहता येणार नाही.”
6मग इस्राएल म्हणाला, “आणखी एक भाऊ आहे हे त्या मनुष्याला सांगून माझ्यावर हे अरिष्ट का आणले?”
7तेव्हा ते म्हणाले, “त्याने आमच्याविषयी व आमच्या घराण्याविषयी बारकाईने विचारले; तो म्हणाला, ‘तुमचा पिता अजून जिवंत आहे काय? तुम्हांला आणखी एखादा भाऊ आहे काय?’ त्याच्या प्रश्‍नांची उत्तरे आम्हांला द्यावी लागली. ‘तुम्ही आपल्या भावाला घेऊन या’ असे आम्हांला तो सांगेल हे आम्हांला आधी कसे कळावे?”
8यहूदा आपला पिता इस्राएल ह्याला म्हणाला, “मुलाला माझ्याबरोबर पाठवा, म्हणजे आम्ही मार्गस्थ होऊ; अशाने आम्ही, तुम्ही आणि आमची मुलेबाळे वाचतील, मरणार नाहीत.
9मी त्याचा जामीन होतो, त्याची हमी मी घेतो. मी त्याला परत आणून आपल्या स्वाधीन केले नाही तर आपला मी निरंतरचा दोषी ठरेन.
10आम्ही विलंब केला नसता तर आता आमची दुसरी खेप झाली असती.”
11मग त्यांचा पिता इस्राएल त्यांना म्हणाला, “असेच असेल तर मग एवढे करा : ह्या देशात उत्पन्न होणारे मोलवान पदार्थ त्या मनुष्याला भेट म्हणून आपल्या गोणीत घालून न्या; थोडा डिंक व थोडा मध, मसाला, गंधरस, पिस्ते व बदाम घेऊन जा.
12दुप्पट पैसा बरोबर न्या; तुमच्या गोण्यांच्या तोंडी जो पैसा परत आला तोही परत घेऊन जा, कदाचित काही चूक झाली असेल.
13तर आता आपल्या भावाला बरोबर घेऊन त्या मनुष्याकडे जायला निघा.
14सर्वसमर्थ देवाला तुमचा कळवळा येवो व तुम्ही त्या मनुष्यापुढे गेलात म्हणजे तो तुमचा दुसरा भाऊ व बन्यामीन ह्यांना तुमच्या हवाली करो. ह्यावर मी आपल्या मुलांना मुकलो तर मुकलो.”
15मग त्या मनुष्यांनी ती भेट बरोबर घेतली; दुप्पट पैसा हाती घेतला आणि बन्यामिनाला घेऊन ते मिसर देशाला निघून गेले व योसेफापुढे जाऊन उभे राहिले.
16योसेफाने त्यांच्याबरोबर बन्यामिनाला पाहिले तेव्हा तो घरच्या कारभार्‍याला म्हणाला, “ह्या माणसांना घरात ने, पशू मारून भोजन तयार कर, कारण आज दोन प्रहरी ही माणसे माझ्याबरोबर जेवणार आहेत.”
17योसेफाच्या सांगण्याप्रमाणे त्या मनुष्याने केले, आणि मग त्याने त्यांना योसेफाच्या घरी नेले.
18आपल्याला योसेफाच्या घरी नेले म्हणून ते घाबरले व म्हणाले, “पहिल्या खेपेस आपल्या गोण्यांतून पैसा परत गेला म्हणून आपल्याला आत नेत आहेत; ह्याचा विचार असा दिसतो की, काहीतरी निमित्त काढून आपणांवर तुटून पडावे, आपल्याला गुलाम करावे आणि आपली गाढवेही बळकवावी.”
19मग घराच्या फाटकाजवळ योसेफाच्या घरचा कारभारी होता त्याच्याकडे जाऊन ते म्हणाले,
20“महाराज, कृपा करून आमचे म्हणणे ऐका. पहिल्या खेपेस धान्य विकत घेण्यासाठी आम्ही येथे आलो होतो.
21आम्ही उतारशाळेत जाऊन पोहचलो आणि आपल्या गोण्या उघडल्या तर प्रत्येकाचा पैसा होता तेवढा प्रत्येकाच्या गोणीच्या तोंडी सापडला, तो आमच्याबरोबर आम्ही परत आणला आहे.
22आणि अन्नसामग्री विकत घेण्यासाठी आणखी पैसा आणलेला आहे; आमच्या गोण्यांत पैसा कोणी ठेवला हे आम्हांला ठाऊक नाही.”
23तो म्हणाला, “तुमचे कुशल असो, भिऊ नका; तुमच्या व तुमच्या पित्याच्या देवाने तुमच्या गोण्यांत धन घातले असेल; मला तुमचा पैसा पोहचला.” मग त्याने शिमोनाला त्यांच्याकडे आणले.
24नंतर त्याने त्या माणसांना योसेफाच्या घरात नेऊन पाणी दिले, आणि त्यांनी आपले पाय धुतले; त्याने त्यांच्या गाढवांना वैरणही दिली.
25दुपारी योसेफ येणार त्या वेळी त्याला द्यायच्या भेटीची तयारी त्यांनी करून ठेवली; कारण आपल्याला येथे भोजन करायचे आहे हे त्यांना कळले होते.
26योसेफ घरी आला तेव्हा त्यांनी आपल्याबरोबर भेट आणली होती, ती घरात आणून त्याच्यापुढे ठेवली आणि त्याला जमिनीपर्यंत लवून मुजरा केला.
27मग योसेफाने त्यांना क्षेमकुशल विचारले; त्याने म्हटले, “तुम्ही आपल्या म्हातार्‍या पित्याविषयी मागे सांगितले होते, तो सुखरूप आहे ना? तो अजून जिवंत आहे ना?”
28ते म्हणाले, “आपला दास, आमचा पिता सुखरूप आहे, तो अजून जिवंत आहे.” त्यांनी लवून त्याला मुजरा केला.
29त्याने दृष्टी वर करून आपला भाऊ, आपला सहोदर बन्यामीन ह्याला पाहिले. तो म्हणाला, “तुम्ही म्हणत होता तोच का हा तुमचा भाऊ?” तो त्याला म्हणाला, “माझ्या बाळा, देवाची तुझ्यावर कृपा होवो.”
30आपल्या भावासाठी योसेफाची आतडी तुटू लागली, कोठेतरी जाऊन रडावेसे त्याला झाले म्हणून तो त्वरेने आतल्या खोलीत जाऊन रडला.
31मग तो आपले तोंड धुऊन बाहेर आला आणि आपला गहिवर आवरून म्हणाला, “जेवण वाढा.”
32त्यांनी त्याचे ताट वेगळे मांडले, त्याच्या भावांची ताटे वेगळी मांडली आणि त्याच्याबरोबर भोजन करणार्‍या मिसर्‍यांची ताटे वेगळी मांडली; कारण मिसरी इब्र्यांच्या पंक्तीस बसून जेवत नसत; मिसरी लोकांना ह्या गोष्टीची किळस वाटे.
33त्यांना पंक्तीने योसेफासमोर बसवले तेव्हा पहिल्या मुलाच्या हक्काप्रमाणे पहिल्याला प्रथम बसवले, आणि बाकीच्यांना त्यांच्या वयाच्या क्रमाने बसवले; तेव्हा ते चकित होऊन एकमेकांकडे पाहू लागले.
34मग योसेफापुढची पक्वान्ने त्यांना नेऊन वाढली, पण बन्यामिनाला इतरांच्या पाचपट वाढले, आणि ते त्याच्याबरोबर मनमुराद प्याले.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in