YouVersion Logo
Search Icon

उत्पत्ती 38

38
यहूदा आणि तामार
1ह्या सुमारास यहूदा आपल्या भावांना सोडून खालच्या प्रदेशात गेला आणि अदुल्लामकर हीरा नावाच्या मनुष्याच्या घरी जाऊन राहिला.
2तेथे शूवा नावाच्या एका कनानी मनुष्याची मुलगी यहूदाच्या दृष्टीस पडली; त्याने ती बायको केली व तो तिच्यापाशी गेला.
3ती गर्भवती होऊन तिला मुलगा झाला, त्याने त्याचे नाव ‘एर’ ठेवले.
4ती पुन्हा गर्भवती होऊन तिला मुलगा झाला; तिने त्याचे नाव ‘ओनान’ ठेवले;
5पुन्हा तिला एक मुलगा झाला. त्याचे नाव तिने ‘शेला’ ठेवले. तो झाला तेव्हा यहूदा कजीब येथे राहत होता.
6मग यहूदाने आपला पहिला मुलगा एर ह्याला बायको करून दिली. तिचे नाव तामार असे होते;
7पण यहूदाचा पहिला मुलगा एर हा परमेश्वराच्या दृष्टीने दुष्ट होता म्हणून परमेश्वराने त्याला मारून टाकले.
8मग यहूदा ओनान ह्याला म्हणाला, “आपल्या भावजयीपाशी जा आणि दिराच्या धर्मास अनुसरून भावाचा वंश चालव.”
9पण ओनान ह्याला ठाऊक होते की संतती झाली तर ती आपली होणार नाही म्हणून तो आपल्या भावजयीपाशी जाई तेव्हा आपले वीर्य जमिनीवर पाडी; हेतू हाच की, आपल्या भावाला आपले बीज देऊ नये.
10हे त्याचे कृत्य परमेश्वरास दुष्ट वाटल्यावरून त्याने त्यालाही मारून टाकले.
11यहूदा आपली सून तामार हिला म्हणाला, “माझा मुलगा शेला वयात येईपर्यंत आपल्या बापाच्या घरी वैधव्यदशेत राहा.” त्याला वाटले की शेलाही आपल्या मुलांप्रमाणे मरायचा. मग तामार आपल्या बापाच्या घरी जाऊन राहिली.
12बराच काळ लोटल्यावर यहूदाची बायको जी शूवाची मुलगी, ती मरण पावली; तिच्यासाठी शोक करण्याचे संपल्यावर यहूदा आपला मित्र अदुल्लामकर हीरा ह्याच्याबरोबर तिम्ना येथे आपल्या मेंढरांची लोकर कातरणार्‍यांकडे वर गेला.
13तेव्हा तामार हिला कोणी सांगितले की, ‘तुझा सासरा आपल्या मेंढरांची लोकर कातरण्यासाठी तिम्ना येथे जात आहे.’
14तेव्हा तिने आपली वैधव्यवस्त्रे उतरवली. बुरखा घेऊन आपले शरीर लपेटून घेतले आणि तिम्नाच्या सडकेवरील एनाईम गावच्या वेशीजवळ ती जाऊन बसली; शेला प्रौढ झाला असूनही अजून आपल्याला त्याची बायको केले नाही असे तिला दिसून आले होते.
15यहूदाने तिला पाहिले तेव्हा त्याला वाटले, ‘ही कोणी वेश्या असावी,’ कारण तिने आपले तोंड झाकले होते.
16तेव्हा ती आपली सून आहे हे न कळून तो वाटेवरून तिच्याकडे वळून म्हणाला, “चल, मला तुझ्यापाशी येऊ दे.” तेव्हा ती म्हणाली, “माझ्यापाशी आलास तर मला काय देशील?”
17तो म्हणाला, “मी आपल्या कळपातले एक करडू तुला पाठवून देईन;” ती म्हणाली, “ते पाठवीपर्यंत काय हडप ठेवशील?”
18तो म्हणाला, “तुला काय हडप देऊ?” ती म्हणाली, “तुझी मुद्रिका, गोफ, व हातातील काठी दे.” ते तिला देऊन तो तिच्यापाशी गेला, आणि तिला त्याच्यापासून गर्भ राहिला.
19तेथून ती निघून गेली आणि आपला बुरखा काढून आपली वैधव्यवस्त्रे पुन्हा ल्याली.
20मग त्या स्त्रीपासून आपले हडप आणण्यासाठी आपला मित्र अदुल्लामकर ह्याच्या हाती यहूदाने एक करडू पाठवले; पण त्याला ती कोठे सापडली नाही.
21मग त्याने तेथल्या लोकांना विचारले, “एनाईम गावच्या वाटेवर एक वेश्या1 होती ती कोठे आहे?” ते म्हणाले, “येथे कोणी वेश्या नव्हती.”
22मग तो यहूदाकडे परत जाऊन म्हणाला, “मला काही ती सापडली नाही; तेथले लोकही म्हणाले की येथे कोणी वेश्या नव्हती.”
23तेव्हा यहूदा म्हणाला, “ते हडप तिच्यापाशीच राहू दे, नाहीतर तेथले लोक आपली छीथू करतील; मी तर करडू पाठवले, पण तुला ती सापडली नाही.”
24ह्या गोष्टीला सुमारे तीन महिने झाले तेव्हा कोणी यहूदाला सांगितले की, “तुझी सून तामार हिने वेश्याकर्म केले व त्या जारकर्मामुळे तिला दिवस गेले आहेत.” तेव्हा यहूदा म्हणाला, “तिला बाहेर काढून जाळून टाका.”
25तिला बाहेर काढले तेव्हा तिने आपल्या सासर्‍याला निरोप पाठवला की, “ह्या वस्तू ज्या पुरुषाच्या आहेत त्याच्यापासून मला गर्भ राहिला आहे.” आणखी ती म्हणाली, “नीट डोळे उघडून पाहा; ही मुद्रिका, हा गोफ व ही काठी कुणाची आहे ती.”
26यहूदाने त्या ओळखून म्हटले, “ती माझ्यापेक्षा अधिक नीतिमान आहे; कारण मी आपला मुलगा शेला तिला नवरा करून दिला नाही.” ह्यापुढे त्याने कधी तिच्याशी शरीरसंबंध केला नाही.
27तिच्या प्रसूतिसमयी तिच्या पोटात जुळी आहेत असे दिसून आले.
28तिला वेणा होत असता, एका बालकाचा हात बाहेर आला तेव्हा सुइणीने त्याच्या हाताला लाल सूत बांधून म्हटले, “पहिला हा बाहेर पडला.”
29त्याने आपला हात आखडून घेतला तेव्हा त्याचा भाऊ बाहेर पडला. तेव्हा सुईण म्हणाली, “तू आपल्यासाठी कशी वाट फोडलीस?” म्हणून त्याचे नाव ‘पेरेस’1 असे ठेवले.
30मग ज्याच्या हाताला लाल सूत बांधले होते तो त्याचा भाऊ बाहेर पडला आणि त्याचे नाव ‘जेरह’ ठेवले.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in