YouVersion Logo
Search Icon

उत्पत्ती 33

33
याकोब व एसाव ह्यांच्यात झालेला सलोखा
1ह्यानंतर याकोबाने दृष्टी वर करून पाहिले तर एसाव चारशे माणसे बरोबर घेऊन येत आहे असे त्याला दिसले; तेव्हा त्याने लेआ व राहेल आणि त्या दोन दासी ह्यांच्याकडे आपापली मुले दिली.
2त्याने दासी व त्यांची मुले सर्वांत पुढे, त्यांच्यानंतर लेआ व तिची मुले आणि सर्वांच्या मागे राहेल व योसेफ ह्यांना ठेवले.
3तो स्वत: त्या सर्वांच्या पुढे चालत गेला, आणि भावाजवळ जाऊन पोहचेपर्यंत त्याने सात वेळा भूमीपर्यंत लवून नमन केले.
4तेव्हा एसाव त्याला भेटण्यासाठी धावत आला, त्याने त्याला आलिंगन दिले; त्याच्या गळ्यात गळा घालून त्याचे चुंबन घेतले, आणि ते दोघे रडले.
5एसावाने दृष्टी वर करून बायका व मुले पाहिली तेव्हा तो म्हणाला, “तुझ्याबरोबर हे कोण आहेत?” तो म्हणाला, “आपल्या दासावर देवाने कृपा करून दिलेली ही मुले आहेत.”
6तेव्हा त्या दासींनी मुलांसह जवळ येऊन त्याला नमन केले.
7मग लेआ व तिची मुले ह्यांनीही जवळ येऊन त्याला नमन केले, आणि त्यांच्यामागून योसेफ व राहेल ह्यांनी जवळ येऊन त्याला नमन केले.
8मग त्याने म्हटले, “मला तुझा हा सर्व तांडा भेटला तो कशाला?” तो म्हणाला, “माझ्या स्वामीची कृपादृष्टी व्हावी म्हणून.”
9एसाव म्हणाला, “माझ्याजवळ भरपूर आहे, माझ्या बंधू, तुझे तुलाच राहू दे.”
10याकोब म्हणाला, “नाही, नाही; आपली माझ्यावर कृपादृष्टी झाली असेल तर माझ्या हातची एवढी भेट घ्याच, कारण आपले दर्शन मला झाले हे जणू काय देवाच्या दर्शनासारखे आहे आणि आपण माझ्यावर संतुष्ट झाला आहात,
11तर आपल्यासाठी आणलेली ही माझी भेट घ्याच; कारण देवाने माझ्यावर कृपादृष्टी केल्यामुळे मला सर्वकाही आहे.” याकोबाने त्याला आग्रह केल्यावर त्याने ती भेट घेतली.
12मग एसाव त्याला म्हणाला, “चला, आपण वाटेस लागून पुढे जाऊ, मी तुझ्यापुढे चालतो.”
13याकोब त्याला म्हणाला, “माझ्या स्वामीला ठाऊक आहे की ही मुले सुकुमार आहेत; आणि दूध पाजणार्‍या शेळ्या, मेंढ्या व गाई ह्यांचे मला पाहिले पाहिजे; त्यांची एक दिवस फाजील दौड केली तर अवघा कळप मरून जाईल.
14तर स्वामी, आपण आपल्या दासाच्या पुढे जा, माझी गुरे, मेंढरे व मुले ह्यांच्याने चालवेल तसा मी हळूहळू चालत सेईर येथे माझ्या स्वामीकडे येईन.”
15मग एसाव म्हणाला, “माझ्याजवळच्या लोकांपैकी काही तुझ्याबरोबर ठेवू दे.” तो म्हणाला, “कशाला? माझ्या स्वामीची कृपादृष्टी माझ्यावर असली म्हणजे पुरे.”
16तेव्हा एसाव त्याच दिवशी सेईरास परत जायला निघाला.
17पण याकोब मजल दरमजल करत सुक्कोथास गेला; तेथे त्याने स्वतःसाठी घर बांधले व आपल्या गुराढोरांसाठी खोपट्या केल्या; म्हणून त्या ठिकाणाचे नाव सुक्कोथ (खोपट्या) असे पडले.
18याकोब पदन-अरामापासून प्रवास करत कनान देशातील शखेम नावाच्या नगरास सुखरूप पोहचला, आणि नगरापुढे तळ देऊन राहिला.
19जेथे त्याने डेरा दिला होता तेथील काही जमीन शखेमाचा बाप हमोर ह्याच्या वंशजांकडून शंभर कसीटा1 देऊन त्याने विकत घेतली.
20आणि तेथे त्याने एक वेदी बांधून तिचे नाव एल-एलोहे-इस्राएल (देव, इस्राएलाचा देव) असे ठेवले.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in