YouVersion Logo
Search Icon

उत्पत्ती 29

29
राहेल व लेआ मिळवण्यासाठी याकोब लाबानाची सेवा करतो
1मग याकोब मार्गस्थ होऊन पूर्वेकडील लोकांच्या प्रदेशात जाऊन पोहचला.
2तेथे त्याने पाहिले तर एका शेतात एक विहीर होती; तिच्या आसपास शेरडामेंढरांचे तीन कळप बसलेले होते; कारण त्या विहिरीतून त्या कळपांना पाणी पाजत असत; त्या विहिरीच्या तोंडावर धोंडा होता तो मोठा होता.
3सर्व कळप तेथे जमल्यावर विहिरीच्या तोंडावरचा धोंडा लोटून मेंढरांना पाणी पाजत आणि मग तो परत जागच्या जागी विहिरीच्या तोंडावर ठेवत.
4याकोब त्यांना म्हणाला, “माझ्या बांधवांनो, तुम्ही कोठले?” ते म्हणाले, “आम्ही हारानातले.”
5मग त्याने त्यांना विचारले, “नाहोराचा मुलगा लाबान ह्याला तुम्ही ओळखता काय?” ते म्हणाले, “ओळखतो.”
6तेव्हा त्याने म्हटले, “तो बरा आहे काय?” ते म्हणाले, “बरा आहे, आणि ती पाहा, त्याची मुलगी राहेल मेंढरे घेऊन इकडेच येत आहे.”
7तो म्हणाला, “हे पाहा, अजून दिवस बराच आहे, जनावरे एकत्र करण्याची वेळ झाली नाही, तर मेंढरांना पाणी पाजा आणि चारायला घेऊन जा.”
8ते म्हणाले, “तसे करता येत नाही; सर्व कळप एकत्र झाल्यावर विहिरीच्या तोंडावरचा धोंडा लोटतात आणि मग आम्ही मेंढरांना पाणी पाजत असतो.”
9तो त्यांच्याशी बोलत आहे इतक्यात राहेल बापाची मेंढरे घेऊन आली; कारण ती मेंढरे चारत असे.
10याकोबाने आपला मामा लाबान ह्याची मुलगी राहेल आणि आपला मामा लाबान ह्याची मेंढरे पाहिली तेव्हा त्याने जवळ जाऊन विहिरीच्या तोंडावरचा धोंडा लोटून आपला मामा लाबान ह्याच्या मेंढरांना पाणी पाजले.
11मग याकोब राहेलीचे चुंबन घेऊन मोठ्याने रडला.
12याकोबाने राहेलीस सांगितले, “मी तुझ्या बापाचा आप्त, रिबकेचा मुलगा आहे;” तेव्हा तिने धावत जाऊन आपल्या बापाला हे कळवले.
13लाबानाने आपला भाचा याकोब आल्याचे वर्तमान ऐकले तेव्हा तो धावत त्याला सामोरा गेला. त्याला आलिंगन देऊन त्याने त्याची चुंबने घेतली; त्याने त्याला आपल्या घरी नेले. मग त्याने लाबानाला सर्व वृत्तान्त कथन केला.
14तेव्हा लाबान त्याला म्हणाला, “होय, तू खरोखर माझ्या हाडामांसाचा आहेस.” याकोब त्याच्याकडे महिनाभर राहिला.
15त्यानंतर लाबान त्याला म्हणाला, “तू माझा आप्त म्हणून माझी चाकरी फुकट करावीस की काय? तुझे वेतन काय ते मला सांग.”
16लाबानास दोन मुली होत्या; वडील मुलीचे नाव लेआ व धाकटीचे नाव राहेल.
17लेआचे डोळे निस्तेज होते, पण राहेल बांध्याने सुरेख व दिसायला सुंदर होती.
18याकोबाची राहेलवर प्रीती बसली होती म्हणून तो म्हणाला, “आपली धाकटी मुलगी राहेल हिच्यासाठी मी सात वर्षे आपली चाकरी करीन.”
19ह्यावर लाबान म्हणाला, “ती परक्या माणसाला देण्यापेक्षा तुला द्यावी हे बरे; तू माझ्याकडे राहा.”
20तेव्हा याकोबाने राहेलीसाठी सात वर्षे चाकरी केली; तिच्यावर त्याची प्रीती असल्यामुळे ती वर्षे त्याला केवळ थोड्या दिवसांसारखी भासली.
21नंतर याकोब लाबानास म्हणाला, “आता माझी मुदत भरली आहे, माझी बायको मला द्या म्हणजे मी तिच्यापाशी जाईन.”
22मग लाबानाने तेथल्या सर्व लोकांना जमवून मेजवानी दिली.
23संध्याकाळी असे झाले की त्याने आपली मुलगी लेआ हिला त्याच्याकडे आणले, तेव्हा तो तिच्यापाशी गेला.
24लाबानाने आपली दासी जिल्पा ही आपली मुलगी लेआ हिची दासी म्हणून तिला दिली.
25सकाळ झाली तेव्हा पाहतो तर ती लेआ; मग तो लाबानास म्हणाला, “आपण माझ्याशी हे काय केले? मी राहेलीसाठी आपली चाकरी केली ना? मला का फसवले?”
26त्याला लाबान म्हणाला, “वडील मुलीच्या आधी धाकटीला द्यावे अशी आमच्याकडे चाल नाही.
27हिचे सप्तक भरून दे, मग आम्ही तीही तुला देऊ. त्याबद्दल तुला आणखी सात वर्षे माझी चाकरी करावी लागेल.”
28याकोबाने तसे केले; आणि तिचे सप्तक पुरे केल्यावर त्याने त्याला आपली मुलगी राहेल बायको करून दिली.
29लाबानाने आपली दासी बिल्हा ही आपली मुलगी राहेल हिची दासी म्हणून तिला दिली.
30तो राहेलीपाशीही गेला; लेआपेक्षा राहेलीवर त्याची प्रीती अधिक होती म्हणून त्याने आणखी सात वर्षे त्याच्याकडे राहून त्याची चाकरी केली.
याकोबाची संतती
31परमेश्वराने पाहिले की, लेआ नावडती आहे; म्हणून त्याने तिची कूस वाहती केली आणि राहेल वांझ राहिली.
32लेआ गर्भवती होऊन तिला मुलगा झाला, त्याचे नाव तिने ‘रऊबेन’ ठेवले; ती म्हणाली, “परमेश्वराने माझ्या दु:खाकडे पाहिले आहे, कारण आता माझा नवरा माझ्यावर प्रीती करील.”
33ती पुन: गर्भवती होऊन तिला मुलगा झाला, तेव्हा ती म्हणाली, “मी नावडती आहे हे देवाने ऐकले म्हणून त्याने मला हाही दिला;” आणि तिने त्याचे नाव ‘शिमोन’ ठेवले.
34ती पुन: गर्भवती होऊन तिला मुलगा झाला; तेव्हा ती म्हणाली, “मला आता तीन मुलगे झाले, आता तरी माझा नवरा माझ्याशी मिळून राहील;” म्हणून तिने त्याचे नाव ‘लेवी’ ठेवले.
35ती पुन: गर्भवती होऊन तिला मुलगा झाला तेव्हा ती म्हणाली, “आता मी परमेश्वराचे स्तवन करीन;” ह्यावरून तिने त्याचे नाव ‘यहूदा’ ठेवले, पुढे तिचे जनन थांबले.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in