YouVersion Logo
Search Icon

उत्पत्ती 21

21
इसहाकाचा जन्म
1ह्यानंतर परमेश्वराने आपल्या म्हणण्याप्रमाणे सारेवर अनुग्रह केला आणि तिला दिलेले वचन पुरे केले.
2सारा गर्भवती झाली आणि देवाने सांगितलेल्या समयी अब्राहामाला म्हातारपणी तिच्यापासून मुलगा झाला.
3अब्राहामाला सारेपासून मुलगा झाला त्याचे नाव त्याने इसहाक ठेवले.
4अब्राहामाने आपला मुलगा इसहाक आठ दिवसांचा झाला तेव्हा देवाच्या आज्ञेप्रमाणे त्याची सुंता केली.
5इसहाक झाला तेव्हा अब्राहाम शंभर वर्षांचा होता.
6सारा म्हणाली, “देवाने मला हसवले आहे; जो कोणी हे ऐकेल तो माझ्याबरोबर हसेल.”
7ती आणखी म्हणाली, “सारा मुलास पाजील असे अब्राहामाला कोण म्हणाला असता? पण त्याच्या म्हातारपणी माझ्यापासून त्याला मुलगा झाला आहे!”
हागार आणि इश्माएल ह्यांना घालवून देणे
8तो बाळ मोठा झाला तेव्हा त्याचे दूध तोडले; इसहाकाचे दूध तोडले त्या दिवशी अब्राहामाने मोठी मेजवानी दिली.
9हागार मिसरिणीस अब्राहामापासून झालेल्या मुलाला खिदळताना सारेने पाहिले.
10तेव्हा ती अब्राहामाला म्हणाली, “ह्या दासीला व हिच्या मुलाला घालवून द्या; माझा मुलगा इसहाक ह्याच्याबरोबर ह्या दासीचा मुलगा वारस नसावा.”
11अब्राहामाला आपल्या मुलासंबंधी ही गोष्ट फार वाईट वाटली.
12तेव्हा देव अब्राहामाला म्हणाला, “हा मुलगा व तुझी दासी ह्यांच्यासंबंधी तू वाईट वाटून घेऊ नकोस; सारा तुला जे काही सांगते ते सगळे ऐक; कारण तुझ्या वंशाचे नाव इसहाकच चालवणार.
13ह्या दासीच्या मुलापासूनही मी एक राष्ट्र निर्माण करीन; कारण तो तुझे बीज आहे.”
14नंतर अब्राहामाने मोठ्या पहाटेस उठून भाकरी व पाण्याची मसक आणून हागारेच्या खांद्यावर ठेवली आणि तिचा मुलगा तिच्या हवाली करून तिला रवाना केले; ती निघून बैर-शेबाच्या रानात भटकत राहिली.
15मसकेतील पाणी संपल्यावर तिने त्या मुलाला एका झुडपाखाली टाकले,
16आणि ती बाणाच्या टप्प्याइतकी दूर जाऊन त्याच्यासमोर बसली; ती म्हणाली, “आपण आपल्या मुलाचा मृत्यू पाहू नये;” आणि ती त्याच्यासमोर बसून हंबरडा फोडून रडू लागली.
17देवाने मुलाची वाणी ऐकली व देवाच्या दूताने आकाशातून हाक मारून हागारेला म्हटले, “हागारे, तू कष्टी का? भिऊ नकोस, कारण मुलगा आहे तेथून देवाने त्याची वाणी ऐकली आहे.
18ऊठ, मुलाला उचलून आपल्या हाती घट्ट धर; त्याच्यापासून मी एक मोठे राष्ट्र निर्माण करीन.”
19मग देवाने तिचे डोळे उघडले. पाण्याचा झरा तिच्या दृष्टीस पडला; तेव्हा तिने जाऊन मसकेत पाणी भरले व मुलाला पाजले.
20देव त्या मुलाचा पाठीराखा झाला व तो रानात लहानाचा मोठा होऊन तिरंदाज झाला.
21तो पारानाच्या रानात वस्ती करून राहिला, आणि त्याच्या आईने त्याला मिसर देशातली बायको करून दिली.
अब्राहाम आणि अबीमलेख ह्यांच्यामधील करार
22त्या सुमारास असे झाले की अबीमलेख व त्याचा सेनापती पीकोल हे अब्राहामाला म्हणाले, “जे काही तुम्ही करता त्यात देव तुमच्याबरोबर आहे.
23तर तुम्ही मला आता येथे देवाच्या शपथेवर असे म्हणा : मी तुमच्याशी, तुमच्या पुत्रपौत्रांशी कपट करणार नाही, आणि जशी तुम्ही माझ्यावर कृपा केली तशी मी तुमच्यावर व ज्या देशात मी उपरा होऊन राहिलो आहे त्या ह्या देशावर कृपा करीन.”
24अब्राहाम म्हणाला, “बरे, अशी शपथ मी वाहतो.”
25मग अबीमलेखाच्या चाकरांनी पाण्याची एक विहीर बळकावली होती त्याबद्दल अब्राहामाने अबीमलेखाला दोष लावला.
26अबीमलेख म्हणाला, “हे कोणी केले हे मला ठाऊक नाही; तुम्ही मला हे कधी सांगितले नव्हते; आणि मीही हे ऐकले नव्हते, आजच ऐकले.”
27मग अब्राहामाने मेंढरे व बैल आणून अबीमलेखाला दिले आणि त्या दोघांनी एकमेकांत करार केला.
28अब्राहामाने कळपातील कोकरांतल्या सात माद्या वेगळ्या काढून ठेवल्या.
29तेव्हा अबीमलेख अब्राहामास म्हणाला, “तुम्ही ही सात कोकरे वेगळी काढून ठेवली ती कशाला?”
30तो म्हणाला, “तुम्ही ही सात कोकरे माझ्या हातून घ्यावी, म्हणजे ही विहीर मी खणली आहे अशी माझ्या बाजूने साक्ष पटेल.”
31ह्यावरून त्या ठिकाणाचे नाव बैर-शेबा (शपथेची विहीर) असे पडले. कारण तेथे त्या दोघांनी शपथ वाहिली.
32बैर-शेबा येथे त्यांनी करार केल्यावर अबीमलेख व त्याचा सेनापती पीकोल हे निघून पलिष्ट्यांच्या देशात परत गेले.
33मग अब्राहामाने बैर-शेबा येथे एशेल वृक्ष लावला आणि तेथे सनातन देव परमेश्वर ह्याच्या नावाने प्रार्थना केली.
34अब्राहाम हा पलिष्ट्यांच्या देशात पुष्कळ दिवस उपरा म्हणून राहिला.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in