गलतीकरांस पत्र 5:1-26
गलतीकरांस पत्र 5:1-26 MARVBSI
ह्या स्वातंत्र्याकरता ख्रिस्ताने आपल्याला मुक्त केले आहे म्हणून त्यात टिकून राहा, गुलामगिरीच्या जुवाखाली पुन्हा सापडू नका. पाहा, मी पौल तुम्हांला सांगतो की, जर तुम्ही सुंता करून घेतली तर तुम्हांला ख्रिस्ताचा काही उपयोग होणार नाही. सुंता करून घेणार्या प्रत्येक माणसाला मी पुन्हा निश्चितार्थाने सांगतो की, ‘तू संपूर्ण नियमशास्त्र आचरण्यास बांधलेला आहेस.’ जे तुम्ही नियमशास्त्राने नीतिमान ठरू पाहता त्या तुमचा ख्रिस्ताबरोबरचा संबंध नाहीसा झाला आहे; तुम्ही कृपेला अंतरला आहात. कारण आपण आत्म्याच्या द्वारे विश्वासाने नीतिमत्त्वाची आशा धरून वाट पाहत आहोत. ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांची सुंता होण्यात किंवा न होण्यात काही सामर्थ्य आहे असे नाही; तर प्रीतीच्या द्वारे कार्य करणारा जो विश्वास त्याच्यात सामर्थ्य आहे. तुम्ही चांगले धावत होता; मग सत्याला मान्य होऊ नये म्हणून तुम्हांला कोणी अडथळा केला? तुम्हांला पाचारण करणार्याची ही बुद्धी नव्हे. थोडेसे खमीर सगळा कणकेचा गोळा फुगवून टाकते. मला प्रभूमध्ये तुमच्याविषयी खातरी आहे की, तुम्ही दुसरा विचार करणार नाही; तुमच्या मनाची चलबिचल करणारा कोणी का असेना तो दंड भोगील. बंधुजनहो, मी अजून सुंतेचा उपदेश करत असलो तर अद्याप माझा छळ का होत आहे? तसे असते तर वधस्तंभाचे अडखळण नाहीसे झाले आहे. तुमच्या ठायी अस्थिरता उत्पन्न करणारे स्वतःला छेदून घेतील तर बरे होईल. बंधुजनहो, तुम्हांला स्वतंत्रतेकरता पाचारण झाले; तरी त्या स्वतंत्रतेने देहवासनांना वाव मिळू देऊ नका, तर प्रीतीने एकमेकांचे दास व्हा. कारण “जशी आपणावर तशी आपल्या शेजार्यावर प्रीती कर,” हे एकच वचन पाळल्याने अवघे नियमशास्त्र पूर्णपणे पाळण्यात आले आहे. परंतु तुम्ही जर एकमेकांना चावता व खाऊन टाकता तर परस्परांच्या हातून एकमेकांचा संहार होऊ नये म्हणून जपा. मी तर म्हणतो, आत्म्याच्या प्रेरणेने1 चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही. कारण देहवासना आत्म्याविरुद्ध आहेत व आत्मा देहवासनांविरुद्ध आहे; ही परस्परविरोधी आहेत, ह्यासाठी की, जे काही तुम्ही इच्छिता ते तुमच्या हातून घडू नये. तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालवलेले आहात तर तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही. देहाची कर्मे तर उघड आहेत; ती ही : जारकर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तिपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, खून, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी. ह्यांविषयी मी तुम्हांला पूर्वी जे सांगून ठेवले होते तेच आता सांगून ठेवतो की, अशी कर्मे करणार्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ, प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन हे आहे, अशांविरुद्ध नियमशास्त्र नाही. जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी विकार व वासना ह्यांच्यासह देहस्वभाव वधस्तंभावर खिळला आहे. आपण जर आत्म्याच्या सामर्थ्याने जगतो, तर आपण आत्म्याच्या प्रेरणेनेच चालावे. आपण पोकळ अभिमान बाळगणारे, एकमेकांना चीड आणणारे व एकमेकांचा हेवा करणारे होऊ नये.