YouVersion Logo
Search Icon

गलतीकरांस पत्र 1

1
नमस्कार
1,2गलतीयातील मंडळ्यांना : मनुष्यांकडून नव्हे, किंवा कोणा माणसाच्या द्वारेही नव्हे, तर येशू ख्रिस्त व ज्याने त्याला मेलेल्यांतून उठवले तो देवपिता, ह्यांच्या द्वारे प्रेषित झालेला पौल, त्या माझ्याकडून व माझ्या-बरोबरच्या सर्व बंधूंकडून :
3देव जो पिता त्याच्यापासून व आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्यापासून तुम्हांला कृपा व शांती असो.
4आपल्या देवपित्याच्या इच्छेप्रमाणे आपल्याला सांप्रतच्या दुष्ट युगापासून सोडवावे म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या-आमच्या पापांबद्दल स्वतःला दिले.
5देवपित्याला1 युगानुयुग गौरव असो. आमेन.
गलतीकरांनी पौलाचा केलेला हिरमोड
6मला आश्‍चर्य वाटते की, ज्याने तुम्हांला ख्रिस्ताच्या कृपेत पाचारण केले त्याच्यापासून तुम्ही इतके लवकर अन्य सुवार्तेकडे वळत आहात;
7ती दुसरी नाही; पण तुम्हांला घोटाळ्यात पाडणारे व ख्रिस्ताची सुवार्ता विपरीत करू पाहणारे असे कित्येक आहेत.
8परंतु जी सुवार्ता आम्ही तुम्हांला सांगितली तिच्याहून निराळी सुवार्ता आम्ही सांगितली, किंवा स्वर्गातून आलेल्या देवदूताने सांगितली, तरी तो शापभ्रष्ट असो.
9आम्ही अगोदर सांगितले तसे मी आताही पुन्हा सांगतो की, जी तुम्ही स्वीकारली तिच्याहून निराळी सुवार्ता कोणी तुम्हांला सांगितल्यास तो शापभ्रष्ट असो.
10मी आता मनुष्याची किंवा देवाची मनधरणी करायला पाहत आहे? मी मनुष्यांना संतुष्ट करायला पाहत आहे काय? मी अजूनपर्यंत मनुष्यांना संतुष्ट करत राहिलो असतो तर मी ख्रिस्ताचा दास नसतो.
पौलाला मनुष्यापासून नव्हे तर येशू ख्रिस्तापासून शुभवृत्त प्राप्त झाले
11कारण बंधूंनो, मी तुम्हांला हे कळवतो की, मी सांगितलेली सुवार्ता मनुष्याच्या सांगण्याप्रमाणे नाही.
12कारण ती मला मनुष्यापासून प्राप्त झाली नाही, आणि ती मला कोणी शिकवलीही नाही; तर येशू ख्रिस्ताच्या प्रकटीकरणाने ती मला प्राप्त झाली.
13यहूदी धर्मातल्या माझ्या पूर्वीच्या वर्तणुकीविषयी तुम्ही ऐकले आहे की, मी देवाच्या मंडळीचा पराकाष्ठेचा छळ करत असे व तिचा नाश करत असे;
14आणि माझ्या पूर्वजांच्या संप्रदायांविषयी मी विशेष आवेशी असल्यामुळे माझ्या लोकांतल्या माझ्या वयाच्या पुष्कळ जणांपेक्षा यहूदी धर्मात मी पुढे गेलो होतो.
15,16तरी ज्या देवाने मला माझ्या मातेच्या उदरातून जन्मल्यापासून वेगळे केले व आपल्या कृपेने बोलावले, त्याला आपल्या पुत्राला माझ्या ठायी प्रकट करणे बरे वाटले, अशासाठी की, मी परराष्ट्रीयांमध्ये त्याच्या सुवार्तेची घोषणा करावी; तेव्हा मानवांची2 मसलत न घेता,
17आणि माझ्यापूर्वी झालेल्या प्रेषितांकडे यरुशलेमेस वर न जाता, मी लगेच अरबस्तानात निघून गेलो; व तेथून दिमिष्कास पुन्हा परत आलो.
18मग तीन वर्षांनंतर मी केफाला भेटायला यरुशलेमेस वर गेलो, व त्याच्याजवळ पंधरा दिवस राहिलो.
19परंतु प्रेषितांतील दुसरा कोणी माझ्या दृष्टीस पडला नाही; मात्र प्रभूचा बंधू याकोब माझ्या दृष्टीस पडला.
20तर पाहा, तुम्हांला मी जे लिहीत आहे ते खोटे लिहीत नाही; हे मी देवासमक्ष सांगतो.
21मग सूरिया व किलिकिया ह्या प्रांतांत मी आलो.
22तेव्हा ख्रिस्तामध्ये असणार्‍या यहूदीयातील मंडळ्यांना माझी तोंडओळख नव्हती;
23त्यांच्या ऐकण्यात एवढेच येत असे की, “पूर्वी आपला छळ करणारा ज्या विश्वासाचा मागे नाश करत असे, त्याची तो आता घोषणा करत आहे.”
24आणि ते माझ्यावरून देवाचा गौरव करत असत.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in