एज्रा 5
5
मंदिर पुन्हा बांधले जाते
1मग यहूदा व यरुशलेम ह्यांत जे यहूदी राहत होते त्यांना हाग्गय व जखर्या बिन इद्दो हे संदेष्टे इस्राएलाच्या देवाच्या नामाने संदेश देत असत.
2जरूब्बाबेल बिन शल्तीएल आणि येशूवा बिन योसादाक हे तयार होऊन यरुशलेमेतील देवाचे मंदिर बांधू लागले; देवाचे संदेष्टे त्यांना साहाय्य करीत असत.
3त्या वेळेस महानदाच्या पश्चिमेकडच्या प्रांताचा अधिपती ततनइ व शथर-बोजनइ व त्यांचे स्नेही हे सर्व त्यांच्याकडे येऊन म्हणाले, “हे मंदिर बांधण्याचा व हा कोट उभारण्याचा हुकूम तुम्हांला कोणी दिला आहे?”
4शिवाय, त्यांनी आम्हांला म्हटले की, “जे पुरुष ही इमारत बांधत आहेत त्यांची नावे काय?”
5तरीपण यहूद्यांच्या वडील जनांवर त्यांच्या देवाची कृपादृष्टी असे, म्हणून ही गोष्ट दारयावेशाच्या कानी जाऊन तिकडून त्यासंबंधाने लेखी उत्तर येईपर्यंत त्यांनी त्या कामास अडथळा केला नाही.
6महानदाच्या पश्चिमेकडील प्रांताचा अधिपती ततनइ व त्या नदाच्या पश्चिमेकडचे शथर-बोजनइ व त्याचे स्नेही अफर्सखी ह्यांनी दारयावेश राजाकडे पत्र पाठवले त्याची नक्कल ही;
7त्यांनी त्याच्याकडे पत्र पाठवले त्यात असे लिहिले होते : “दारयावेश महाराजांचे कुशल असो.
8महाराजांना कळावे की आम्ही यहूदा प्रांतातील थोर देवाच्या मंदिराकडे गेलो होतो; तेथे पाहतो तर ते मोठ्या पाषाणाचे बांधत आहेत व भिंतीवर लाकडेही पडली आहेत; हे काम मोठ्या झपाट्याने चालले असून त्यांच्या हातांनी सिद्धीस जात आहे;
9तेथल्या वडील जनांना आम्ही विचारले, ‘हे मंदिर बांधण्यास व हा कोट उभारण्यास तुम्हांला कोणी हुकूम दिला आहे?’
10त्यांचे प्रमुख कोण आहेत त्यांची नावे लिहून आपणाला कळवावीत म्हणून आम्ही त्यांना ती विचारली.
11त्यांनी आम्हांला हे उत्तर दिले : ‘आम्ही स्वर्गाच्या व पृथ्वीच्या देवाचे दास आहोत; जे मंदिर बहुत वर्षांमागे इस्राएलाच्या एका मोठ्या राजाने बांधून पुरे केले होते ते आम्ही बांधत आहोत.
12आमच्या वाडवडिलांनी स्वर्गीच्या देवाला चिडवून संतप्त केले तेव्हा त्याने त्यांना बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर खास्दी ह्याच्या हाती दिले; त्याने ह्या मंदिराचा विध्वंस करून येथील लोकांना बाबेलास नेले.
13पण बाबेलचा राजा कोरेश ह्याने आपल्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी देवाचे हे मंदिर बांधण्याचा हुकूम केला.
14देवाच्या मंदिरातली सोन्यारुप्याची पात्रे नबुखद्नेस्सराने यरुशलेमाच्या मंदिरातून काढून नेऊन बाबेलातील मंदिरात ठेवली होती ती कोरेश राजाने तेथील मंदिरातून बाहेर काढून शेशबस्सर नावाच्या पुरुषास अधिकारी नेमून त्याच्या हवाली केली;
15त्याने त्यांना सांगितले की ही पात्रे यरुशलेमेतील मंदिरात नेऊन ठेव आणि देवाचे मंदिर पूर्ववत त्याच ठिकाणी बांध.
16मग शेशबस्सराने येऊन यरुशलेमेतल्या देवमंदिराचा पाया घातला; तेव्हापासून आजवर हे बांधण्याचे काम चालू आहे, अद्यापि हे पुरे झाले नाही.’
17तेव्हा कोरेश राजाने यरुशलेमेत देवाचे मंदिर बांधण्याची आज्ञा दिली होती किंवा नाही ह्याचा शोध महाराजांच्या मर्जीस आल्यास बाबेलच्या राजभांडारात करावा; ह्या प्रकरणी महाराजांची काय मर्जी आहे ते आम्हांला कळवावे.”
Currently Selected:
एज्रा 5: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.