YouVersion Logo
Search Icon

यहेज्केल 41

41
1नंतर त्याने मला मंदिराच्या गाभार्‍यात नेले; त्याने तेथले खांब मापले तेव्हा त्यांची रुंदी एका बाजूस सहा हात व दुसर्‍या बाजूस सहा हात भरली; ह्या गाभार्‍याची रुंदी मंडपाच्या रुंदीइतकी होती.
2द्वाराची रुंदी दहा हात होती, आणि त्याची एक बाजू पाच हात व दुसरी पाच हात होती; त्याने गाभार्‍याची लांबी चाळीस हात व रुंदी वीस हात मापली.
3मग आत जाऊन त्याने दरवाजाचा प्रत्येक खांब मापला तो दोन हात भरला; दरवाजाची उंची सहा हात व रुंदी सात हात भरली.
4त्याने गाभार्‍यासमोरच्या जागेची लांबी वीस हात व रुंदी वीस हात मापली; तो मला म्हणाला, “हे परमपवित्रस्थान होय.”
5त्याने मंदिराची भिंत सहा हात मापली; मंदिरासभोवती प्रत्येक बाजूस खोल्या होत्या; त्या प्रत्येकीची रुंदी चार हात भरली.
6बाजूस असलेल्या खोल्या एकीवर एक अशा तीन मजली असून त्या रांगेने तीस होत्या; मंदिराच्या आसपास असलेल्या खोल्यांसाठी जी भिंत होती तिला त्या लागलेल्या होत्या, तरी मंदिराच्या भिंतीला त्या लागलेल्या नव्हत्या.
7बाजूच्या कोठड्या इमारतीच्या सभोवार वरवर गेल्या तसतशा त्या रुंद होत गेल्या, आणि सभोवतालचा भाग वरवर गेला तसतसा तो रुंद होत गेला; म्हणून ह्या इमारतीची रुंदी वरच्या बाजूस अधिक होती, अशी ती रुंदी खालच्यापेक्षा मधल्या मजल्यात व तेथल्यापेक्षा वरच्या मजल्यात वाढत गेली.
8मंदिराला उंच पाया होता असे मी पाहिले; बाजूच्या कोठड्यांचे पाये सहा मोठ्या हातांची एक काठी भरले.
9बाजूच्या कोठड्यांच्या बाहेरील भिंतीची जाडी पाच हात होती; मंदिराच्या बाजूच्या कोठड्यांना लागून एक जागा खुली राहिली होती.2
10खोल्यांबाहेर मंदिराच्या आसपास वीस हातांचे अंतर होते.
11बाजूच्या कोठड्यांचे दरवाजे खुल्या जागेकडे होते; एक दरवाजा उत्तरेकडे व दुसरा दरवाजा दक्षिणेकडे होता; ह्या खुल्या जागेची रुंदी चोहोंकडून पाच हात होती.
12मंदिराच्या पश्‍चिमेस सोडलेल्या जागेसमोर जी इमारत होती तिची रुंदी सत्तर हात होती, तिची भिंत चोहोकडून पाच हात जाड होती, व तिची लांबी नव्वद हात होती.
13त्याने मंदिर शंभर हात मापले; आणि ती सोडलेली जागा व भिंतीसह इमारत ही शंभर हात लांब भरली.
14मंदिराची पुढली बाजू व पूर्वेकडील सोडलेली जागा ह्यांची रुंदी शंभर हात होती.
15मंदिरामागे असलेल्या त्या सोडलेल्या जागेपुढील इमारतीची लांबी व दोन्ही बाजूंना असलेले सज्जे, आतला गाभारा व अंगणातील देवड्या ही सगळी त्याने शंभर हात मापली.
16तीनही मजल्यांवर असलेले द्वारांचे उंबरठे, झरोके आणि उंबरठ्याभोवतालचे सज्जे ह्यांना तक्तपोशी होती; जमिनीपासून झरोक्यांपर्यंत भिंतीला तक्तपोशी केली होती व झरोकेही भरून काढले होते;
17मंदिरातल्या व बाहेरल्या बाजूची द्वारावरची जागा, सभोवतालच्या भिंतीचे आतले व बाहेरले अंग ही सगळी योग्य प्रमाणात होती.
18त्यांवर करूब व खजुरीची झाडे कोरली होती; दोन-दोन करूबांमध्ये एक-एक खजुरीचे झाड होते व प्रत्येक करुबाला दोन तोंडे होती;
19करूबाला एक खजुरीच्या झाडाकडे मनुष्याचे मुख व दुसर्‍या खजुरीच्या झाडाकडे तरुण सिंहाचे मुख होते; मंदिरावर चोहोकडे अशा प्रकारचे काम होते.
20जमिनीपासून दरवाजांच्या वरल्या भागापर्यंत गाभार्‍याच्या भिंतीवर करूब व खजुरीची झाडे कोरली होती.
21गाभार्‍याच्या द्वारांचे खांब चौरस होते; परमपवित्र-स्थानाच्या पुढल्या बाजूचे स्वरूप गाभार्‍याच्या सारखेच होते.
22वेदी लाकडाची असून तीन हात उंच व दोन हात लांब होती. तिचे कोपरे, तिची बैठक व तिच्या भिंती लाकडाच्या होत्या; त्याने मला म्हटले, “परमेश्वरापुढे असणारे हे मेज आहे.”
23गाभार्‍यास व परमपवित्रस्थानास दोन कवाडे होती.
24एका कवाडास दोन व दुसर्‍यास दोन अशा उघडझाक करता येणार्‍या दोन-दोन झडपा होत्या.
25भिंतीवरल्याप्रमाणे त्यांच्यावर म्हणजे गाभार्‍याच्या कवाडांवर करूब व खजुरीची झाडे कोरली होती, आणि बाहेरील देवडीच्या बाहेरच्या बाजूस मोठमोठ्या तुळया होत्या.
26देवडीच्या दोन्ही बाजूंना झरोके असून त्यांच्यावर खजुरीची झाडेही कोरली होती. मंदिराच्या बाजूच्या खोल्या व मोठमोठ्या तुळया अशा तर्‍हेच्या होत्या.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in