YouVersion Logo
Search Icon

यहेज्केल 38

38
गोगबाबत भविष्य
1परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की,
2“मानवपुत्रा, मागोग देशातील गोग, जो रोश, मेशेख व तुबाल ह्यांचा अधिपती, त्याच्याकडे आपले मुख करून त्याच्याविरुद्ध संदेश दे;
3त्याला सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, अरे गोगा, रोश, मेशेख व तुबाल ह्यांच्या अधिपती, मी तुझ्याविरुद्ध आहे.
4मी तुला पळ काढायला लावीन; तुझ्या जाभाडात गळ टोचून तुला बाहेर काढीन; तुझे सर्व सैन्य, घोडे व स्वार ह्यांना बाहेर काढीन; सर्व जण सुंदर पोशाख ल्यालेले, कवच व ढाल धारण केलेले, तलवारी परजणारे अशांचा तो मोठा समूह आहे;
5त्यांच्यासह ढाल व शिरस्त्राण धारण केलेले पारस, कूश व पूट,
6गोमर व त्याचा सेनासमूह, अगदी उत्तरेकडील तोगार्माचे घराणे व त्याचा सर्व सेनासमूह, तसेच अनेक जातींचे लोक ह्यांना तुझ्यासह बाहेर काढीन.
7तू व तुझ्या पक्षाकडे जमा झालेले सर्व समूह असे तुम्ही तयार व्हा, तयार व्हा; तू त्यांचा नायक हो.
8बहुत दिवस लोटल्यावर तुझा समाचार घेण्यात येईल; शेवटल्या वर्षी जो देश तलवारीपासून वाचेल व ज्या देशात अनेक राष्ट्रांतून जमा केलेले लोक पुनःपुन्हा उद्ध्वस्त होत असलेल्या इस्राएल पर्वतांवर वस्ती करतील, त्या देशावर तू चढाई करशील; तथापि त्या लोकांना राष्ट्रांतून बाहेर आणले असून ते सर्व निर्भय राहतील.
9तू तुफानासारखा चालून येशील, भूमीला मेघ झाकतो त्यासारखा तू होशील; तू, तुझे सर्व सेनासमूह व तुझ्यासह अनेक राष्ट्रांचे लोक असे तुम्ही सर्व याल.
10प्रभू परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी असे होईल की तुझ्या मनात कल्पना येतील आणि तू दुष्ट युक्ती योजशील.
11तू म्हणशील, ‘ज्या प्रदेशातील गावांना तटबंदी नाही त्यांवर मी चढाई करीन; जे स्वस्थपणे निर्भय राहत आहेत, व ज्यांपैकी कोणालाही कोट, अडसर, वेशी वगैरे काही नाहीत त्यांच्यावर मी चालून जाईन;’
12लोकांची मालमत्ता हिरावण्यासाठी व लुटालूट करण्यासाठी; ज्या ओसाड ठिकाणी पुन्हा वस्ती झाली आहे त्यावर माझा हात चालवावा, आणि निरनिराळ्या राष्ट्रांतून जमा केलेल्या ज्या लोकांनी गुरेढोरे व मालमत्ता संपादन केली आहे व जे पृथ्वीच्या मधल्या प्रदेशी राहत आहेत त्यांच्यावर हात चालवावा म्हणून मी चालून जाईन.
13शबा, ददान आणि तार्शीश येथले व्यापारी व त्यांचे सर्व तरुण सिंह तुला म्हणतील, ‘तू लुटालूट करण्यास आलास काय? तू मालमत्ता हरण करण्यासाठी आपला सेनासमूह जमवला आहेस काय? सोनेरुपे न्यावे, गुरेढोरे व माल न्यावा आणि मोठी लूट करावी म्हणून तू आला आहेस काय?’
14ह्यास्तव हे मानवपुत्रा, संदेश देऊन गोगाला सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, जेव्हा माझे लोक इस्राएल निर्भय वसतील तेव्हा हे तुला कळणार नाही काय?
15तू आपल्या स्थानांहून येशील; उत्तरेकडल्या दूरदूरच्या देशांतून अश्वारूढ झालेला मोठा लोकसमुदाय, मोठा दळभार तू बरोबर घेऊन येशील;
16अभ्राने देश झाकावा तसा तू माझे लोक इस्राएल ह्यांच्यावर चाल करून येशील; हे गोगा, शेवटल्या दिवसांत असे घडेल की मी राष्ट्रांदेखत तुझ्या द्वारे आपली पवित्रता प्रकट करीन, तेव्हा राष्ट्रांनी मला ओळखावे म्हणून मी तुला माझ्या देशावर आणीन.
17प्रभू परमेश्वर म्हणतो, माझे सेवक जे इस्राएलाचे संदेष्टे त्यांच्या द्वारे पुरातन काळी ज्याविषयी मी बोललो होतो आणि त्या काळी बहुत वर्षे त्यांनी ज्याविषयी असा संदेश दिला होता की, मी तुला त्यांच्यावर चाल करण्यास आणीन, तो तूच ना?
18प्रभू परमेश्वर म्हणतो, गोग इस्राएल देशावर चाल करील त्या दिवशी असे होईल की माझ्या नाकपुड्या क्रोधाने फुरफुरतील.
19कारण मी ईर्ष्येने, क्रोधाग्नीने तप्त होऊन बोललो आहे की खरोखर त्या दिवशी इस्राएल देशात मोठा भूकंप होईल;
20समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, वनातले पशू, जमिनीवर रांगणारे सर्व प्राणी व भूमीवर राहणारी सर्व माणसे माझ्यापुढे थरथर कापतील; पर्वत नष्ट होतील, कडे खचतील, हरएक कोट कोसळून जमीनदोस्त होईल.
21प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या सर्व पर्वतांकडे त्याच्याविरुद्ध मी तलवार बोलावीन; प्रत्येकाची तलवार आपल्या भावावर चालेल.
22मरी व रक्तपात ह्यांनी मी त्याच्याबरोबर वाद मांडीन; त्याच्यावर, त्याच्या सैन्यावर पाऊस, मोठ्या गारा, अग्नी व गंधक ह्यांची धो-धो वृष्टी मी त्याच्याबरोबर असलेल्या अनेक लोकसमूहांवर करीन.
23ह्या प्रकारे मी आपला महिमा व पवित्रता प्रकट करीन, आणि बहुत राष्ट्रांना माझी प्रत्यक्ष ओळख होईल; तेव्हा त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in