यहेज्केल 33
33
पहारेकर्याचे कर्तव्य
(यहे. 3:16-21)
1परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की,
2“मानवपुत्रा, तू आपल्या बांधवांबरोबर बोल. त्यांना सांग की, मी देशावर तलवार आणीन तेव्हा जर देशातल्या लोकांनी आपणांपैकी एकास निवडून पहारेकरी नेमले;
3देशावर तलवार येत आहे असे पाहून शिंग फुंकून त्याने लोकांना सावध केले;
4आणि त्या शिंगाचा शब्द ऐकून कोणी सावध झाला नाही म्हणून तलवारीने येऊन त्याला नेले, तर त्याचे रक्त त्याच्याच डोक्यावर राहील.
5शिंगाचा शब्द ऐकून तो सावध झाला नाही म्हणून त्याचे रक्त त्याच्याच डोक्यावर राहील; तो सावध झाला असता तर त्याने आपला जीव वाचवला असता.
6पण जर पहारेकर्याने तलवार येताना पाहून शिंग वाजवले नाही व लोकांना सावध केले नाही आणि तलवारीने येऊन त्यांपैकी कोणास नेले तर तो आपल्या अधर्मानेच मरेल, तथापि त्याच्या रक्तपाताचा जाब मी त्या पहारेकर्याजवळ मागेन.
7तर हे मानवपुत्रा, मी तुला इस्राएल घराण्याचा पहारेकरी नेमले आहे, म्हणून तू माझ्या तोंडचे वचन ऐकून माझ्या वतीने त्यांना सावध कर.
8हे दुर्जना, तू मरशील असे मी कोणा दुर्जनास म्हटले असता जर त्याला त्याच्या मार्गापासून मागे फिरण्याविषयी तू बोलून त्याला सावध केले नाहीस तर तो आपल्या अधर्मानेच मरेल खरा, पण त्याच्या रक्तपाताचा जाब मी तुझ्याजवळ मागेन.
9त्या दुर्जनाने आपल्या मार्गावरून मागे फिरावे म्हणून तू त्याला सावध केले असताही तो आपल्या मार्गावरून मागे न फिरल्यास तो आपल्या अधर्मानेच मरेल खरा, पण तू आपल्या जिवाचा बचाव करशील.
देवाचा मार्ग न्याय्य आहे
(यहे. 18:21-32)
10हे मानवपुत्रा, तू इस्राएल घराण्यास सांग, तुम्ही म्हणता की, ‘आमचे अपराध व आमची पापे ह्यांचा भार आमच्यावर आहे व त्यामुळे आम्ही क्षय पावत आहोत, आम्ही कसे जगणार?’
11त्यांना सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, कोणी दुर्जन मरावा ह्यात मला काही संतोष नाही तर त्याने आपल्या मार्गावरून मागे फिरून जगावे ह्यात मला संतोष आहे; फिरा, आपल्या मार्गावरून मागे फिरा; इस्राएल वंशजहो, तुम्ही का मरता?
12तर हे मानवपुत्रा, तू आपल्या बांधवांना सांग, नीतिमान पातक करील तर त्याची नीतिमत्ता त्याला मुक्त करणार नाही; आणि दुर्जन आपल्या पापमार्गावरून मागे फिरेल तर त्याच्या दुष्टतेमुळे त्याचे पतन होणार नाही; तसेच नीतिमान पाप करू लागला तर तो आपल्या नीतिमत्तेमुळे वाचणार नाही.
13मी कोणा नीतिमानास म्हणालो की, ‘तू खास वाचशील,’ आणि त्याने आपल्या नीतिमत्तेवर भिस्त ठेवून दुष्कर्म केले तर त्याची सर्व नीतिमत्ता जमेस धरण्यात येणार नाही; त्याने केलेल्या दुष्कर्मामुळे तो मरेलच.
14तसेच मी कोणा दुर्जनास म्हणालो की, ‘तू मरशीलच,’ आणि तो आपल्या पापांच्या मार्गावरून फिरून नीती व न्याय आचरील;
15तो दुर्जन गहाण परत करील, हरण केलेले परत देईल, आणि काहीएक अधर्म न करता जीवनाच्या नियमांप्रमाणे चालेल तर तो जगेलच, मरायचा नाही.
16त्याने केलेली सर्व पातके त्याच्या हिशेबी धरली जाणार नाहीत; नीतीने व न्यायाने वागत असल्यामुळे तो जगेलच.
17तरी तुझे बांधव म्हणतात, ‘प्रभूचा मार्ग नीट नाही;’ पण त्यांचेच मार्ग नीट नाहीत.
18कोणी नीतिमान आपल्या नीतिमत्तेस मुकून पाप करू लागला तर त्यामुळे तो मरेलच.
19तथापि दुर्जन आपले दुराचरण सोडून नीतीने व न्यायाने वागला तर त्यामुळे तो वाचेल.
20तरीपण तुम्ही म्हणता की, ‘प्रभूचा मार्ग नीट नाही.’ अहो इस्राएल वंशजांनो, मी तुमचा प्रत्येकाचा न्याय तुमच्या मार्गाप्रमाणे करीन.”
यरुशलेमेच्या पाडावाचे वृत्त
21आमच्या बंदिवासाच्या बाराव्या वर्षी, दहाव्या महिन्याच्या पंचमीस यरुशलेमेहून एक मनुष्य सुटून पळून आला आणि त्याने सांगितले की, ‘नगराचा नाश झाला आहे.’
22तो पळून आलेला मनुष्य येऊन पोहचला त्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी परमेश्वराचा वरदहस्त माझ्यावर आला होता; तो मनुष्य सकाळी माझ्याकडे येण्यापूर्वी देवाने माझे तोंड उघडले होते; माझे तोंड उघडल्यावर मी काही मुका नव्हतो.
23तेव्हा परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की,
24“मानवपुत्रा, इस्राएल देशाच्या उजाड झालेल्या प्रदेशात राहणारे असे म्हणत आहेत की, ‘अब्राहाम एक असून त्याला ह्या देशाचे वतन मिळाले; आम्ही तर बहुत आहोत आणि देश आम्हांला वतनादाखल दिला आहे.’
25ह्यास्तव त्यांना सांग, प्रभू परमेश्वर असे म्हणतो की : तुम्ही रक्तासहित मांस खाता, आपल्या मूर्तींकडे डोळे लावता आणि रक्तपात करता; असे जे तुम्ही त्या तुम्हांला ह्या देशाचे वतन मिळेल काय?
26तुम्ही आपल्या तलवारीवर भरवसा ठेवून अमंगळ कर्मे करता, तुम्ही प्रत्येक जण आपल्या शेजार्याची स्त्री भ्रष्ट करता; अशा तुम्हांला ह्या देशाचे वतन मिळेल काय?
27तू त्यांना सांग, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, उजाड झालेल्या प्रदेशात राहणारे तलवारीने पडतील, उघड्या मैदानात असलेल्यांना मी वनपशूंना खाऊन टाकायला देईन, दुर्गांत व गुहांत राहणारे मरीने मरतील.
28मी हा देश ओसाडी व विस्मय ह्यांचा विषय करीन, त्यांच्या सामर्थ्याचा गर्व जिरेल; इस्राएलाचे पर्वत वैराण होतील, कोणी त्या वाटेने जाणार नाही.
29त्यांनी केलेल्या सर्व अमंगळ कृत्यांमुळे मी देश ओसाडी व विस्मय ह्यांचा विषय करीन, तेव्हा त्यांना समजेल की, मी परमेश्वर आहे.
30हे मानवपुत्रा, तुझे बांधव भिंतींजवळ, दरवाजांजवळ तुझ्याविषयी बोलत आहेत; एक दुसर्याला, भाऊ भावाला म्हणतो, ‘चला, परमेश्वराकडून काय वचन आले ते ऐकू या.’
31लोक येतात तसे ते तुझ्याकडे येऊन माझ्या लोकांच्या रीतीप्रमाणे तुझ्यापुढे बसतात, ते तुझी वचने ऐकतात पण त्याप्रमाणे चालत नाहीत; ते तोंडाने गोडगोड गोष्टी बोलतात, पण त्यांचे मन लोभवश झाले आहे.
32आणि पाहा, एखादा मधुर कंठाचा व वाद्ये चांगली वाजवणारा प्रेमगीत गातो तसा तू त्यांना वाटतोस, कारण ते तुझी वचने ऐकतात पण त्याप्रमाणे चालत नाहीत.
33तरीपण हे घडून येईल, (पाहा, ते आता घडत आहे,) तेव्हा आपल्यात एक संदेष्टा होता, असे त्यांना समजून येईल.”
Currently Selected:
यहेज्केल 33: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.