YouVersion Logo
Search Icon

यहेज्केल 30

30
मिसराचा नाश
1पुन्हा परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की,
2“मानवपुत्रा, संदेश देऊन सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, जळो तो दिवस, असा हाहाकार करा.
3कारण दिवस समीप आला आहे; परमेश्वराचा दिवस येऊन ठेपला आहे; तो अभ्रमय दिवस आहे; तो विधर्म्याचा शासनदिन आहे.
4तेव्हा मिसर देशावर तलवार येईल, लोकांचा वध होऊन ते मिसरात पडतील तेव्हा कूशातील लोकांना वेणा येतील; मिसराचा समुदाय हरण केला जाईल, त्याचे पाये मोडून टाकतील.
5कूशी, पूटी, लूदी, सर्व मिश्र जाती व कूबी आणि त्यांच्याबरोबर करारमदार केलेल्या देशांचे लोक त्यांच्यासह तलवारीने पडतील.
6प्रभू परमेश्वर म्हणतो, मिसर देशाला आधार देणारे लोक पडतील, त्यांच्या पराक्रमाचा तोरा उतरेल; मिग्दोलापासून सवेनेपर्यंत ते तलवारीने पडतील, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
7ते वैराण देशामध्ये उद्ध्वस्त होऊन पडतील, उजाड नगरांमध्ये त्यांची नगरे उद्ध्वस्त होऊन पडतील.
8मी मिसरास आग लावीन व त्याचे सर्व साहाय्यकर्ते नष्ट होतील, तेव्हा त्यांना समजेल की, मी परमेश्वर आहे.
9त्या दिवशी त्या निश्‍चिंत कूशी लोकांना घाबरवून सोडण्यासाठी माझ्याकडील जासूद जहाजात बसून जातील; मिसरावर प्रसंग आला तेव्हाच्याप्रमाणे त्यांना वेदना होतील; कारण पाहा, तो प्रसंग येत आहे.
10प्रभू परमेश्वर म्हणतो, बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याच्या हस्ते मी मिसराचा लोकसमुदाय नाहीसा करीन.
11तो व सर्व लोकांमध्ये भयंकर असे त्याचे लोक ह्यांना ह्या देशाचा नाश करायला आणीन; ते मिसरावर आपल्या तलवारी उपसून वधलेल्या मनुष्यांनी सर्व देश भरून टाकतील.
12मी नद्या कोरड्या करीन, ही भूमी विकून दुष्ट मनुष्यांच्या हाती देईन आणि परक्यांच्या हातून हा देश व ह्यातले सर्वकाही ह्यांची नासधूस करवीन; मी परमेश्वर हे बोललो आहे.
13प्रभू परमेश्वर म्हणतो, मी नोफातील दैवतांचा उच्छेद करीन, मूर्ती नाहीतशा करीन आणि मिसर देशातला कोणीही ह्यापुढे अधिपती होणार नाही असे करीन; मिसर देश दहशतीने भरीन.
14मी पथ्रोस उजाड करीन, सोअनास आग लावीन, नो ह्याला न्यायदंड करीन.
15मिसरचा दुर्ग जो सीन त्यावर मी आपल्या क्रोधाग्नीचा वर्षाव करीन व नो येथील लोकसमुदायाचा उच्छेद करीन.
16मी मिसरास आग लावीन; सीन वेणा देईल; नो छिन्नभिन्न होईल, नोफावर तर भरदिवसा वैरी उठतील.
17आवेन व पी-बेसेथ येथील तरुण पुरुष तलवारीने पडतील; ही नगरे जिंकली जातील.
18मिसर्‍यांनी घातलेले जोखड मी मोडून टाकीन व त्यांच्या पराक्रमाचा गर्व जिरेल तेव्हा तहपन्हेस येथे दिवस अंधकारमय होईल, ते अभ्राने आच्छादले जाईल. त्याच्या कन्या बंदिवान होऊन जातील.
19ह्या प्रकारे मी मिसरास न्यायदंड करीन; तेव्हा त्यांना समजेल की, मी परमेश्वर आहे.”
20तेव्हा अकराव्या वर्षी, पहिल्या महिन्याच्या सप्तमीस परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की,
21“मानवपुत्रा, मिसरी राजा फारो ह्याचा भुज मी मोडला आहे; पाहा, त्याला पुन्हा तलवार धरण्याची शक्‍ती यावी म्हणून त्याला औषधोपचार करून पट्टी बांधायची ती कोणी बांधली नाही.
22ह्यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, मी मिसरी राजा फारो ह्याच्याविरुद्ध आहे; त्याचा शाबूत व मोडका असे दोन्ही हात मी तोडून टाकीन, त्याच्या हातातून तलवार गळेल असे मी करीन.
23मी मिसर्‍यांना राष्ट्रांमध्ये पांगवीन, त्यांना देशोधडीस लावीन,
24मी बाबेलच्या राजाचे भुज बळकट करीन, मी आपली तलवार त्याच्या हाती देईन; पण मी फारोचे भुज असे मोडीन की, एखाद्या भयंकर घायाळ झालेल्या मनुष्याप्रमाणे तो त्याच्यापुढे आक्रोश करील.
25मी बाबेलच्या राजाचे भुज बळकट करीन आणि फारोचे भुज गळतील; मी मिसर देशावर उगारण्यासाठी बाबेलच्या राजाच्या हाती तलवार देईन तेव्हा त्यांना समजेल की, मी परमेश्वर आहे.
26मी मिसर्‍यांना राष्ट्रांमध्ये विखरीन, त्यांना देशोधडीस लावीन. तेव्हा त्यांना समजेल की, मी परमेश्वर आहे.”

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in