YouVersion Logo
Search Icon

यहेज्केल 3

3
1तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, तुझ्यापुढे जे आले आहे ते सेवन कर; हा पट सेवन कर व जाऊन इस्राएल घराण्याबरोबर बोल.”
2तेव्हा मी आपले तोंड उघडले आणि त्याने मला तो पट सेवन करायला लावले.
3तो मला म्हणाला, मानवपुत्रा, “जो पट मी तुला देतो तो पोटात जाऊ दे, त्याने आपली आतडी भर.” मी तो सेवन केला तेव्हा तो माझ्या तोंडात मधासारखा मधुर लागला.
4मग तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, जा, इस्राएल घराण्याकडे जा आणि त्यांच्याजवळ माझी वचने बोल.
5कारण बाबर ओठांच्या व जड जिभेच्या लोकांकडे नव्हे, तर इस्राएल घराण्याकडे मी तुला पाठवतो;”
6ज्यांची बोली तुला समजत नाही अशी बाबर ओठांची व जड जिभेची अनेक राष्ट्रे आहेत, त्यांच्याकडे मी तुला पाठवत नाही. त्यांच्याकडे मी तुला पाठवले असते तर खरोखर त्यांनी तुझे ऐकले असते.
7पण इस्राएल घराणे तुझे ऐकणार नाही, कारण माझे ते ऐकणार नाहीत; इस्राएलाचे सगळे घराणे कठीण कपाळाचे व कठीण हृदयाचे आहे.
8पाहा, मी त्यांच्या मुद्रेसारखी तुझी मुद्रा वज्रप्राय करतो. त्यांच्या कपाळासारखे तुझे कपाळ कठीण करतो.
9मी तुझे डोके गारगोटीपेक्षा वज्रप्राय कठीण करतो; त्यांना तू भिऊ नकोस, त्यांच्या कटाक्षांनी कापू नकोस; ती तर फितुरी जात आहे.”
10आणखी तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, जी सर्व वचने मी तुला सांगतो ती आपल्या हृदयात साठव, ती कानाने ऐक.
11जा, पकडून नेलेल्या तुझ्या लोकांच्या वंशजांकडे जाऊन त्यांच्याशी बोल; त्यांना सांग की प्रभू परमेश्वर असे म्हणतो; मग ते तुझे ऐकोत किंवा न ऐकोत.”
12तेव्हा आत्म्याने मला उचलून धरले आणि माझ्यामागून त्याच्या स्थानातून, परमेश्वराच्या वैभवाचा धन्यवाद असो, असा प्रचंड वेगाचा शब्द झालेला मी ऐकला.
13आणि त्या प्राण्यांचे पंख एकमेकांना लागत त्यांचा आवाज आणि त्यांच्या बाजूंना असलेल्या चाकांचा आवाज, असा प्रचंड वेगाचा शब्द मी ऐकला.
14मग आत्म्याने मला उचलून धरले, मी आपल्या मनाच्या संतापाने क्लेश पावलो, तेव्हा परमेश्वराचा वरदहस्त जोराने माझ्यावर आला.
15त्यानंतर धरून नेलेले लोक राहत असत तेथे त्यांच्याकडे खबार नदीच्या तीरी तेल-अबीब ह्या ठिकाणी मी आलो आणि ते बसले होते तेथे मी बसलो; भयचकित होऊन सात दिवस त्यांच्यामध्ये मी बसून राहिलो.
इस्राएल घराण्यावर पहारेकरी
(यहे. 33:1-9)
16मग ते सात दिवस लोटल्यावर परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले ते असे :
17“मानवपुत्रा, मी तुला इस्राएल घराण्यावर पहारेकरी नेमले आहे, म्हणून तू माझ्या तोंडचे वचन ऐकून माझ्या वतीने त्यांना बजावून सांग.
18‘तू खातरीने मरशील’ असे मी पातक्यास म्हणालो असता तू जर त्याला बजावले नाही व पातक्याने आपला कुमार्ग सोडून जगावे म्हणून तू त्याला बजावून सांगितले नाहीस, तर तो पातकी आपल्या दुष्टाईमुळे मरेल; पण त्याच्या रक्ताचा झाडा मी तुझ्या हातून घेईन.
19तू त्या पातक्यास बजावले असून त्याने आपली दुष्टाई व कुमार्ग ही सोडली नाहीत, तर तो आपल्या दुष्टाईमुळे मरेल आणि तू आपला जीव वाचवला असे होईल.
20तसेच नीतिमान आपली नीतिमत्ता सोडून अधर्म करू लागला व मी त्याच्यापुढे अडथळा ठेवला तर तो मरेल; तू त्याला बजावले नसल्यास तो आपल्या पातकामुळे मरेल व त्याने केलेली नीतिमत्ता जमेस धरण्यात येणार नाही; पण त्याच्या रक्ताचा झाडा मी तुझ्या हातून घेईन.
21पाप करू नये असे तू त्या नीतिमानास बजावले, व त्याने पाप केले नाही, तर त्याने बोध घेतल्यामुळे तो जगेल आणि तू आपला जीव वाचवला असे होईल.”
संदेष्टा मुका होतो
22तेव्हा तेथे परमेश्वराचा वरदहस्त माझ्यावर आला व तो मला म्हणाला, “ऊठ, खोर्‍यात जा; तेथे मी तुझ्याबरोबर बोलेन.”
23मग मी उठून खोर्‍यात गेलो तेव्हा खबार नदीजवळ मी पाहिले होते तसे परमेश्वराचे तेज तेथेही माझ्यासमोर उभे होते; तेव्हा मी उपडा पडलो.
24नंतर आत्म्याने माझ्या ठायी प्रवेश करून मला माझ्या पायांवर उभे केले; त्याने माझ्याबरोबर भाषण करून म्हटले, जा, तू स्वतःला आपल्या घरात कोंडून घे.
25हे मानवपुत्रा, पाहा, तुला बंधनांनी जखडून बांधतील आणि तुला बाहेर त्या लोकांमध्ये जाता येणार नाही;
26तुझी जीभ तुझ्या टाळूस चिकटेल असे मी करीन, म्हणजे तू मुका होशील आणि तू त्यांचा निषेधकर्ता होणार नाहीस; कारण ते फितुरी घराणे आहे.
27तरीपण मी तुझ्याबरोबर बोलेन, तेव्हा मी तुझे तोंड उघडीन, मग तू त्यांना सांग की, ‘प्रभू परमेश्वर म्हणतो’; ज्याला ऐकायचे असेल तो ऐको, ज्याला ऐकायचे नसेल, तो न ऐको; ते तर फितुरी घराणे आहे.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in