YouVersion Logo
Search Icon

यहेज्केल 25

25
अम्मोन्यांविषयी भविष्य
1परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की,
2“मानवपुत्रा, अम्मोन वंशजांकडे आपले मुख करून त्यांच्याविषयी संदेश दे;
3अम्मोन वंशजांना म्हण, प्रभू परमेश्वराचे वचन ऐका; प्रभू परमेश्वर असे म्हणतो, माझे पवित्रस्थान अपवित्र करण्यात आले, इस्राएल देश ओसाड करण्यात आला, यहूदाचे घराणे बंदिवान करून नेण्यात आले तेव्हा तू ‘वाहवा’ असे म्हटलेस;
4म्हणून पाहा, मी पूर्वेकडील लोकांना तुझा ताबा देईन, ते तुझ्यात छावणी करून राहतील व आपली घरे बांधतील; ते तुझ्यातली फळे खातील व तुझे दूध पितील.
5मी राब्बा नगरास उंटाचा तबेला करीन, अम्मोन वंशजांचा मेंढ्याबकर्‍या बसायचा वाडा करीन; तेव्हा तुम्हांला समजेल की मी परमेश्वर आहे.
6कारण प्रभू परमेश्वर म्हणतो, तू इस्राएल देशाविषयी टाळ्या पिटल्यास, थैथै नाचलास व त्याची दुर्दशा पाहून तू मनापासून द्रोहपूर्वक आनंद केलास;
7म्हणून पाहा, मी आपला हात तुझ्यावर उगारीन, मी तुला राष्ट्रांच्या हाती लूट म्हणून देईन, तुझा राष्ट्रांतून उच्छेद करीन, देशांमधून तुला नाहीसे करीन, तुला मी नष्ट करीन; तेव्हा तुला समजेल की मी परमेश्वर आहे.
मवाबाविषयी भविष्य
8प्रभू परमेश्वर असे म्हणतो, मवाब व सेईर म्हणतात की, ‘पाहा, यहूदाचे घराणे इतर राष्ट्रांसारखेच आहे;’
9म्हणून पाहा, मी मवाबाचा स्कंधप्रदेश उघडा करीन, त्याची नगरे, त्याच्या सीमेतली नगरे, देशाला भूषण अशी बेथ-यशिमोथ, बाल-मौन, किर्याथाईम ही नगरे
10व अम्मोन वंशजांचा देश, ही पूर्वेकडील लोकांना स्वारी करण्यास खुली करून देईन; त्यांचा मी त्यांना ताबा देईन, म्हणजे मग अम्मोन वंशजांचे नाव राष्ट्रांमध्ये ह्यापुढे कोणी काढणार नाही.
11मवाबावर मी न्यायदंड आणीन; तेव्हा त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे.
अदोमाविषयी भविष्य
12प्रभू परमेश्वर म्हणतो, अदोमाने यहूदाच्या घराण्याचा सूड उगवण्याच्या बुद्धीने वर्तन केले, त्याने त्याच्यावर सूड उगवला हे पातक केले;
13म्हणून प्रभू परमेश्वर म्हणतो, मी अदोमावर आपला हात उगारीन, त्यांतून मनुष्य व पशू ह्यांचा संहार करीन. तो तेमानापासून पुढे वैराण करीन, ददानापर्यंत लोक तलवारीने पडतील.
14मी आपले लोक इस्राएल ह्यांच्या हातून अदोमाचा सूड घेईन; माझ्या आवेशयुक्त क्रोधानुसार ते अदोमाची वाट लावतील; त्यांना माझ्या सुडाचा अनुभव येईल, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
पलिष्ट्यांविषयी भविष्य
15प्रभू परमेश्वर म्हणतो, पलिष्ट्यांनी सूड घेण्याची कृती केली आहे, मनात आकस धरून नाश करण्याच्या बुद्धीने त्यांनी निरंतरच्या वैरभावाने सूड घेतला आहे;
16म्हणून प्रभू परमेश्वर म्हणतो, मी आपला हात पलिष्ट्यांवर उगारीन, करेथ्यांचा संहार करीन आणि समुद्रकिनार्‍यावरील अवशिष्ट राहिलेल्यांचा नाश करीन.
17त्यांना संतापाने शिक्षा करून मी त्यांचा भयंकर सूड घेईन; मी त्यांच्यावर सूड उगवीन तेव्हा त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे.”

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in