यहेज्केल 17
17
गरुडांचा व द्राक्षवेलीचा दृष्टान्त
1परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की,
2“मानवपुत्रा, इस्राएल घराण्यास कोडे घाल, हा दृष्टान्त कथन कर;
3त्यांना सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, मोठाल्या पंखांचा, लांब पिसार्यांचा व चित्रविचित्र पिसांनी युक्त असा एक मोठा गरुड लबानोन पर्वतावर आला; त्याने गंधसरूची शेंड्याकडील एक डाहळी तोडून घेतली;
4त्याने त्यांतली अगदी वरची डाहळी तोडून व्यापार्यांच्या1 देशात नेली व सौदागरांच्या एका शहरात लावली.
5त्याने देशातले काही बी घेऊन ते पिकाऊ जमिनीत पेरले; वाळुंज लावतात तसे ते विपुल पाण्याजवळ लावले.
6ते वाढून त्याची आखूड पण पसरलेली अशी द्राक्षलता झाली; तिच्या फांद्या त्या गरुडाकडे झुकलेल्या असून तिची मुळे त्याच्याखाली गेली होती; ती वाढून मोठी द्राक्षवेल झाली; तिला फांद्या फुटल्या व पाला आला.
7दुसरा एक मोठा गरुड होता, त्याला फार पिसे होती व मोठाले पंख होते; पाहा, त्याने लावलेल्या वाफ्यांतून आपणास पाणी मिळावे म्हणून त्या द्राक्षवेलीने आपली मुळे त्याकडे वाकवली व आपल्या फांद्या त्याकडे झुकवल्या.
8त्या रोप्यास फांद्या फुटून तो फळास यावा आणि त्याची भव्य द्राक्षवेल व्हावी म्हणून तो एका सुपीक मळ्यात विपुल पाण्याजवळ लावला होता.
9प्रभू परमेश्वर म्हणतो, सांग बरे, ती जीव धरील काय? ती सुकून जावी म्हणून तिला मुळासकट उपटून तिची फळे तोडून टाकणार नाहीत काय? तिची सर्व नवी पालवी वाळून जाईल; तिची मुळे उपटून टाकायला मोठे सामर्थ्य आणि पुष्कळ लोक लागणार नाहीत.
10पाहा, तिची लागवड झाली तरी ती जीव धरील काय? पूर्वेकडील वारा तिला लागला म्हणजे ती सुकणार नाही काय? ती ज्या वाफ्यात वाढली त्यातच ती मरून जाईल.”
11पुन्हा परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की,
12“ह्या बंडखोर घराण्याला सांग, ह्या गोष्टी काय आहेत हे तुम्हांला समजत नाही काय? त्यांना सांग की, पाहा, बाबेलच्या राजाने यरुशलेमेस येऊन तिचा राजा व तिचे सरदार ह्यांना धरले व आपणाकडे बाबेल येथे आणवले.
13तेव्हा त्याने राजवंशातल्या एका पुरुषास निवडून त्याच्याबरोबर करार केला व त्याच्याकडून प्रतिज्ञा करवली आणि त्याने देशातले सर्व कर्ते पुरुषही नेले;
14ह्यासाठी की ते राष्ट्र नीच व्हावे, त्याने आपले डोके वर करू नये, परंतु त्याचा करार पाळल्यानेच ते कायम राहावे.
15पण त्याने त्यांच्याविरुद्ध फितुरी करून मिसर देशाने आपणास घोडे व बहुत लोक द्यावेत म्हणून त्याच्याकडे आपले जासूद पाठवले. त्याला यश मिळेल काय? ज्याने अशी गोष्ट केली तो निभावेल काय? त्याने करार मोडला आहे तरी तो निभावेल काय?
16प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, ज्याने त्याला राजा केले, ज्याच्याशी केलेली आणभाक त्याने तुच्छ मानली, ज्याचा करार त्याने मोडला, त्या राजाच्या निवासस्थानी, बाबेलात तो मरेल.
17जेव्हा पुष्कळांचा फडशा उडवण्यासाठी शत्रू मोर्चे लावतील व बुरूज बांधतील तेव्हा युद्धप्रसंगी फारोला मोठे सैन्य व बहुत लोक बरोबर घेऊन त्याची कुमक करता येणार नाही.
18त्याने शपथ तुच्छ मानून करार मोडला; पाहा, त्याने हातावर हात मारला तरी त्याने हे सर्व केले; तो निभावणार नाहीच.
19ह्यास्तव परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, त्याने माझी प्रतिज्ञा तुच्छ मानली, त्याने माझा करार मोडला ह्याचे प्रतिफळ मी त्याच्या शिरी लादीन.
20मी आपले जाळे त्याच्यावर टाकीन; तो माझ्या पाशात सापडेल; मी त्याला बाबेलास नेईन; त्याने माझ्याबरोबर केलेल्या विश्वासघातासंबंधाने तेथे मी त्याची झडती घेईन.
21त्याच्या सर्व सैन्यातले पळणारे तेवढे सर्व तलवारीने पडतील; जे उरतील त्यांची दाही दिशांना दाणादाण होईल; तेव्हा तुम्हांला समजेल की मी परमेश्वर हे बोललो आहे.”
22प्रभू परमेश्वर म्हणतो, “मी उंच गंधसरूच्या शेंड्यावरील एक डाहळी तोडून ती लावीन, त्याच्या अगदी वरच्या कोवळ्या फांद्यांतली एक घेऊन ती एका मोठ्या उंच पर्वतावर लावीन;
23मी इस्राएलाच्या उंच पर्वतावर ती लावीन; तिला फांद्या फुटतील, फळे येतील, तिचा उत्तम गंधसरू होईल; म्हणजे मग त्याच्याखाली सर्व पक्षिकुळे राहतील; त्याच्या शाखांच्या छायेत ती वस्ती करतील.
24वनांतील सर्व वृक्षांना कळेल की मी परमेश्वराने उंच वृक्षास नीच केले आहे व नीच वृक्षास उंच केले आहे, आणि हिरव्या झाडास सुकवले आहे व शुष्क झाडास फलद्रूप केले आहे; मी परमेश्वर हे बोललो आहे व मी हे केलेही आहे.”
Currently Selected:
यहेज्केल 17: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.