YouVersion Logo
Search Icon

यहेज्केल 12

12
यहेज्केल बंदिवासाचे चित्र दर्शवतो
1परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की,
2“मानवपुत्रा, तू फितुरी घराण्यात राहत आहेस, त्यांना डोळे असून दिसत नाही, कान असून ऐकू येत नाही; कारण ते फितुरी घराण्यातले आहेत.
3ह्याकरता हे मानवपुत्रा, तू देशांतर करण्यास लागणारी सामग्री सिद्ध कर, व भरदिवसा त्यांच्यादेखत निघून जा; त्यांच्यादेखत आपले ठिकाण सोडून दुसर्‍या ठिकाणी जा; न जाणो हे कदाचित त्यांच्या लक्षात येईल; ते तर बंडखोर घराण्यातले आहेत.
4देशांतरास जाताना सामग्री बाहेर काढतात तसे तू भरदिवसा त्यांच्यादेखत आपले सामानसुमान बाहेर काढ, व देशांतरास निघतात तसा संध्याकाळी त्यांच्यादेखत निघून जा.
5त्यांच्यादेखत तटास आरपार भोक पाड व त्यातून आपले सामानसुमान ने.
6त्यांच्यादेखत ते खांद्यावर घे व अंधार पडला म्हणजे ते घेऊन जा; तू आपले मुख झाक म्हणजे भूमी तुला दिसायची नाही; कारण मी तुला इस्राएल घराण्यास चिन्हवत नेमले आहे.”
7मला आज्ञा झाली तसे मी केले; देशांतरास लागणारी सामग्री नेतात तसे मी भरदिवसा आपले सामानसुमान बाहेर काढले व संध्याकाळी मी तटास आरपार भोक पाडले; अंधार पडला तेव्हा मी सामान बाहेर नेले व त्यांच्यादेखत ते मी खांद्यावर घेतले.
8सकाळी परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की,
9“मानवपुत्रा, ‘तू काय करतोस’ असे तुला त्या इस्राएल घराण्याने, त्या फितुरी घराण्याने म्हटले ना?
10त्यांना साग : ‘प्रभू परमेश्वर म्हणतो की हे देववचन यरुशलेमेतील अधिपतीस व ज्या इस्राएल घराण्यातले ते आहेत त्या सर्व घराण्यास लागू आहे.’
11असे म्हण की, ‘मी तुम्हांला चिन्हवत आहे; मी त्यांना करून दाखवले तसेच त्यांना घडेल; ते हद्दपार होतील, बंदिवासात जातील.”’
12त्यांच्यातला सरदार अंधार पडला असता खांद्यावर सामान घेऊन निघून जाईल, ते तट फोडून त्यातून ते नेतील; तो आपले मुख झाकील म्हणजे त्याच्या डोळ्यांना भूमी दिसायची नाही.
13मी त्याच्यावर आपले जाळे टाकीन म्हणजे तो माझ्या पाशात सापडेल; मी त्याला बाबेलास खास्द्यांच्या देशात घेऊन जाईन; पण तो देश त्याला दिसणार नाही व तो तेथेच मरेल.
14मी त्याच्याभोवतालचे त्याचे सर्व साहाय्यकर्ते व त्याची सर्व सेना ह्यांची दाही दिशांना दाणादाण करीन, व मी तलवार उपसून त्यांचा पिच्छा पुरवीन.
15मी त्यांना राष्ट्रांमध्ये परागंदा करीन, त्यांची देशोदेशी पांगापांग करीन, तेव्हा त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे.
16तरी त्यांच्यापैकी थोडक्या लोकांना तलवार, दुष्काळ व मरी ह्यांपासून मी वाचवीन; म्हणजे ते ज्या ज्या राष्ट्रांत जातील तेथे आपल्या अमंगळ कृत्यांची कहाणी सांगतील; तेव्हा त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे.”
17नंतर परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की,
18“मानवपुत्रा, तू थरथर कापत अन्न खा; कंपायमान व चिंतातुर होऊन पाणी पी;
19आणि ह्या देशाच्या लोकांना सांग की, प्रभू परमेश्वर इस्राएल देशातल्या यरुशलेमनिवासीयांविषयी म्हणतो की, ते चिंतातुर होऊन अन्न खातील, भयचकित होऊन पाणी पितील; कारण त्या देशाच्या सर्व रहिवाशांच्या दुष्टतेमुळे त्या भूमीतले सर्वकाही नष्ट करून ती ओसाड करण्यात आली आहे.
20आबाद नगरे उजाड होतील, भूमी ओसाड होईल, म्हणजे तुम्हांला समजेल की मी परमेश्वर आहे.”
21मग परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की,
22“मानवपुत्रा, ‘दिवस लांबत चालले आहेत, प्रत्येक दृष्टान्त निष्फळ होत आहे,’ ही जी म्हण इस्राएल देशात तुमच्या तोंडी पडली आहे तिचा अर्थ काय?
23तर त्यांना सांग : ‘प्रभू परमेश्वर असे म्हणतो की, मी ह्या म्हणीचा प्रचार बंद करीन व ती ते इस्राएलात पुन्हा उच्चारणार नाहीत.’ त्यांना सांग की दिवस जवळ आले आहेत व प्रत्येक दृष्टान्त प्रत्ययास येण्याचा समय जवळ आला आहे.
24इस्राएल घराण्यात ह्यापुढे निरर्थक दृष्टान्त व खूश करणारा शकुन सांगणार नाहीत.
25कारण मी परमेश्वर आहे; मी बोलत आहे व मी बोलतो ते वचन सिद्धीस जाईलच, त्याला इतःपर विलंब लागणार नाही; कारण प्रभू परमेश्वर म्हणतो, हे फितुरी घराण्या, मी तुमच्या दिवसांत वचन बोलेन व ते पूर्ण करीन.”
26परमेश्वराचे वचन पुन्हा मला प्राप्त झाले की,
27“मानवपुत्रा, पाहा, इस्राएल घराणे म्हणत आहे की, ‘त्याने जो दृष्टान्त पाहिला त्याला पुष्कळ अवधी आहे; तो दूरच्या काळाविषयी संदेश देत आहे.’
28ह्याकरता त्यांना सांग : प्रभू परमेश्वर म्हणतो की माझ्या कोणत्याही वचनास विलंब लागणार नाही; मी बोलेन ते वचन सिद्धीस जाईलच, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in