YouVersion Logo
Search Icon

निर्गम 7

7
1मग परमेश्वराने मोशेला म्हटले, “पाहा, तुला मी फारोचा देव करतो, आणि तुझा भाऊ अहरोन हा तुझा संदेष्टा होईल.
2जे काही मी तुला आज्ञा देऊन सांगतो ते सर्व तू बोल; तुझा भाऊ अहरोन फारोला सांगेल की, तू इस्राएल लोकांना तुझ्या देशातून जाऊ दे.
3मी फारोचे मन कठोर करीन आणि मिसर देशात माझी चिन्हे व अद्भुते विपुल दाखवीन.
4तरी फारो तुमचे काही ऐकणार नाही. मग मी मिसरावर आपला हात टाकीन आणि त्यांना मोठ्या शिक्षा करून मी माझ्या सेना, माझे लोक, इस्राएलवंशज ह्यांना मिसर देशातून बाहेर काढीन.
5आणि मिसरावर मी आपला हात उभारून त्यांच्यामधून इस्राएल लोकांना बाहेर काढीन तेव्हा मिसर्‍यांना कळेल की, मी परमेश्वर आहे.”
6मोशे व अहरोन ह्यांनी तसे केले; परमेश्वराने त्यांना आज्ञा केली त्याप्रमाणे त्यांनी केले.
7मोशे व अहरोन ह्यांनी फारोशी हे बोलणे केले तेव्हा मोशे ऐंशी वर्षांचा व अहरोन त्र्याऐंशी वर्षांचा होता. अहरोनाची काठी 8नंतर परमेश्वर मोशे व अहरोन ह्यांना म्हणाला, 9“‘तुम्ही स्वत: काही अद्भुत कृती दाखवा’ असे फारो तुम्हांला म्हणेल तेव्हा तू अहरोनाला सांग, ‘आपली काठी घेऊन फारोपुढे टाक म्हणजे तिचा साप होईल.”’
10मग मोशे व अहरोन ह्यांनी फारोजवळ जाऊन परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले; अहरोनाने आपली काठी फारो व त्याचे सेवक ह्यांच्यापुढे टाकली तेव्हा तिचा साप झाला.
11मग फारोनेही जाणते व मांत्रिक बोलावले; मिसराच्या त्या जादुगारांनीसुद्धा आपल्या मंत्रतंत्रांच्या योगे तसाच प्रकार केला.
12त्यांनीही आपापल्या काठ्या खाली टाकताच त्यांचे साप झाले; पण अहरोनाच्या काठीने त्यांच्या काठ्या गिळून टाकल्या.
13तथापि फारोचे मन कठीण झाले, आणि परमेश्वराने म्हटले होते त्याप्रमाणे तो मोशे व अहरोन ह्यांचे म्हणणे ऐकेना.
रक्ताची पीडा
14तेव्हा परमेश्वराने मोशेला म्हटले, “फारोचे मन कठीण झाले आहे, तो ह्या लोकांना जाऊ देत नाही.
15सकाळी फारोकडे जा; तो नदीकडे जाईल तेव्हा ज्या काठीचा साप बनला होता ती हातात घेऊन नील नदीच्या काठावर त्याच्या भेटीस उभा राहा.
16त्याला असे सांग की, ‘इब्री लोकांचा देव परमेश्वर ह्याने माझ्या हाती तुला हा निरोप सांगितला आहे की, माझ्या लोकांना जाऊ दे म्हणजे ते रानात माझी सेवा करतील; पण पाहा, तू अजून ऐकत नाहीस.’
17परमेश्वर म्हणतो की, ‘मी परमेश्वर आहे हे तुला ह्यावरून कळेल : पाहा, मी आपल्या हातातली काठी नदीतल्या पाण्यावर मारीन तेव्हा त्या पाण्याचे रक्त होईल.
18नदीतले मासे मरतील आणि तिला घाण सुटेल; आणि नदीचे पाणी पिण्याची मिसरी लोकांना किळस वाटेल.”’
19मग परमेश्वराने मोशेला म्हटले, “तू अहरोनाला सांग की, ‘आपली काठी घेऊन मिसर देशात जितके पाणी म्हणून आहे म्हणजे त्यातल्या नद्या, नाले, तलाव व हौद ह्या सर्वांवर आपला हात उगार म्हणजे त्या सर्वांच्या पाण्याचे रक्त बनेल; आणि मिसरातील काष्ठपाषाणांच्या सर्व पात्रांत रक्तच रक्त होईल.”’
20तेव्हा मोशे व अहरोन ह्यांनी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले; त्याने काठी उचलून फारोच्या व त्याच्या सेवकांच्या समक्ष पाण्यावर मारली तेव्हा नदीतल्या सर्व पाण्याचे रक्त बनले.
21नदीतले मासे मेले, तिला घाण सुटली आणि मिसरी लोकांना नदीतले पाणी पिववेना; सार्‍या मिसर देशात रक्तच रक्त झाले.
22तेव्हा मिसराच्या जादुगारांनी आपल्या मंत्रतंत्रांच्या योगे तसाच प्रकार केला. तरी फारोचे मन कठीण राहिले आणि परमेश्वराने म्हटले होते त्याप्रमाणे तो मोशे व अहरोन ह्यांचे म्हणणे ऐकेना.
23फारो मागे फिरून घरी निघून गेला; त्याने हेसुद्धा लक्षात घेतले नाही.
24सर्व मिसरी लोकांनी पिण्याच्या पाण्यासाठी नदीच्या आसपास झरे खणले; कारण नदीचे पाणी त्यांना पिववेना.
25परमेश्वराने नदीवर प्रहार केला त्याला सात दिवस लोटले.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in