YouVersion Logo
Search Icon

निर्गम 31

31
बसालेल आणि अहलियाब ह्यांची नेमणूक
(निर्ग. 35:30—36:1)
1मग परमेश्वर मोशेला म्हणाला, 2“पाहा, मी यहूदा वंशातील ऊरीचा मुलगा म्हणजे हूरचा नातू बसालेल ह्याला त्याच्या नावाने बोलावले आहे,
3मी त्याला देवाच्या आत्म्याने परिपूर्ण करून त्याला अक्कल, बुद्धी, ज्ञान आणि सर्व प्रकारचे कसब दिले आहे.
4तो कलाकुसरीची कामे करील; सोने, चांदी व पितळ ह्यांची कामे करील.
5जडवण्यासाठी रत्नांना पैलू पाडील, लाकडाचे नक्षीकाम करील; आणि अशी सर्व प्रकारची कारागिरीची कामे करील.
6आणि पाहा, त्याच्या जोडीला मी दानवंशीय अहिसामाकाचा मुलगा अहलियाब ह्याला नेमले आहे; एवढेच नव्हे तर जितके म्हणून बुद्धिमान आहेत त्या सर्वांच्या ह्रदयात मी बुद्धी ठेवली आहे; ती ह्यासाठी की, तुला आज्ञा केल्याप्रमाणे सर्व गोष्टी त्यांनी तयार कराव्यात.
7म्हणजे दर्शनमंडप, साक्षपटाचा कोश आणि त्यावरील दयासन आणि तंबूचे सर्व सामान,
8मेज व त्यावरील सर्व सामान, शुद्ध दीपवृक्ष व त्याची सर्व उपकरणे, धूपवेदी, 9होमवेदी व तिचे सर्व सामान आणि गंगाळ व त्याची बैठक,
10कुशलतेने विणलेली तलम वस्त्रे म्हणजे याजक ह्या नात्याने सेवा करण्यासाठी अहरोन याजकाची पवित्र वस्त्रे, त्याच्या मुलांची वस्त्रे,
11अभिषेकाचे तेल व पवित्रस्थानासाठी सुगंधी द्रव्ययुक्त धूप ह्या सर्व गोष्टींविषयी मी तुला आज्ञा दिली आहे त्याप्रमाणे त्यांनी करावे.” कराराची खूण म्हणून पाळायचा शब्बाथ दिवस 12मग परमेश्वर मोशेला म्हणाला,
13“तू इस्राएल लोकांना आणखी असे सांग की, तुम्ही माझे शब्बाथ अवश्य पाळावेत, कारण पिढ्यानपिढ्या तुमच्यामाझ्यामध्ये ही खूण आहे; ह्यावरून हे कळावे की, तुम्हांला पवित्र करणारा मी परमेश्वर आहे.
14म्हणून तुम्ही शब्बाथ पाळावा; तो तुमच्यासाठी पवित्र आहे; जो कोणी तो भ्रष्ट करील त्याला अवश्य जिवे मारावे; जो कोणी त्या दिवशी काही काम करील त्याचा स्वजनांतून उच्छेद व्हावा.
15सहा दिवस काम करावे, पण सातवा दिवस परमेश्वराचा पवित्र दिवस, परमविश्रामाचा शब्बाथ होय; कोणी शब्बाथ दिवशी काम करील तर त्याला अवश्य जिवे मारावे.
16इस्राएल लोकांनी शब्बाथ पाळावा; शब्बाथ हा निरंतरचा करार समजून त्यांनी तो पिढ्यानपिढ्या पाळावा.
17माझ्यामध्ये व इस्राएल लोकांमध्ये ही निरंतरची खूण होय; कारण परमेश्वराने सहा दिवसांत आकाश व पृथ्वी निर्माण करून सातव्या दिवशी विसावा घेतला आणि त्याचा श्रमपरिहार झाला.”
18परमेश्वराने मोशेबरोबर सीनाय पर्वतावर हे सर्व भाषण केल्यावर आपल्या बोटाने लिहिलेले पाषाणाचे दोन साक्षपट त्याला दिले.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in