YouVersion Logo
Search Icon

निर्गम 3

3
मोशेला झालेले पाचारण
1मोशे आपला सासरा मिद्यानी याजक इथ्रो ह्याची शेरडेमेंढरे चारत होता आणि तो आपला कळप रानाच्या पिछाडीस देवाचा डोंगर होरेब येथवर घेऊन गेला.
2तेव्हा परमेश्वराच्या दूताने एका झुडपातून अग्निज्वालेत त्याला दर्शन दिले; त्याने दृष्टी लावली तर झुडूप अग्नीने जळत असून ते भस्म झाले नाही असे त्याला दिसले.
3तेव्हा मोशे म्हणाला, “मी आता तिकडे जाऊन हा काय चमत्कार आहे, ते झुडूप का भस्म होत नाही ते पाहतो.”
4ते पाहण्यास मोशे तिकडे वळला असे परमेश्वराने पाहिले, आणि झुडपातून देवाने त्याला हाक मारून म्हटले, “मोशे, मोशे.” तेव्हा तो म्हणाला, “काय आज्ञा?”
5देव त्याला म्हणाला, “इकडे जवळ येऊ नकोस; तू आपल्या पायांतले जोडे काढ, कारण ज्या जागी तू उभा आहेस ती भूमी पवित्र आहे.”
6तो आणखी म्हणाला, “मी तुझ्या पित्याचा देव, अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव, याकोबाचा देव आहे.” तेव्हा मोशेने आपले तोंड झाकले; कारण देवाकडे पाहण्यास तो भ्याला.
7परमेश्वर म्हणाला, “मिसर देशात असलेल्या माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली आहे, त्यांच्या मुकादमांच्या जाचामुळे त्यांनी केलेला आक्रोश मी ऐकला आहे; त्यांचे क्लेश मी जाणून आहे;
8त्यांना मिसरी लोकांच्या हातातून सोडवावे, आणि त्या देशातून चांगल्या व मोठ्या देशात, दुधामधाचे प्रवाह जेथे वाहत आहेत अशा देशात, म्हणजे कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबूसी ह्यांच्या देशात त्यांना घेऊन जावे म्हणून मी उतरलो आहे.
9पाहा, इस्राएलवंशजांचा आक्रोश माझ्यापर्यंत आला आहे; मिसरी लोक त्यांच्यावर कसा जाचजुलूम करीत आहेत हेही मी प्रत्यक्ष पाहिले आहे.
10तर आता चल, तू मिसर देशातून माझे लोक इस्राएलवंशज ह्यांना बाहेर काढावे म्हणून मी तुला फारोकडे पाठवतो.”
11तेव्हा मोशे देवाला म्हणाला, “फारोकडे जाऊन इस्राएलवंशजांना मिसरातून काढून आणणारा असा मी कोण?”
12देव म्हणाला, “खचीत मी तुझ्याबरोबर असेन; मी तुला पाठवले ह्याची खूण हीच : तू लोकांना मिसरातून काढून आणल्यावर ह्याच डोंगरावर तुम्ही देवाची सेवा कराल.”
13तेव्हा मोशे देवाला म्हणाला, “पाहा, ‘मला तुमच्या पूर्वजांच्या देवाने तुमच्याकडे पाठवले आहे,’ असे मी इस्राएलवंशजांकडे जाऊन त्यांना सांगितले असता ‘त्याचे नाव काय’ असे मला ते विचारतील, तेव्हा मी त्यांना काय सांगू?”
14देव मोशेला म्हणाला, “मी आहे तो आहे; तू इस्राएलवंशजांस सांग, ‘मी आहे’ ह्याने मला तुमच्याकडे पाठवले आहे.”
15आणखी देवाने मोशेला सांगितले, “तू इस्राएल लोकांना सांग, तुमच्या पूर्वजांचा देव, अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव परमेश्वर ह्याने मला तुमच्याकडे पाठवले आहे; हेच माझे सनातन नाव आहे व ह्याच नावाने पिढ्यानपिढ्या माझे स्मरण होईल.
16तू जा आणि इस्राएलाच्या वडील जनांस जमवून सांग; तुमच्या पूर्वजांचा देव, अब्राहामाचा, इसहाकाचा व याकोबाचा देव परमेश्वर ह्याने मला दर्शन देऊन म्हटले की, माझे तुमच्यावर खरोखर लक्ष गेले आहे व मिसर देशात तुमचे काय होत आहे हे मला कळले आहे;
17मिसर देशातल्या विपत्तीतून सोडवून कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबूसी ह्यांच्या देशात जेथे दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत त्या देशात, तुम्हांला घेऊन जाईन असे मी सांगितले आहे म्हणून कळव.
18तुझे सांगणे ते ऐकतील; मग तू आणि इस्राएलाचे वडील जन मिसर देशाच्या राजाकडे जा व त्याला सांगा, इब्र्यांचा देव परमेश्वर आम्हांला भेटला आहे; तर आमचा देव परमेश्वर ह्याला यज्ञ करावा, म्हणून आम्हांला तीन दिवसांच्या वाटेवर रानात जाऊ द्यावे;
19पण मला ठाऊक आहे की, मिसर देशाचा राजा तुम्हांला जाऊ देणार नाही; त्याला भुजप्रताप दाखवल्या-शिवाय तो जाऊ देणार नाही.
20मग मी आपला हात पुढे करून मिसर देशात ज्या सर्व अद्भुत कृती करणार त्यांचा मारा मी त्याच्यावर करीन; मग तो तुम्हांला जाऊ देईल;
21आणि ह्या लोकांवर मिसरी लोकांची कृपादृष्टी होईल असे मी करीन; म्हणून तुम्ही निघाल तेव्हा रिकाम्या हाताने निघणार नाही;
22तर तुमची प्रत्येक स्त्री आपल्या शेजारणीपासून व आपल्या घरात बिर्‍हाड करून राहणार्‍या स्त्रीपासून सोन्या-रुप्याचे अलंकार व पोशाख मागून घेईल; ते तुम्ही आपल्या मुलामुलींना घालाल; ह्या प्रकारे तुम्ही मिसरी लोकांना लुटाल.”

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in