YouVersion Logo
Search Icon

निर्गम 23

23
न्याय आणि न्यायबुद्धी
1खोटी अफवा उठवू नकोस; दुष्टाच्या हातात हात घालून अन्यायी साक्षी होऊ नकोस.
2दुष्कर्म करण्यास प्रवृत्त होणार्‍या बहुजन-समाजास अनुसरू नकोस आणि बहुजनसमाजास अनुसरून एखाद्या मुकदम्यात विपरीत न्याय होण्यासाठी साक्ष देऊ नकोस,
3दावा गरिबाचा आहे एवढ्यावरूनच त्याचा पक्ष घेऊ नकोस.
4आपल्या शत्रूचा बैल अथवा गाढव मोकाट फिरताना तुला दिसला, तर त्याला अवश्य वळवून त्याच्याकडे पोचता कर.
5तुझा द्वेष करणार्‍याचा गाढव बोजाच्या भाराखाली दबलेला तुला दिसला तर त्याला उठवण्याचे त्या एकट्यावर टाकून जावेसे वाटले तरी जाऊ नकोस, तर त्याला साहाय्य करून त्याची अवश्य सुटका कर.
6तुझ्या लोकांपैकी जो कंगाल असेल त्याच्या मुकदम्याचा निवाडा विपरीत करू नकोस.
7खोट्या मुकदम्यापासून दूर राहा; निरपराधी व नीतिमान ह्यांचा वध करू नकोस, कारण दुष्टाला मी नीतिमान ठरवणार नाही.
8लाच घेऊ नकोस, कारण लाच डोळसांना आंधळे करते, आणि नीतिमानांच्या म्हणण्याचा विपर्यास करते.
9उपर्‍यावर जुलूम करू नकोस, कारण त्याच्या मनोभावनेची तुम्हांला जाणीव आहे; कारण मिसर देशात तुम्हीही उपरे होता. सातवे वर्ष आणि शब्बाथ 10सहा वर्षे आपल्या जमिनीची पेरणी कर, आणि तिचे उत्पन्न साठव.
11पण सातव्या वर्षी ती पडीत राहू दे, म्हणजे तुझ्या लोकांपैकी कंगाल असतील ते तीत उगवलेले खातील; त्यांनी खाऊन जे उरेल ते वनपशू खातील. तुझे द्राक्षमळे व जैतुनवने ह्यांविषयीही तसेच कर.
12सहा दिवस तू आपला उद्योग कर व सातव्या दिवशी विश्रांती घे, म्हणजे तुझे बैल आणि तुझे गाढव ह्यांना विसावा मिळेल आणि तुझ्या दासीची संतती आणि उपरा ह्यांचा जीव ताजातवाना होईल.
13मी जे काही तुम्हांला सांगितले आहे त्या सगळ्यांविषयी सावध राहा; इतर देवांचे नावदेखील घेऊ नका, ते तुमच्या मुखातून ऐकू येऊ नये.
तीन वार्षिक सण
(निर्ग. 34:18-26; अनु. 16:1-17)
14वर्षातून तीनदा तू माझ्याप्रीत्यर्थ मेळा भरवून सण पाळ.
15बेखमीर भाकरीचा सण पाळ; त्या सणात माझ्या आज्ञेप्रमाणे अबीब महिन्यातील नेमलेल्या समयी सात दिवस तू बेखमीर भाकरी खा, कारण त्याच महिन्यात तू मिसर देशातून बाहेर निघालास; कोणी रिकाम्या हाताने माझ्यासमोर येऊ नये.
16शेतात पेरलेल्या धान्याचे पहिले पीक तयार होईल तेव्हा तू कापणीचा सण पाळ, आणि वर्षअखेर तू आपल्या शेतातील श्रमाच्या फळांचा संग्रह करशील तेव्हा संग्रहाचा सण पाळ.
17वर्षातून तीनदा तुझ्या सर्व पुरुषांनी प्रभू परमेश्वरासमोर हजर व्हावे.
18माझ्या यज्ञपशूंचे रक्त खमिराच्या भाकरीबरोबर अर्पू नये, आणि माझ्याप्रीत्यर्थ पाळलेल्या सणातील चरबी सकाळपर्यंत राहू देऊ नये.
19आपल्या जमिनीच्या प्रथमउत्पन्नातील सर्वोत्तम भाग आपला देव परमेश्वर ह्याच्या मंदिरात आणावा. करडू त्याच्या आईच्या दुधात शिजवू नये.
इस्राएल लोकांना मार्ग दाखवणारा देवाचा दूत
20पाहा, वाटेने तुला सांभाळण्याकरता आणि मी तयार केलेल्या स्थानात तुला पोचवण्याकरता मी एक दूत तुझ्यापुढे पाठवत आहे.
21त्याच्यासमोर सावधगिरीने राहा आणि त्याचे म्हणणे ऐक; त्याची अवज्ञा करू नकोस, कारण तो तुमचा अपराध माफ करणार नाही, कारण त्याच्या ठायी माझे नाव आहे.
22तथापि तू त्याचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकशील व मी सांगतो ते सगळे करशील, तर मी तुझ्या शत्रूंचा शत्रू होईन आणि तुझ्या विरोधकांचा विरोधक होईन.
23जेव्हा माझा दूत तुझ्यापुढे चालून अमोरी, हित्ती, परिज्जी, कनानी, हिव्वी व यबूसी ह्या लोकांकडे तुला नेईल आणि मी त्यांचा संहार करीन,
24तेव्हा त्यांच्या देवांना तू नमन करू नयेस, त्यांची सेवा करू नयेस, आणि त्यांच्यासारखी कर्मे करू नयेस, तर त्यांना अगदी जमीनदोस्त करावेस आणि त्यांच्या स्तंभांचे तुकडेतुकडे करावेस.
25तू आपला देव परमेश्वर ह्याची सेवा करावीस म्हणजे तो तुझ्या अन्नपाण्यास बरकत देईल; मी तुझ्यामधून रोगराई दूर करीन.
26तुझ्या देशात कोणाचा गर्भपात होणार नाही आणि कोणी वांझ असणार नाही; आणि मी तुला भरपूर आयुष्य देईन.
27ज्या ज्या लोकांच्या विरुद्ध तू जाशील त्यांना मी आधीच दहशत घालून त्यांची फसगत करीन. तुझ्या सर्व शत्रूंना पाठ दाखवायला लावीन.
28मी तुझ्यापुढे गांधीलमाशा पाठवीन; त्या हिव्वी, कनानी आणि हित्ती ह्यांना तुझ्यापुढून पळायला लावतील.
29मी त्यांना एका वर्षातच घालवून देईन असे नाही; तसे केले तर देश उजाड होईल आणि वनपशू फार होऊन तुला उपद्रव देतील.
30तुझी संख्या वाढून तू देशाचा ताबा घेशील तोपर्यंत मी हळूहळू तुझ्यापुढून त्यांना घालवून देईन.
31तांबड्या समुद्रापासून ते पलिष्ट्यांच्या समुद्रापर्यंत आणि रानापासून ते फरात नदापर्यंत मी तुझ्या देशाची सरहद्द करीन; मी त्या देशातील रहिवाशांना तुझ्या काबूत आणीन व तू त्यांना आपल्यापुढून हाकून देशील.
32तू त्यांच्याशी किंवा त्यांच्या देवांशी काही करार करू नकोस.
33ते तुझ्या देशात राहता कामा नयेत; राहिले तर ते तुला माझ्याविरुद्ध पाप करायला लावतील; कारण तू त्यांच्या देवांची सेवा करशील व ते तुला खात्रीने पाशासारखे होतील.”

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in