निर्गम 19
19
सीनाय पर्वताजवळ इस्राएल लोक येतात
1इस्राएल लोकांना मिसर देशातून निघून तीन महिने झाले त्याच दिवशी ते सीनायच्या रानात येऊन पोहचले.
2रफीदीम येथून कूच करीत ते सीनायच्या रानात आले व त्या रानात त्यांनी डेरे दिले; तेथे पर्वतासमोर इस्राएल लोकांनी तळ दिला.
3तेव्हा मोशे देवाकडे वर गेला; आणि परमेश्वराने त्याला पर्वतातून हाक मारून सांगितले की, “याकोबाच्या घराण्याला हे सांग, इस्राएल लोकांना हे विदित कर.
4मी मिसर्यांचे काय केले ते व तुम्हांला गरुडाच्या पंखांवर बसवून मी आपणाकडे कसे आणले आहे हे तुम्ही पाहिले आहे;
5म्हणून आता तुम्ही खरोखर माझी वाणी ऐकाल आणि माझा करार पाळाल तर सर्व लोकांपेक्षा माझा खास निधी व्हाल, कारण सर्व पृथ्वी माझी आहे;
6पण तुम्ही मला याजकराज्य, पवित्र राष्ट्र व्हाल. हेच शब्द तू इस्राएल लोकांना सांग.”
7मग मोशेने येऊन लोकांच्या वडिलांना बोलावले आणि परमेश्वराने त्याला आज्ञापिलेले हे सर्व शब्द त्यांच्यापुढे मांडले.
8तेव्हा सर्व लोकांनी एकमुखाने उत्तर दिले, “परमेश्वराने सांगितले आहे ते सर्व आम्ही करू.” मोशेने लोकांचे हे शब्द परमेश्वराला कळवले.
9मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “पाहा, मी दाट ढगातून तुझ्याकडे येतो ते ह्या हेतूने की, मी तुझ्याशी बोलत असताना लोकांनी ऐकावे आणि तुझ्यावरही नेहमी विश्वास ठेवावा.” मोशेने लोकांचे म्हणणे परमेश्वराला सांगितले.
10परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू लोकांकडे जा आणि त्यांना आज व उद्या पवित्र कर. त्यांनी आपले कपडे धुवावेत.
11तिसरा दिवस येईपर्यंत त्यांनी तयार राहावे, कारण तिसर्या दिवशी सर्व लोकांदेखत परमेश्वर सीनाय पर्वतावर उतरेल.
12तू लोकांसाठी सभोवताली मर्यादा आख आणि त्यांना सांग, सांभाळा, पर्वतावर चढू नका, त्याच्या कडेला शिवू नका; जो कोणी पर्वताला स्पर्श करील त्याला अवश्य जिवे मारावे.
13त्याला कोणी हात लावू नये, लावला तर त्याला दगडमार करावा किंवा बाणांनी विंधावे; मग तो जनावर असो किंवा माणूस असो, त्याला जिवंत ठेवू नये. शिंगाचा दीर्घनाद होईल तेव्हा लोकांनी पर्वतावर चढावे.”
14मग मोशे पर्वतावरून उतरून लोकांकडे आला; त्याने लोकांना पवित्र केले आणि त्यांनी आपले कपडे धुतले.
15त्याने लोकांना सांगितले की, तिसरा दिवस येईपर्यंत तयार असा, स्त्रीस्पर्श करू नका.
16तिसरा दिवस उजाडताच गडगडाट झाला व विजा चमकू लागल्या, पर्वतावर दाट ढग जमले व शिंगांचा फार मोठ्याने नाद होऊ लागला, तेव्हा छावणीतले सर्व लोक थरथरा कापू लागले.
17मोशेने लोकांना देवाला भेटण्यासाठी छावणीतून बाहेर आणले, आणि ते पर्वताच्या पायथ्याशी उभे राहिले.
18सर्व सीनाय पर्वतावर धूर पसरला, कारण परमेश्वर अग्नीतून त्याच्यावर उतरला. भट्टीच्या धुरासारखा त्याचा धूर वर चढला व सर्व पर्वत थरथरू लागला.
19शिंगाचा आवाज अधिकच वाढू लागला, तेव्हा मोशे बोलू लागला आणि देव त्याला आपल्या वाणीने1 उत्तर देत गेला.
20परमेश्वराने सीनाय पर्वताच्या शिखरावर उतरून मोशेला पर्वताच्या शिखरावर बोलावले, तेव्हा तो वर गेला.
21परमेश्वर मोशेला म्हणाला, “खाली जाऊन लोकांना ताकीद दे, नाहीतर ते मर्यादा ओलांडून काय आहे ते पाहायला परमेश्वराकडे येतील आणि त्यांच्यापैकी पुष्कळ मरतील.
22तसेच परमेश्वराकडे येणार्या याजकांनीही आपल्याला पवित्र करावे, नाहीतर परमेश्वर त्यांना ताडन करील.”
23मोशे परमेश्वराला म्हणाला, “लोक सीनाय पर्वतावर चढू शकत नाहीत, कारण तूच आम्हांला ताकीद दिली व मला सांगितले की, पर्वताभोवती मर्यादा घाल व तो पवित्र कर.”
24तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, “तू उतरून खाली जा; आणि नंतर तू आणि तुझ्याबरोबर अहरोनाने वर यावे; याजकांनी व लोकांनी मर्यादा उल्लंघून परमेश्वराकडे येता कामा नये, नाहीतर तो त्यांना ताडन करील.”
25मग मोशेने खाली लोकांकडे जाऊन त्यांना हे सांगितले.
Currently Selected:
निर्गम 19: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.