YouVersion Logo
Search Icon

निर्गम 13

13
प्रथमजन्मलेल्यास पवित्र म्हणून वेगळे ठेवणे
1मग परमेश्वराने मोशेला सांगितले की, 2“इस्राएल लोकांमध्ये मनुष्य व पशू ह्या दोहोंच्या प्रथमजन्मलेल्या म्हणजे उदरातून प्रथम बाहेर आलेल्यांना माझ्यासाठी पवित्र म्हणून वेगळे ठेव; ते माझे आहेत.” बेखमीर भाकरीचा सण 3मोशे लोकांना म्हणाला, “ह्या दिवसाची आठवण ठेवा; ह्याच दिवशी तुम्ही मिसरातून, दास्यगृहातून बाहेर निघालात; परमेश्वराने आपल्या बलवान हाताने तुम्हांला ह्या ठिकाणातून बाहेर आणले म्हणून ह्या दिवशी खमिराची भाकर खायची नाही.
4तुम्ही अबीब महिन्याच्या ह्या दिवशी निघाला आहात, 5कनानी, हित्ती, अमोरी, हिव्वी आणि यबूसी ह्यांच्या देशात, म्हणजे जेथे दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत असा जो देश तुला देण्यास परमेश्वराने तुझ्या पूर्वजांशी शपथ वाहिली त्या देशात तुला आणल्यावर ह्या महिन्यात तू हा सण पाळावा.
6सात दिवस बेखमीर भाकरी खाव्यात आणि सातव्या दिवशी परमेश्वरासाठी सण पाळावा.
7ह्या सात दिवसांत बेखमीर भाकर खावी; खमिराची भाकर तुझ्याजवळ दिसता कामा नये, तुझ्या देशभर खमीर दिसूही नये.
8त्या दिवशी तू आपल्या मुलाला सांगावे की, ‘मी मिसर देशातून निघालो तेव्हा परमेश्वराने माझ्यासाठी जे काही केले त्यामुळे मी हा सण पाळत आहे.’ 9हे तुझ्या हातावर चिन्ह व तुझ्या डोळ्यांच्या दरम्यान स्मारक असे असावे; परमेश्वराचा नियम तुझ्या तोंडी असावा; कारण परमेश्वराने भुजबलाने तुला मिसर देशातून बाहेर आणले;
10म्हणून तू वर्षानुवर्ष नेमलेल्या काळी हा विधी पाळावा. प्रथमजन्मलेले अपत्य
11परमेश्वराने तुझ्याशी व तुझ्या पूर्वजांशी शपथ वाहिल्याप्रमाणे तो तुला कनान्यांच्या देशात नेऊन तो देश तुझ्या हाती देईल,
12तेव्हा उदरातून निघालेला प्रथमपुरुष आणि जनावरांच्या पोटचा प्रथमवत्स ह्यांना परमेश्वरासाठी वेगळे करावे. हे सर्व नर परमेश्वराचे आहेत.
13गाढवाच्या प्रथमवत्साला एक कोकरू देऊन सोडवून घ्यावे, त्याला तसे सोडवले नाही तर त्याची मान मोडावी. तुझ्या मुलांतील ज्येष्ठ मुलाला मोबदला देऊन सोडवून घ्यावे.
14पुढील काळी तुझा मुलगा तुला विचारील की हे काय आहे? तेव्हा त्याला सांग, ‘मिसर देशातून, दास्यगृहातून परमेश्वराने आम्हांला आपल्या भुजबलाने बाहेर आणले,
15आणि फारो आम्हांला जाऊ देईना; तेव्हा परमेश्वराने मिसर देशातील मनुष्य व पशू ह्यांचे सर्व प्रथमनर मारून टाकले; म्हणून उदरातून निघालेल्या सर्व प्रथमनरांचा मी परमेश्वराला बली अर्पण करतो; पण माझ्या मुलांतील ज्येष्ठ मुलाला मोबदला देऊन सोडवून घेतो.’
16हे तुझ्या हातावर चिन्ह व तुझ्या डोळ्यांच्या दरम्यान कपाळपट्टी असे असावे; कारण परमेश्वराने आपल्या बलवान हाताने आम्हांला मिसर देशातून बाहेर आणले.”
मेघस्तंभ आणि अग्निस्तंभ
17फारोने लोकांना जाऊ दिले तेव्हा पलिष्टी लोकांच्या देशाची वाट जवळची असूनही देवाने त्यांना त्या वाटेने जाऊ दिले नाही, कारण लढाई दिसताच लोक माघार घेऊन मिसराकडे परत जातील असे देवाला वाटले.
18म्हणून वळसा घेऊन त्याने त्यांना रानाच्या वाटेने तांबड्या समुद्राकडे नेले; इस्राएल लोक मिसर देशातून लढाईला सज्ज होऊन बाहेर निघाले.
19मोशेने आपल्याबरोबर योसेफाच्या अस्थी घेतल्या, कारण योसेफाने इस्राएल लोकांकडून शपथ वाहवून त्यांना सांगितले होते की, देव खात्रीने तुम्हांला भेट देईल तेव्हा तुम्ही आपल्याबरोबर माझ्या अस्थी घेऊन जा.
20मग ते सुक्कोथ येथून रवाना झाले आणि रानाच्या हद्दीवर एथामात त्यांनी तळ दिला.
21त्यांनी रात्रंदिवस चालावे म्हणून परमेश्वर दिवसा त्यांना मार्ग दाखवण्यासाठी मेघस्तंभातून आणि रात्री त्यांना उजेड देण्यासाठी अग्निस्तंभातून त्यांच्यापुढे चालत असे.
22दिवसा मेघस्तंभ व रात्री अग्निस्तंभ लोकांपुढून कधी दूर होत नसत.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in