YouVersion Logo
Search Icon

निर्गम 12

12
वल्हांडण सण
1मग परमेश्वराने मिसर देशात मोशे व अहरोन ह्यांना सांगितले की,
2“हा महिना तुम्हांला आरंभीचा महिना व्हावा; तुमचा हा वर्षाचा पहिला महिना व्हावा.
3इस्राएलाच्या सर्व मंडळीला सांगा की, ह्या महिन्याच्या दहाव्या दिवशी तुम्ही आपापल्या वाडवडिलांच्या घराण्यांप्रमाणे एकेका घराण्यामागे एकेक कोकरू घ्यावे;
4आणि एक कोकरू खपायचे नाही इतकी थोडकी माणसे कोणाच्या घराण्यात असली तर त्याने व त्याच्या घराजवळच्या शेजार्‍याने आपल्या घराण्यातील संख्येप्रमाणे कोकरू घ्यावे; प्रत्येकाच्या आहाराच्या मानाने एक कोकरू किती माणसांना पुरेल ह्याचा हिशोब करावा.
5कोकरू घ्यायचे ते निर्दोष असावे. तो एक वर्षाचा नर असावा; हा नर मेंढरांतला किंवा शेरडांतला, तुम्हांला वाटेल तो घ्यावा;
6ह्या महिन्याच्या चौदाव्या दिवसापर्यंत तो राखून ठेवावा; आणि संध्याकाळी इस्राएल मंडळीतील लोकांनी तो वधावा.
7ज्या घरात त्याचे मांस खायचे असेल त्या घराच्या दोन्ही दारबाह्यांना व चौकटीच्या कपाळपट्टीला त्याचे काही रक्त लावावे.
8आणि त्यांनी त्याच रात्री त्याचे मांस विस्तवावर भाजून बेखमीर भाकर व कडू भाजीबरोबर खावे.
9मांस कच्चे खाऊ नये आणि पाण्यात शिजवून खाऊ नये, तर ते विस्तवावर भाजून खावे; त्याची मुंडी, पाय व आतडीसुद्धा खावीत.
10त्यातले सकाळपर्यंत काही उरू देऊ नये आणि उरलेच तर ते आगीत टाकून जाळावे.
11ते तुम्ही ह्या रीतीने खावे : तुमच्या कंबरा कसून, पायांत जोडे घालून आणि हातात काठी घेऊन ते घाईघाईने खावे; हा परमेश्वराचा ‘वल्हांडण सण’ (ओलांडून जाण्याचा सण) होय.
12कारण ह्या रात्री मिसर देशात फिरून त्यातील मनुष्य व पशू ह्या सर्वांचे प्रथमजन्मलेले मी मारून टाकीन आणि मिसर देशातील सर्व देवांचे शासन करीन; मी परमेश्वर आहे.
13आणि ज्या घरात तुम्ही असाल त्या घरात ते रक्त तुमच्याकरता खूण असे होईल. आणि जेव्हा मी रक्त पाहीन तेव्हा मी तुम्हांला ओलांडून जाईन. मिसर देशाच्या लोकांना मी मारीन तेव्हा तुमच्यावर अनर्थ येणार नाही, तुमचा नाश होणार नाही.
14हा दिवस तुम्हांला स्मारकादाखल होईल. ह्या दिवशी तुम्ही परमेश्वरासाठी मेळा भरवून सण पाळावा; पिढ्यानपिढ्या अगदी कायमचा विधी समजून हा सण तुम्ही पाळावा.
15सात दिवस तुम्ही बेखमीर भाकर खावी; पहिल्याच दिवशी तुमच्या घरातील सर्व खमीर काढून टाकावे; पहिल्या दिवसापासून सातव्या दिवसापर्यंत जो कोणी खमिराची भाकर खाईल त्याचा इस्राएलातून उच्छेद करावा.
16पहिल्या दिवशी तुमचा पवित्र मेळा भरवावा; तसाच सातव्या दिवशीही पवित्र मेळा भरवावा; ह्या दोन्ही दिवशी काही काम करू नये; मात्र प्रत्येक व्यक्तीच्या खाण्या-पिण्यासंबंधाने जे काही करायचे असेल ते करावे.
17ह्या प्रकारे तुम्ही बेखमीर भाकरीचा सण पाळावा, कारण ह्याच दिवशी मी तुमच्या सेना मिसर देशातून बाहेर आणल्या; ह्यास्तव हा दिवस पिढ्यानपिढ्या कायमचा विधी म्हणून पाळावा.
18पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी संध्याकाळ-पासून ते त्या महिन्याच्या एकविसाव्या दिवसाच्या संध्याकाळपर्यंत तुम्ही बेखमीर भाकरी खाव्यात.
19सात दिवसपर्यंत तुमच्या घरात खमीर मुळीच नसावे; कारण एखादा खमिराचा पदार्थ जो कोणी खाईल, तो परदेशीय असो की स्वदेशीय असो, त्याचा इस्राएलाच्या मंडळीतून उच्छेद करावा.
20तुम्ही खमिराचा कोणताही पदार्थ खाऊ नये; तुमच्या सर्व घरांत बेखमीर भाकरी खाव्यात.”
21मग मोशेने इस्राएलाच्या सर्व वडिलांना बोलावून म्हटले, “तुम्ही आपापल्या घराण्याप्रमाणे एकेक कोकरू निवडून घ्यावे आणि वल्हांडणाचा यज्ञपशू वधावा.
22नंतर एजोब झाडाची एक जुडी घेऊन ती पात्रातील रक्तात बुचकळावी आणि तिने त्यातले रक्त दरवाजाच्या कपाळपट्टीला व दोन्ही बाह्यांना लावावे, आणि सकाळपर्यंत कोणीही घराच्या दाराबाहेर जाऊ नये.
23कारण परमेश्वर मिसर्‍यांचा वध करण्यासाठी देशातून फिरणार आहे; ज्या ज्या घराच्या कपाळपट्टीवर व दोन्ही बाह्यांवर रक्त लावलेले परमेश्वर पाहील ते ते दार तो ओलांडून जाईल आणि नाश करणार्‍याला तुमचा नाश करण्यासाठी तुमच्या घरात शिरू देणार नाही.
24हा विधी तुम्हांला व तुमच्या मुलांना निरंतरचा हुकूम आहे असे समजून तो पाळावा.
25जो वचनदत्त देश परमेश्वर तुम्हांला देईल त्यात तुम्ही जाल तेव्हा हा सेवेचा प्रकार तुम्ही पाळावा.
26तुमची मुलेबाळे तुम्हांला विचारतील की, ह्या सेवेचा अर्थ काय?
27तेव्हा तुम्ही सांगा की, हा परमेश्वराच्या वल्हांडणाचा यज्ञ आहे; त्याने मिसरी लोकांना मारले व आमच्या घरांचा बचाव केला त्या समयी तो मिसरातील इस्राएलांची घरे ओलांडून गेला.” हे ऐकून लोकांनी मस्तके लववून दंडवत घातले.
28इस्राएल लोकांनी जाऊन तसे केले; परमेश्वराने मोशे व अहरोन ह्यांना आज्ञा दिली त्याप्रमाणे त्यांनी केले. शेवटली पीडा :
प्रथमवत्साचा मृत्यू
29मध्यरात्री असे झाले की मिसर देशातील सिंहासनावर बसणार्‍या फारोच्या ज्येष्ठ मुलापासून तुरुंगात पडलेल्या कैद्याच्या ज्येष्ठ मुलापर्यंत सर्व, आणि गुराढोरांपैकी सर्व प्रथमवत्स परमेश्वराने मारून टाकले.
30रात्रीच्या समयी फारो, त्याचे सर्व सेवक आणि सगळे मिसरी लोक जागे झाले; आणि मिसर देशात मोठा हाहाकार उडाला, कारण ज्यात कोणी मेला नव्हता असे एकही घर राहिले नव्हते.
31तेव्हा फारोने रातोरात मोशे व अहरोन ह्यांना बोलावून सांगितले, तुम्ही व सगळे इस्राएल लोक माझ्या लोकांतून निघून जा; तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जाऊन परमेश्वराची सेवा करा.
32तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आपली शेरडेमेंढरे व गुरेढोरे घेऊन चालते व्हा; आणि मलाही आशीर्वाद द्या.
33इस्राएल लोकांनी देशातून धांदलीने निघून जावे म्हणून मिसरी लोकांनी त्यांच्यामागे तगादा लावला; ते म्हणाले, “आम्ही सगळे मेलोच आहोत.”
34इस्राएल लोकांनी मळलेली कणीक खमीर न घालता तशीच काथवटीसहित कापडात बांधून खांद्यावर घेतली.
35मोशेच्या सांगण्याप्रमाणे इस्राएल लोकांनी केले; त्यांनी मिसरी लोकांपासून सोन्याचांदीचे दागिने व वस्त्रे-प्रावरणे मागून घेतली;
36मिसरी लोकांची कृपादृष्टी इस्राएल लोकांवर होईल असे परमेश्वराने केले, म्हणून त्यांनी जे जे मागितले ते ते त्यांनी त्यांना दिले. अशा प्रकारे त्यांनी मिसरी लोकांना लुटले.
इस्राएल लोक मिसर देश सोडतात
37मग इस्राएल लोक रामसेस येथून कूच करून सुक्कोथ येथे गेले; जे पुरुष पायी गेले ते मुलाबाळांशिवाय सुमारे सहा लाख होते.
38त्यांच्याबरोबर एक मिश्र समुदायसुद्धा गेला; तशीच शेरडेमेंढरे, गुरेढोरे वगैरे पुष्कळ जनावरे गेली.
39त्यांनी आपल्याबरोबर मिसर देशातून मळलेली कणीक आणली होती, तिच्या बेखमीर भाकरी भाजल्या, तिच्यात काही खमीर नव्हते; मिसर देशातून त्यांना जबरीने बाहेर काढले होते, म्हणून त्यांना थांबायला अवकाश मिळाला नाही; त्यांना खाण्यासाठी काही तयार करून घेता आले नाही.
40इस्राएल लोकांना मिसर देशात राहून चारशे तीस वर्षे लोटली होती.
41चारशे तीस वर्षे संपली त्याच दिवशी परमेश्वराच्या सर्व सेना मिसर देशातून निघाल्या.
42परमेश्वराने त्यांना मिसर देशातून बाहेर आणले ह्याकरता परमेश्वराप्रीत्यर्थ ही जागरणाची रात्र आहे; इस्राएल लोकांसाठी पिढ्यानपिढ्या परमेश्वराप्रीत्यर्थ ही जागरणाची रात्र आहे म्हणून अवश्य पाळावी.
वल्हांडण सणाच्या विधीचे नियम
43परमेश्वर मोशे व अहरोन ह्यांना म्हणाला, “वल्हांडण सणाचा विधी असा : परदेशीयांपैकी कोणी त्यातले काही खाऊ नये;
44तथापि पैसे देऊन विकत घेतलेला प्रत्येक दास सुंता झाल्यावर त्यातले खाऊ शकेल.
45उपरे अथवा मोलकरी ह्यांपैकी कोणी ते खाऊ नये.
46हे भोजन एकाच घरात झाले पाहिजे; त्या मांसातील काहीएक घराच्या बाहेर नेऊ नये आणि यज्ञपशूचे एकही हाड तोडू नये.
47इस्राएलाच्या सार्‍या मंडळीने हा विधी पाळावा.
48तुमच्याबरोबर राहणारा कोणी परदेशीय परमेश्वरासाठी वल्हांडण सण पाळणार असेल, तर त्याच्या घरच्या सर्व पुरुषांची सुंता व्हावी; मग त्याला जवळ येऊ देऊन सण पाळू द्यावा आणि देशी मनुष्याप्रमाणे त्याला गणावे; पण कोणा बेसुनत पुरुषाने त्यातले काही खाऊ नये.
49स्वदेशीय व तुमच्यामध्ये राहणारा उपरा ह्या दोघांना एकच नियम असावा.”
50ह्या प्रकारे सर्व इस्राएल लोकांनी केले; परमेश्वराने मोशे व अहरोन ह्यांना आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी केले.
51त्याच दिवशी परमेश्वराने इस्राएल लोकांना टोळीटोळीने मिसर देशातून बाहेर आणले.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in