YouVersion Logo
Search Icon

निर्गम 10

10
टोळांची पीडा
1मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “फारोकडे जा, कारण मी त्याचे व त्याच्या सेवकांचे मन कठीण केले आहे ते ह्यासाठी की, त्यांच्यामध्ये मी ही आपली चिन्हे प्रकट करावी.
2मी परमेश्वर आहे हे तुम्हांला कळावे म्हणून मी मिसर्‍यांची कशी फजिती केली आणि त्यांच्यामध्ये काय काय चिन्हे प्रकट केली ते तुझ्या पुत्रपौत्रांच्या कानी जाऊ दे.”
3मग मोशे आणि अहरोन फारोकडे आत जाऊन त्याला म्हणाले, “इब्री लोकांचा देव परमेश्वर असे म्हणतो, ‘तू माझ्यासमोर नमायला कोठवर नाकारशील? माझ्या लोकांना माझी सेवा करायला जाऊ दे.
4तू माझ्या लोकांना जाऊ देण्याचे नाकारशील तर पाहा, मी उद्या तुझ्या देशात टोळ आणीन;
5ते भूतल एवढे झाकून टाकतील की जमीन दिसेनाशी होईल; गारांच्या वृष्टीपासून निभावून जे काही शेष उरले असेल त्याचा ते फन्ना उडवतील; शेतात तुमची जितकी झाडे वाढत आहेत तीही ते खाऊन टाकतील;
6तुझी घरे, तुझ्या सर्व सेवकांची घरे आणि सर्व मिसरी लोकांची घरे ते व्यापून टाकतील, इतके टोळ तुझ्या बापदादांनी किंवा त्यांच्या वाडवडिलांनी त्यांच्या जन्मात आणि आजवरदेखील पाहिले नसतील.”’ मग मोशे मागे फिरून फारोपुढून निघून गेला.
7फारोचे सेवक त्याला म्हणाले, “हा मनुष्य कोठपर्यंत आमच्यासाठी पाश असा राहील? जाऊ द्या ह्या लोकांना आणि त्यांचा देव परमेश्वर ह्याची सेवा त्यांना करू द्या. मिसर देशाचा नाश झाल्याचे आपल्याला अजून कळत नाही का?”
8तेव्हा मोशे आणि अहरोन ह्यांना पुन्हा फारोकडे आणण्यात आले आणि तो त्यांना म्हणाला, “तुम्ही जाऊन आपला देव परमेश्वर ह्याची सेवा करा; पण कोणकोण जाणार?”
9मोशेने म्हटले, “आम्ही आमचे तरुण व म्हातारे ह्यांच्यासह जाऊ; आमचे मुलगे, आमच्या मुली, आमची शेरडेमेंढरे आणि आमची गुरेढोरे ह्या सर्वांना घेऊन आम्ही जाणार; कारण परमेश्वराप्रीत्यर्थ आम्हांला उत्सव करायचा आहे.”
10तो त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला तुमच्या मुलाबाळांसह जाऊ दिले तर परमेश्वर तुमच्याबरोबर असो! खबरदार, तुमच्या मनात वाईट हेतू आहे.
11असे होणार नाही; तुम्ही पुरुषच जा आणि परमेश्वराची सेवा करा; कारण तुम्ही तरी हेच मागत आहात.” मग त्यांना फारोपुढून घालवून दिले.
12परमेश्वर मोशेला म्हणाला, “मिसर देशावर टोळधाड यावी म्हणून त्यावर आपला हात उगार, म्हणजे ती गारांच्या सपाट्यातून उरलेली वनस्पती खाऊन टाकील.”
13मोशेने मिसर देशावर आपली काठी उगारली, तेव्हा परमेश्वराने दिवसभर व रात्रभर देशावर पूर्वेचा वारा वाहवला; आणि सकाळ झाली तेव्हा पूर्वेच्या वार्‍याबरोबर टोळ आले.
14सर्व मिसर देशावर टोळांनी धाड घातली आणि ते सर्व देशावर उतरले. ते असंख्य होते. ह्यापूर्वी एवढे टोळ कधी आले नव्हते व ह्यापुढेही कधी येणार नाहीत.
15त्यांनी सर्व भूमी झाकून टाकल्यामुळे सार्‍या देशावर अंधार पडला; आणि त्यांनी भूमीवरील सर्व वनस्पती आणि गारांच्या वृष्टीतून वाचलेली सर्व फळेही खाऊन टाकली. सर्व मिसर देशात झाडांपैकी किंवा शेतातील वनस्पतींपैकी हिरवे म्हणून काही उरले नाही.
16मग फारोने मोशे आणि अहरोन ह्यांना ताबडतोब बोलावून आणून म्हटले, “मी तुमचा देव परमेश्वर ह्याच्याविरुद्ध आणि तुमच्याविरुद्ध पाप केले आहे.
17तर आता एवढ्या एकाच वेळेस माझ्या पापाची क्षमा करा आणि ही एवढी मरणावस्था माझ्यापासून दूर व्हावी म्हणून तुमचा देव परमेश्वर ह्याच्याजवळ विनंती करा.”
18तेव्हा मोशेने फारोजवळून निघून जाऊन परमेश्वराला विनंती केली.
19तेव्हा परमेश्वराने पश्‍चिमेचा प्रचंड वारा वाहवला; त्याने त्या टोळांना उडवून तांबड्या समुद्रात लोटले; मिसर देशाच्या सर्व हद्दीत एकही टोळ राहिला नाही.
20तथापि परमेश्वराने फारोचे मन कठीण केले; आणि त्याने इस्राएल लोकांना जाऊ दिले नाही.
निबिड अंधकाराची पीडा
21मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “आकाशाकडे आपला हात उगार म्हणजे मिसर देशावर अंधार पडेल, इतका की तो हाताला लागेल.”
22तेव्हा मोशेने आपला हात आकाशाकडे उगारला, आणि तीन दिवस सर्व मिसर देशभर निबिड अंधार पसरला.
23तीन दिवस कोणी कोणाला दिसेना की कोणी आपले ठिकाण सोडून हालेना; पण इस्राएल लोकांच्या सगळ्या वस्तीत उजेड होता.
24मग फारो मोशेला बोलावून म्हणाला, “तुम्ही जाऊन परमेश्वराची सेवा करा; पण तुमची शेरडेमेंढरे व गुरेढोरे मात्र येथेच राहिली पाहिजेत; तुमच्या मुलाबाळांनाही तुमच्याबरोबर घेऊन जा.”
25मोशे म्हणाला, “आमचा देव परमेश्वर ह्याला यज्ञ करण्यासाठी यज्ञपशू आणि होमबली तू आमच्या हवाली केले पाहिजेत;
26आमचे पशूही आमच्याबरोबर गेले पाहिजेत, एक खूरही मागे राहता कामा नये; कारण ह्यांतूनच आमचा देव परमेश्वर ह्याच्या सेवेसाठी यज्ञपशू घ्यावे लागतील; आणि परमेश्वराच्या सेवेला काय लागेल ते आम्हांला तेथे जाऊन पोहचेपर्यंत कळायचे नाही.”
27तथापि परमेश्वराने फारोचे मन कठीण केले, आणि तो त्यांना जाऊ देईना.
28फारो त्याला म्हणाला, “माझ्यापुढून चालता हो आणि सांभाळ, पुन्हा मला आपले तोंड दाखवू नकोस. तू आपले तोंड मला दाखवशील, त्या दिवशी तू मरशील.”
29मोशे म्हणाला, “तू ठीक बोललास, मी पुन्हा तुझे तोंड कधीही पाहणार नाही.”

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in