YouVersion Logo
Search Icon

एस्तेर 8

8
प्रतिकार करण्याचा यहूद्यांना अधिकार
1त्याच दिवशी अहश्वेरोश राजाने यहूद्यांचा वैरी हामान ह्याचे घरदार एस्तेर राणीला दिले. मर्दखयही राजाकडे आला; कारण त्याचे एस्तेरशी काय नाते होते ते तिने राजाला सांगितले होते.
2हामानाकडून काढून घेतलेली मुद्रा राजाने मर्दखयास दिली. एस्तेरने मर्दखयास हामानाच्या घराचा कारभारी नेमले.
3मग एस्तेरने पुन्हा राजाचे आर्जव केले; ती त्याच्या पाया पडली आणि रडून त्याची मोठी काकळूत करून तिने म्हटले, “यहूद्यांचा नायनाट करण्याविषयी हामान अगागी ह्याने केलेली अनर्थावह योजना रद्द करण्यात यावी.”
4तेव्हा राजाने एस्तेरपुढे आपला सोनेरी राजदंड केला आणि एस्तेर उठून राजापुढे उभी राहिली.
5ती म्हणाली, “महाराजांच्या मर्जीस आल्यास, माझ्यावर त्यांची कृपादृष्टी झाली असल्यास, त्यांना योग्य दिसल्यास व मी त्यांच्या आवडीची असल्यास, महाराजांच्या सर्व प्रांतांत जे यहूदी आहेत त्यांचा नायनाट करण्याविषयी अगागी हामान बिन हम्मदाथा ह्याने जी पत्रे लिहून पाठवली आहेत ती रद्द व्हावीत असे फर्मान पाठवण्यात यावे.
6माझ्या लोकांवर जो अनर्थ ओढवेल तो मी कसा पाहू? माझ्या गणगोताचा नाश होईल तो मी डोळ्यांनी कसा पाहू?”
7मग अहश्वरोश राजा एस्तेर राणीला व मर्दखय यहूद्यास म्हणाला, “हामानाने यहूद्यांवर हात टाकला म्हणून त्याचे घरदार मी एस्तेरला दिले व त्याला फाशी दिले.
8तुम्हांला वाटेल त्याप्रमाणे राजाच्या नावाने यहूद्यांविषयी लिहा, आणि पत्रावर राजाची मोहर करा; राजाच्या नावाने लिहिलेले लेख व त्यांवर झालेली राजाची मोहर कोणालाही रद्द करता येणार नाही.”
9त्या वेळेस शिवान महिन्याच्या म्हणजे तिसर्‍या महिन्याच्या तेविसाव्या दिवशी राजाच्या लेखकांना बोलावण्यात आले आणि मर्दखयाच्या सांगण्याप्रमाणे इस्राएलाच्या अधिपतींना आणि हिंदुस्तानापासून कूश देशापर्यंतच्या एकशे सत्तावीस परगण्यांचे अधिपती व सरदार ह्यांना प्रत्येक प्रांताच्या लिपीत व निरनिराळ्या लोकांच्या भाषांत आणि यहूद्यांना त्यांच्या लिपीत व भाषेत खलिते पाठवण्यात आले.
10मर्दखयाने अहश्वेरोश राजाच्या नावाने पत्रे लिहून त्यांवर राजाची मोहर करून ती वेगवान सरकारी घोडे, खेचरे व सांडणी ह्यांच्या स्वारांबरोबर डाकेने रवाना केली.
11त्या पत्रांत सर्व नगरांच्या यहूद्यांना परवानगी दिली होती की, ‘तुम्ही एकत्र होऊन आपल्या प्राणांचे संरक्षण करण्यास उभे राहावे आणि ज्या ज्या प्रांतातील लोक जबरदस्त होऊन तुम्हांला, तुमच्या स्त्रियांना व तुमच्या मुलाबाळांना उपद्रव देऊ पाहतील त्यांचा विध्वंस, संहार व नायनाट करावा व त्यांची धनसंपत्ती लुटावी.
12हे सर्व एकाच दिवशी बाराव्या म्हणजे अदार महिन्याच्या त्रयोदशीस अहश्वेरोश राजाच्या सर्व प्रांतांत करण्यात यावे.’
13फर्मानाची नक्कल प्रत्येक प्रांतात प्रसिद्ध व्हावी आणि त्या दिवशी आपल्या शत्रूंचे उसने फेडण्यास सर्व यहूद्यांनी तयार व्हावे असे सर्व लोकांना जाहीर करण्यात आले.
14डाकेच्या स्वारांनी सरकारी वेगवान घोड्यांवर स्वार होऊन राजाज्ञेप्रमाणे त्वरेने दौड केली; हा हुकूम शूशन राजवाड्यातून सोडण्यात आला.
15मग मर्दखय निळ्या, पांढर्‍या रंगाची राजकीय वस्त्रे लेवून, डोक्यांवर सोन्याचा मुकुट ठेवून व तलम सणाचा व जांभळ्या रंगाचा झगा घालून राजासमोरून निघाला; तेव्हा शूशन नगराचे लोक आनंदाने जयघोष करू लागले.
16आणि यहूदी लोकांना प्रकाश व उल्लास, आनंद व मानसन्मान हे प्राप्त झाले.
17ज्या प्रांतात व ज्या नगरात राजाची आज्ञा व फर्मान जाऊन पोहचले तेथल्या यहूद्यांना मोठा हर्ष झाला आणि त्यांनी भोजनसमारंभ करून तो मंगलदिन म्हणून पाळला आणि त्या देशाचे पुष्कळ लोक यहूदी झाले, कारण त्यांना यहूद्यांचा मोठा धाक बसला.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in