YouVersion Logo
Search Icon

अनुवाद 27

27
एबाल डोंगरावर लिहून ठेवण्याचे नियम
1मग मोशे व इस्राएलाचे वडील जन ह्यांनी लोकांना आज्ञा केली की, “जी आज्ञा मी आज तुम्हांला देत आहे ती सर्व पाळा.
2तुझा देव परमेश्वर तुला देत असलेल्या देशात यार्देन उतरून तू जाशील तेव्हा मोठे धोंडे उभे कर आणि त्यांच्यावर चुन्याचा लेप लाव;
3आणि तू पलीकडे जाशील तेव्हा त्या धोंड्यांवर ह्या नियमशास्त्राची सर्व वचने लिहून काढ, म्हणजे जो देश तुझ्या पूर्वजांचा देव परमेश्वर आपल्या वचनाप्रमाणे तुला देत आहे व ज्यात दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत त्या देशात तुझा प्रवेश होईल.
4जे धोंडे उभे करण्याची मी आज तुम्हांला आज्ञा करीत आहे ते तुम्ही यार्देन उतरून गेल्यावर एबाल डोंगरावर उभे करावेत व त्यांवर चुन्याचा लेप लावावा;
5आणि तेथेच आपला देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ धोंड्यांची एक वेदी बांध; त्यांना कोणतेही लोखंडी हत्यार लावू नकोस.
6तू आपला देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ न घडवलेल्या धोंड्यांची एक वेदी बांधून तिच्यावर तुझा देव परमेश्वर ह्याला होमबलींची अर्पणे कर.
7तेथे शांत्यर्पणांचे यज्ञ करून भोजन कर आणि आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर आनंद कर.
8त्या धोंड्यांवर ह्या नियमशास्त्राची सर्व वचने चांगली स्पष्ट लिहून काढ.”
9मग मोशे आणि लेवीय याजक ह्यांनी सर्व इस्राएल लोकांना म्हटले, “हे इस्राएला, शांतपणे ऐकून घे; तू आज आपला देव परमेश्वर ह्याची प्रजा झाला आहेस;
10म्हणून आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐक आणि आज मी तुला त्याच्या ज्या आज्ञा व विधी सांगत आहे त्यांप्रमाणे वाग.
एबाल डोंगरावर उभे राहून उच्चारायची शापवचने
11मग त्याच दिवशी मोशेने लोकांना आज्ञा केली की,
12तुम्ही यार्देन उतरून जाल तेव्हा शिमोन, लेवी, यहूदा, इस्साखार, योसेफ व बन्यामीन ह्यांनी लोकांना आशीर्वाद देण्यासाठी गरिज्जीम डोंगरावर उभे राहावे;
13आणि रऊबेन, गाद, आशेर, जबुलून, दान आणि नफताली ह्यांनी शापवचने ऐकवण्यासाठी एबाल डोंगरावर उभे राहावे.
14तेव्हा लेव्यांनी सर्व इस्राएल लोकांना पुढीलप्रमाणे मोठ्याने म्हणावे :
15‘जो परमेश्वराला वीट आणणारी कोरीव अथवा ओतीव मूर्ती कारागिराकडून करवून तिची गुप्तपणे स्थापना करतो तो शापित असो.’ तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे.
16‘जो आपल्या बापाला किंवा आईला तुच्छ मानतो तो शापित असो.’ तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे.
17‘जो आपल्या शेजार्‍याच्या शेताच्या सीमेची खूण सरकवतो तो शापित असो.’ तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे.
18‘जो आंधळ्याची वाट चुकवतो तो शापित असो.’ तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे.
19‘जो उपरा, अनाथ व विधवा ह्यांचा विपरीत न्याय करतो तो शापित असो.’ तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे.
20‘जो आपल्या सावत्र आईशी गमन करतो तो आपल्या बापाची बेअब्रू करतो म्हणून तो शापित असो.’ तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे.
21‘जो कोणत्याही पशूशी गमन करतो तो शापित असो.’ तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे.
22‘जो आपल्या सख्ख्या अथवा सावत्र बहिणीशी गमन करतो तो शापित असो.’ तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे.
23‘जो आपल्या सासूशी गमन करतो तो शापित असो.’ तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे.
24‘जो आपल्या शेजार्‍याला गुप्तपणे ठार मारतो तो शापित असो.’ तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे.
25‘निर्दोष माणसाला ठार मारण्यासाठी जो लाच घेतो तो शापित असो.’ तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे.
26‘जो ह्या नियमशास्त्राची वचने मान्य करून ती आचरणात आणत नाही तो शापित असो.’ तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in