अनुवाद 15
15
ऋणविमोचनाचे वर्ष
(लेवी. 25:1-7)
1सात वर्षांच्या अखेरीस तू कर्जमाफी करावीस.
2कर्जमाफी करण्याची रीत ही : धनकोने आपल्या शेजार्याला दिलेले कर्ज माफ करावे; आपला शेजारी अथवा भाऊबंद ह्यांच्यापासून ते वसूल करून घेऊ नये; कारण परमेश्वराच्या नावाने कर्जमाफी जाहीर झाली आहे.
3परक्यापासून हवे तर कर्ज वसूल करून घ्यावे; पण तुझ्या बांधवांकडे तुझे काही येणे असले तर तू स्वतः ते सोडून दे.
4तरीपण तुमच्यामध्ये कोणी दरिद्री असणार नाही, कारण तुमचा देव परमेश्वर जो देश तुम्हांला वतन करून घ्यावा म्हणून देत आहे त्यात तो तुम्हांला अवश्य आशीर्वाद देईल.
5मात्र तुझा देव परमेश्वर ह्याची वाणी तू मनःपूर्वक ऐकली पाहिजेस आणि आज ही जी आज्ञा मी तुला देत आहे ती काळजीपूर्वक पाळली पाहिजेस.
6कारण तुझा देव परमेश्वर तुला दिलेल्या वचनानुसार तुझे कल्याण करील; तू अनेक राष्ट्रांना कर्ज देशील, पण तू स्वतः कर्ज काढणार नाहीस; तू अनेक राष्ट्रांवर सत्ता चालवशील, पण तुझ्यावर त्यांची सत्ता चालणार नाही.
7तुझा देव परमेश्वर जो देश तुला देत आहे त्यातल्या कोणत्याही गावात एखादा दरिद्री बांधव तुमच्यामध्ये राहत असला, तर त्या दरिद्री बांधवाबाबत आपले हृदय कठोर करू नकोस, किंवा आपला हात आखडू नकोस,
8तर तू आपला हात त्याच्यासाठी सैल सोड, आणि त्याची गरज भागेल इतके त्याला अवश्य उसने दे.
9लक्षात ठेव, सातवे वर्ष म्हणजे कर्जमाफीचे वर्ष जवळ आले आहे असे वाटून आपल्या मनात नीच विचार येऊ देऊ नकोस; आपल्या दरिद्री बांधवांकडे अनुदार दृष्टीने पाहून तू त्याला काही दिले नाहीस आणि त्याने तुझ्याविरुद्ध परमेश्वराकडे गार्हाणे केले तर तुला पाप लागेल.
10तू त्याला अवश्य दे, व त्याला देताना तुझ्या मनाला वाईट वाटू देऊ नकोस; असे केल्याने तू हात घालशील त्या प्रत्येक कामात तुझा देव परमेश्वर तुला बरकत देईल.
11देशात गरीब लोक नेहमीच असणार म्हणून मी तुला आज्ञा देतो की तुझ्या देशातल्या गरजवंत आणि गरीब बांधवांना सढळ हाताने मदत कर.
दासांशी ठेवायची वर्तणूक
(निर्ग. 21:1-11)
12तुझा बांधव म्हणजे एखादा इब्री पुरुष किंवा इब्री स्त्री तुला विकण्यात आली असली तर त्याने किंवा तिने सहा वर्षे दास्य केल्यावर सातव्या वर्षी त्याला किंवा तिला मुक्त करून जाऊ दे.
13तू त्याला मुक्त करशील तेव्हा त्याला रिक्त हस्ते पाठवू नकोस;
14तर तुझी शेरडेमेंढरे, तुझे खळे व द्राक्षकुंड ह्यांतून उदार हस्ते त्याला दे; तुझा देव परमेश्वर ह्याने तुला समृद्ध केले असेल त्या प्रमाणात त्याला दे.
15तूही मिसर देशात दास होतास आणि तुझा देव परमेश्वर ह्याने तुला मुक्त केले ह्याचे स्मरण ठेव; म्हणून ही आज्ञा मी आज तुला देत आहे.
16तरीपण त्या दासाचा लोभ तुझ्यावर व तुझ्या घराण्यावर जडला असेल व तो आनंदाने तुझ्याबरोबर राहत असून तुला म्हणेल की, ‘मी तुला सोडून जाणार नाही,’
17तर त्याचा कान दरवाजावर धरून आरीने टोच म्हणजे तो तुझा कायमचा दास होईल, असेच तुझ्या दासीबाबतही कर.
18त्याला मुक्त करून जाऊ देणे तुला जड वाटू देऊ नकोस, कारण सहा वर्षे मोलकर्याच्या दुप्पट तुझी सेवाचाकरी त्याने केली आहे; असे केलेस तर तुझा देव परमेश्वर तुझ्या सर्व कामात तुला बरकत देईल.
प्रथमजन्मलेल्यांचे समर्पण
19तुझी गुरेढोरे व शेरडेमेंढरे ह्यांच्यातले प्रथमजन्मलेले सगळे नर तुझा देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ पवित्र मान; प्रथमजन्मलेल्या गोर्ह्याला कोणत्याही कामास लावू नकोस आणि शेरडामेंढरांतल्या प्रथमवत्साची लोकर कातरू नकोस.
20परमेश्वर जे स्थान निवडील तेथे तू आपल्या घराण्यासह वर्षानुवर्षे तुझा देव परमेश्वर ह्याच्यासमोर त्याचे मांस खात जा.
21पण त्यांतील एखाद्यात काही दोष असला, म्हणजे तो लंगडा किंवा आंधळा असला किंवा त्याच्यात दुसरे कोणतेही व्यंग असले तर त्याचे अर्पण तुझा देव परमेश्वर ह्याला करू नकोस.
22वाटल्यास आपल्या गावात तो खा. हरणाचे किंवा सांबराचे मांस खातात त्याप्रमाणे अशुद्ध व शुद्ध माणसांनी त्याचे मांस खावे.
23मात्र त्याच्या रक्ताचे तू सेवन करू नयेस; तू ते पाण्याप्रमाणे जमिनीवर ओतून द्यावेस.
Currently Selected:
अनुवाद 15: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.