अनुवाद 13
13
1तुमच्यामध्ये एखादा संदेष्टा अथवा स्वप्न पाहणारा प्रकट झाला व त्याने तुम्हांला काही चिन्ह अथवा चमत्कार दाखवला, 2आणि त्या चिन्हाचा किंवा त्या चमत्काराचा तुम्हांला प्रत्यय आला, आणि तुम्हांला अपरिचित अशा अन्य देवांना अनुसरून त्यांची सेवा करण्याचे त्याने तुम्हांला सुचवले,
3तरी त्या संदेष्ट्याचे किंवा त्या स्वप्न पाहणार्याचे तुम्ही ऐकू नका; कारण तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने व संपूर्ण जिवाने प्रीती करता की नाही हे पाहण्यासाठी तुमचा देव परमेश्वर तुमची ही अशी परीक्षा पाहत आहे.
4तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याला अनुसरावे, त्याचे भय बाळगावे, त्याच्या आज्ञा पाळाव्यात, त्याची वाणी ऐकावी, त्याची सेवा करावी आणि त्यालाच चिकटून राहावे.
5त्या संदेष्ट्याला किंवा स्वप्न पाहणार्याला जिवे मारावे; कारण तुमचा देव परमेश्वर ज्याने तुम्हांला मिसर देशातून बाहेर आणले व दास्यगृहातून सोडवले, त्या तुमच्या परमेश्वर देवाने नेमून दिलेला मार्ग तुम्ही सोडावा म्हणून तो तुम्हांला फितवतो. अशा प्रकारे तुम्ही आपल्यामधून ह्या दुष्टाईचे निर्मूलन करावे.
6तुझा भाऊ म्हणजे तुझा सहोदर, तुझा मुलगा, तुझी मुलगी, तुझी प्राणप्रिय स्त्री, तुझा जिवलग मित्र ह्यांच्यापैकी कोणी तुला व तुझ्या पूर्वजांना अपरिचित अशा अन्य देवांना अनुसरून त्यांची सेवा करण्याची गुप्तपणे फूस लावू लागला म 7मग ते देव पृथ्वीच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत पसरलेल्या, आसपासच्या किंवा दूरदूरच्या राष्ट्रांचे असोत म 8तर तू त्याच्या म्हणण्यास होकार देऊ नयेस आणि त्याचे ऐकू नयेस; त्याच्यावर दयादृष्टी करू नयेस, त्याची गय करू नयेस अथवा त्याला लपवून ठेवू नयेस;
9त्याला अवश्य ठार मारावेस; त्याला जिवे मारण्यासाठी त्याच्यावर तुझा हात प्रथम पडावा आणि मग इतर सर्व लोकांचे हात पडावेत.
10मरेपर्यंत त्याला दगडमार करावा; कारण तुझा देव परमेश्वर ह्याने तुला मिसर देशातून म्हणजे दास्यगृहातून काढून आणले त्याच्यापासून तुला बहकवण्याचा त्याने प्रयत्न केला आहे.
11हे ऐकून सर्व इस्राएल लोकांना भीती वाटेल आणि तुमच्यामध्ये असले दुष्कृत्य ते पुन्हा करणार नाहीत.
12तुझा देव परमेश्वर ह्याने तुला वस्ती करायला दिलेल्या नगरांपैकी एखाद्या नगराविषयी तुझ्या कानावर अशी बातमी आली की,
13तुमच्यातून काही अधम पुरुष निघाले आणि त्यांनी तुम्हांला अपरिचित अशा ‘अन्य देवांची सेवा करायला या’ असे म्हणून आपल्या नगरातील लोकांना बहकवले,
14तर तू विचारपूस करावीस, शोध करावास, व बारकाईने पत्ता काढावास; आणि ही गोष्ट खरी असली आणि तुमच्यामध्ये असले अमंगळ कृत्य घडले आहे ह्याविषयी खात्री झाली,
15तर तू त्या नगराच्या रहिवाशांना तलवारीने अवश्य मारून टाकावेस, आणि त्या नगराचा व त्यातील सर्व वस्तूंचा समूळ नाश करावास आणि सर्व प्राणिमात्राचा तलवारीने संहार करावास.
16तू त्या नगरातील सर्व लूट चवाठ्यावर जमा करावीस, आणि ते नगर त्यातल्या लुटीसह आपला देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ सर्वस्वी जाळून नष्ट करावेस; त्याचा ढिगार कायमचा तसाच पडू द्यावास; ते पुन्हा वसवू नयेस.
17अशा शापित वस्तूंतले काहीएक तुझ्या हाताला लागून राहू नये; म्हणजे परमेश्वर आपल्या तीव्र कोपापासून परावृत्त होऊन तुझ्या पूर्वजांशी शपथ वाहिल्याप्रमाणे तुझ्यावर दया करील व तुझा कळवळा येऊन तो तुला बहुगुणित करील.
18ज्या आज्ञा आज मी तुला देत आहे त्या सर्व तू आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकून पाळशील आणि तुझा देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने जे योग्य ते करशील तरच असे होईल.
Currently Selected:
अनुवाद 13: MARVBSI
Highlight
Share
Copy

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.