YouVersion Logo
Search Icon

अनुवाद 11

11
परमेश्वराची महती
1म्हणून तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर प्रीती करावीस आणि त्याने तुला लावून दिलेली व्यवस्था, त्याचे विधी, त्याचे नियम व त्याच्या आज्ञा नित्य पाळाव्यात.
2आज तुम्ही हे लक्षात आणा; तुमच्या मुलाबाळांना मी हे सांगत नाही; त्यांनी तर हे काही अनुभवले नाही; म्हणजे तुमचा देव परमेश्वर ह्याने दिलेली शिक्षा, त्याचा महिमा, पराक्रमी बाहू व उगारलेला हात ह्यांच्या द्वारे 3मिसर देशामध्ये त्याने मिसर देशाचा राजा फारो ह्याला व त्याच्या सर्व देशाला काय काय चिन्हे व कृत्ये दाखवली, 4त्याने मिसरी सैन्याचे घोडे व रथ ह्यांचे काय केले, म्हणजे ते तुमचा पाठलाग करीत असताना त्यांच्यावर तांबड्या समुद्राच्या पाण्याचा लोंढा कसा आणला व त्यांचा नाश करून त्यांचा मागमूस आजपर्यंत कसा उरू दिला नाही;
5आणि तुम्ही ह्या ठिकाणी येईपर्यंत त्याने तुमचे रानात काय काय केले;
6त्याचप्रमाणे त्याने रऊबेनी अलीयाबाचे मुलगे दाथान व अबीराम ह्यांचे काय केले, म्हणजे पृथ्वीने आपले तोंड उघडून त्यांची कुटुंबे, डेरे आणि त्यांचे अनुचर ह्यांसह त्यांना इस्राएल लोकांदेखत कसे गिळून टाकले, ह्या गोष्टी त्यांनी पाहिल्या नाहीत;
7पण तुम्ही परमेश्वराने केलेली ही सारी महत्कृत्ये डोळ्यांनी पाहिली आहेत.
वचनदत्त देशामुळे प्राप्त होणारे आशीर्वाद
8म्हणून जी आज्ञा मी आज तुम्हांला सांगत आहे ती तुम्ही संपूर्ण पाळावी, म्हणजे तुम्ही समर्थ होऊन जो देश वतन करून घेण्यासाठी पैलतीरी जात आहात त्यात प्रवेश करून तो आपल्या ताब्यात घ्याल;
9आणि जो देश परमेश्वराने शपथपूर्वक वचनाद्वारे तुमच्या पूर्वजांना व त्यांच्या संतानाला देऊ केला होता व ज्यात दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत त्यात तुम्ही चिरकाळ राहाल.
10तू जो देश वतन करून घ्यायला जात आहेस तो तुम्ही सोडून आलेल्या मिसर देशासारखा नाही; तेथे तू भाजीच्या मळ्यांप्रमाणे बी पेरून पायांनी जमिनीला पाणी देत होतास;
11पण जो देश ताब्यात घेण्यासाठी तुम्ही पैलतीरी जात आहात तो डोंगरखोर्‍यांचा देश असून आकाशातील पाऊस शोषून घेतो;
12तुमचा देव परमेश्वर त्या देशाची काळजी वाहतो, वर्षाच्या आरंभापासून वर्षाच्या अखेरपर्यंत तुमचा देव परमेश्वर ह्याची नजर त्या देशावर सदैव असते.
13मी ज्या आज्ञा आज तुम्हांला देत आहे त्या तुम्ही तत्परतेने ऐकाल आणि आपला देव परमेश्वर ह्याच्यावर प्रेम कराल आणि पूर्ण मनाने व पूर्ण जिवाने त्याची सेवा करीत राहाल,
14तर मी तुमच्या देशावर आगोटीचा पाऊस आणि वळवाचा पाऊस योग्य समयी पाठवीन; म्हणजे तुला आपले धान्य, द्राक्षारस व तेल ह्यांचा साठा करता येईल.
15मी तुझ्या गुराढोरांसाठी तुझ्या कुरणात गवत उपजवीन व तुला पोटभर खायला मिळेल.
16तुम्ही सावध राहा, नाहीतर मनाला भुरळ पडून तुम्ही बहकून जाल, अन्य देवांची सेवा करू लागाल आणि त्यांना नमन कराल.
17तसे केले तर परमेश्वराचा कोप तुमच्यावर भडकून तो आकाश बंद करील, म्हणजे पाऊस पडणार नाही; भूमी आपला उपज देणार नाही; आणि जो उत्तम देश परमेश्वर तुम्हांला देत आहे त्यातून तुमचा त्वरित नायनाट होईल.
18म्हणून तुम्ही माझी ही वचने आपल्या ध्यानीमनी साठवून ठेवा, ती चिन्हांदाखल आपल्या हातांना बांधा आणि आपल्या डोळ्यांच्या मध्यभागी कपाळपट्टी म्हणून लावा.
19तुम्ही तुमच्या मुलाबाळांना ती शिकवा आणि घरी बसलेले असताना, मार्गाने चालत असताना, निजताना, उठताना त्यांविषयी बोलत जा.
20ती आपल्या दारांच्या चौकटीवर आणि फाटकांवर लिहा.
21म्हणजे जो देश तुमच्या पूर्वजांना देण्याचे परमेश्वराने त्यांना शपथपूर्वक वचन दिले होते त्यात तुम्ही व तुमची मुलेबाळे पृथ्वीच्या वर आकाश असेपर्यंत चिरायू होतील.
22ही जी आज्ञा मी तुम्हांला देत आहे ती सर्व तुम्ही काळजीपूर्वक पाळाल, आपला देव परमेश्वर ह्याच्यावर प्रेम कराल, त्याच्या सर्व मार्गांनी चालाल आणि त्यालाच धरून राहाल,
23तर परमेश्वर ही सर्व राष्ट्रे तुमच्यासमोरून घालवून देईल आणि तुमच्यापेक्षा महान व सामर्थ्यवान राष्ट्रांना तुम्ही आपल्या ताब्यात घ्याल.
24जेथे तुमचे पाऊल पडेल ते प्रत्येक स्थळ तुमचे होईल. रानापासून लबानोनापर्यंत आणि नदीपासून म्हणजे फरात नदीपासून पश्‍चिम समुद्रापर्यंत तुमच्या देशाचा विस्तार होईल.
25तुमच्याशी कोणी सामना करणार नाही; ज्या भूमीवर तुम्ही पाऊल टाकाल तेथल्या रहिवाशांच्या मनात तुमचा देव परमेश्वर आपल्या वचनानुसार तुमच्याविषयी भीती व दहशत उत्पन्न करील.
26पाहा, आज तुमच्यापुढे आशीर्वाद व शाप हे दोन्ही मी ठेवत आहे,
27म्हणजे तुमचा देव परमेश्वर ह्याच्या ज्या आज्ञा मी आज तुम्हांला सांगत आहे त्या तुम्ही पाळल्या तर तुम्हांला आशीर्वाद मिळेल;
28पण तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञा पाळल्या नाहीत आणि ज्या मार्गाने जाण्याची मी आज तुम्हांला आज्ञा करीत आहे तो सोडून तुम्हांला अपरिचित अशा अन्य देवांच्या मागे तुम्ही गेलात तर तुम्हांला शाप मिळेल.
29जो देश ताब्यात घ्यायला तू जात आहेस तेथे तुझा देव परमेश्वर तुला नेऊन पोहचवील तेव्हा तू गरिज्जीम डोंगरावरून आशीर्वाद आणि एबाल डोंगरावरून शाप उच्चारावास.
30हे डोंगर यार्देनेपलीकडे सूर्य मावळतो त्या दिशेला अराबात राहणारे कनानी ह्यांच्या प्रदेशात गिलगालासमोर, मोरे येथील एलोन वृक्षाच्या जवळ आहेत ना?
31जो देश तुमचा देव परमेश्वर तुम्हांला देत आहे तो वतन करून घेण्यासाठी तुम्ही यार्देन ओलांडून जात आहात; तुम्ही तो ताब्यात घ्याल व त्यात वस्ती कराल.
32तेव्हा जे विधी व नियम मी आज तुम्हांला देत आहे ते सर्व काळजीपूर्वक पाळा.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in