दानीएल 6
6
सिंहाच्या गुहेत दानीएल
1दारयावेश राजाने आपल्या मर्जीप्रमाणे आपल्या सर्व साम्राज्यात एकशे वीस प्रांताधिकारी नेमले;
2त्यांच्यावर तीन अध्यक्ष नेमले, दानीएल त्यांपैकी एक होता; राजाचे काही नुकसान होऊ नये म्हणून प्रांता-धिकार्यांनी आपला हिशोब त्या तिघांना द्यावा असे ठरवले.
3दानीएल त्या अध्यक्षांत व प्रांताधिकार्यांत श्रेष्ठ ठरला, कारण त्याच्या ठायी उत्तम आत्मा वसत होता; त्याला सर्व राज्यावर नेमावे असा राजाचा विचार होता.
4असे असता राज्यकारभारासंबंधाने दानिएलाविरुद्ध काही निमित्त शोधण्याचा प्रयत्न त्या अध्यक्षांनी व प्रांताधिकार्यांनी चालवला; पण त्यांना काही निमित्त किंवा दोष सापडेना; कारण तो विश्वासू असून त्याच्या ठायी काही चूक किंवा अपराध सापडला नाही.
5तेव्हा ती माणसे म्हणाली, “ह्या दानिएलाविरुद्ध काही निमित्त काढता येणार नाही; मात्र त्याच्या देवाच्या नियमासंबंधाने त्याच्याविरुद्ध काही निमित्त काढता आले तर येईल.”
6मग हे अध्यक्ष व प्रांताधिकारी राजाकडे जमावाने आले व त्याला म्हणाले, “दारयावेश महाराज, चिरायू असा.
7राज्यातले सर्व देशाध्यक्ष, नायब अधिपती, प्रांताधिकारी, मंत्री व सरदार ह्यांनी असा विचार केला आहे की अशी एक राजाज्ञा व्हावी, व अशी सक्त द्वाही फिरवली जावी की, हे राजा, ‘तीस दिवसपर्यंत आपल्याशिवाय कोणत्याही देवाची अथवा मानवाची आराधना कोणी करील तर त्याला सिंहाच्या गुहेत टाकावे.’
8तर महाराज, ही द्वाही मंजूर करा. फर्मानावर सही करा म्हणजे मेदी व पारसी ह्यांच्या कधी न पालटणार्या कायद्याच्या व्यवस्थेप्रमाणे हा ठराव पालटायचा नाही.”
9तेव्हा दारयावेश राजाने फर्मानावर व द्वाहीवर सही केली.
10ह्या फर्मानावर सही झाली आहे असे दानिएलाने ऐकले तेव्हा तो आपल्या घरी गेला; त्याच्या खोलीतल्या खिडक्या यरुशलेमेच्या दिशेकडे असून उघड्या होत्या; त्याने आपल्या नित्यक्रमाप्रमाणे दिवसातून तीनदा गुडघे टेकून प्रार्थना केली व आपल्या देवाचा धन्यवाद केला.
11त्या वेळी ती माणसे जमावाने आली तेव्हा दानीएल आपल्या देवाची प्रार्थना व विनंती करत आहे असे त्यांना आढळून आले.
12तेव्हा ते राजाजवळ जाऊन त्याने फिरवलेल्या द्वाहीविषयी त्याला म्हणाले, “महाराज, तीस दिवसपर्यंत जो कोणी आपणाशिवाय कोणा देवाची अथवा मनुष्याची आराधना करील त्याला सिंहाच्या गुहेत टाकावे अशी द्वाही आपण फिरवली ना?” राजाने उत्तर दिले की, “मेदी व पारसी ह्यांच्या न पालटणार्या कायद्याप्रमाणे हे निश्चित ठरवले आहे.”
13तेव्हा ते राजाला म्हणाले, “महाराज, पकडून आणलेल्या यहूद्यांपैकी तो दानीएल आपणाला व आपण सही केलेल्या द्वाहीला जुमानत नाही; तर तो नित्य तीनदा प्रार्थना करतो.”
14हे शब्द ऐकून राजा फार खिन्न झाला, आणि दानिएलाचा बचाव करण्याचा तो विचार करू लागला; त्याचा बचाव करावा म्हणून त्याने सूर्य मावळेपर्यंत प्रयत्न केला.
15मग ती सर्व माणसे राजाकडे जमावाने आली व त्याला म्हणाली, “हे राजा हे लक्षात आण : मेदी व पारसी ह्यांचा असा शिरस्ता आहे की राजाने केलेल्या द्वाह्या किंवा नियम पालटता येत नाहीत.”
16त्यावर राजाज्ञेवरून दानिएलास आणवून सिंहाच्या गुहेत टाकले. राजा दानिएलास म्हणाला, “ज्या देवाची तू नित्य सेवा करतोस तो तुला सोडवील.”
17त्यांनी एक शिला आणून गुहेच्या दारावर ठेवली; आणि राजाने आपल्या मुद्रेचा व आपल्या सरदारांच्या मुद्रांचा तिच्यावर शिक्का केला; तो अशासाठी की दानिएलाच्या बाबतीत काहीएक फेरबदल होऊ नये.
18नंतर राजा आपल्या महालात गेला, त्याने ती रात्र उपाशीच काढली; त्याच्यासमोर वाद्ये आणली नाहीत; त्याची झोप उडाली.
19मग राजा मोठ्या पहाटेस उठून त्वरेने सिंहाच्या गुहेनजीक गेला.
20तो गुहेजवळ दानिएलाकडे जाऊन शोकस्वराने ओरडून म्हणाला, “हे दानिएला, जिवंत देवाच्या सेवका, ज्या देवाची सेवा तू नित्य करतोस त्याला सिंहापासून तुला सोडवता आले आहे काय?”
21दानीएल राजाला म्हणाला, “महाराज, चिरायू असा.
22माझ्या देवाने आपला दिव्यदूत पाठवून सिंहांची तोंडे बंद केली आहेत. त्यांनी मला काहीएक उपद्रव केला नाही; कारण त्या देवासमोर मी निरपराधी ठरलो; व महाराज आपलाही मी काही अपराध केला नाही.”
23तेव्हा राजाने अत्यंत हर्षित होऊन आज्ञा केली की, “दानिएलास गुहेतून बाहेर काढा.” त्याला गुहेतून बाहेर काढले तेव्हा त्याला काही इजा झाल्याचे दिसून आले नाही, कारण त्याचा आपल्या देवावर भरवसा होता.
24तेव्हा ज्या माणसांनी दानिएलावर आरोप आणला होता त्यांना राजाज्ञेवरून पकडून आणले आणि त्यांना व त्यांच्या बायकामुलांना सिंहांच्या गुहेत टाकले; तेव्हा ते सिंहांच्या तडाक्यात सापडून त्या गुहेच्या तळाशी पोहचण्यापूर्वीच सर्वांच्या हाडांचा त्यांनी चुराडा केला.
25मग पृथ्वीवरील सर्व लोकांना, सर्व राष्ट्रांच्या व सर्व भाषा बोलणार्या लोकांना, दारयावेश राजाने असे लिहून कळवले की, “तुमचे कल्याण असो!”
26मी फर्मावतो की माझ्या साम्राज्याच्या सर्व हद्दीतील लोकांनी दानिएलाच्या देवापुढे कंपित होऊन त्याचे भय धरावे; कारण तो जिवंत देव आहे; तो सर्वकाळ जवळ आहे; त्याचे राज्य अविनाशी व त्याचे प्रभुत्व अनंत आहे.
27ज्याने दानिएलास सिंहांच्या पंजांतून सोडवले तोच बचाव करणारा व मुक्तिदाता आहे; तो आकाशात व पृथ्वीवर चिन्हे व उत्पात घडवणारा आहे.”
28हा दानीएल दारयावेशाच्या कारकिर्दीत व कोरेश पारसी ह्याच्या कारकिर्दीत उत्कर्षास पोहचला.
Currently Selected:
दानीएल 6: MARVBSI
Highlight
Share
Copy

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.