YouVersion Logo
Search Icon

दानीएल 12

12
अंतसमय
1“त्या समयी तुझ्या लोकांचा कैवार घेणारा मोठा अधिपती जो मीखाएल तो उठेल; कोणतेही राष्ट्र निर्माण झाल्यापासून कधीही आले नाही असे संकट त्या समयी येईल; तुझ्या लोकांपैकी ज्यांची नावे वहीत लिहिलेली आढळतील ते सर्व त्या वेळी मुक्त होतील.
2भूमीतील मातीत निजलेल्यांचा मोठा समुदाय उठेल; कित्येक सर्वकाळचे जीवन मिळवण्यास आणि कित्येक अप्रतिष्ठा व सर्वकाळचा धिक्कार मिळवण्यास उठतील.
3जे सुज्ञ असतील ते अंतराळाच्या प्रकाशासारखे झळकतील; पुष्कळ लोकांना नीतिमत्तेकडे वळवणारे लोक युगानुयुग तार्‍यांप्रमाणे चमकतील.
4हे दानिएला, तू अंतसमयापर्यंत ही वचने गुप्त ठेव व हे पुस्तक मुद्रित करून ठेव; पुष्कळ लोक इकडून तिकडे फिरतील व ज्ञानवृद्धी होईल.
5मग मी दानिएलाने पाहिले तेव्हा दुसरे दोन पुरुष, एक नदीच्या ह्या तीरास व दुसरा त्या तीरास असे उभे होते.
6तेव्हा तागाची वस्त्रे ल्यालेला जो पुरुष त्या नदीच्या पाण्यावर होता, त्याला त्यांतल्या एकाने विचारले, “ह्या अद्भुत गोष्टींची समाप्ती होण्यास किती अवधी आहे?”
7तागाची वस्त्रे ल्यालेला जो पुरुष नदीच्या पाण्यावर होता त्याने आपला उजवा व डावा हात आकाशाकडे वर करून, जो सदाजीवी त्याची शपथ वाहून म्हटल्याचे मी ऐकले, “एक समय, दोन समय व अर्धा समय एवढा अवधी आहे; पवित्र प्रजेच्या बलाचा चुराडा करण्याचे संपेल तेव्हा ह्या सर्व गोष्टी पूर्ण होतील.”
8मी हे ऐकले, पण समजलो नाही; तेव्हा मी म्हणालो, “हे माझ्या स्वामी, ह्या गोष्टींचा परिणाम काय?”
9तो म्हणाला, “हे दानिएला, तू आपला स्वस्थ राहा; कारण अंतसमयापर्यंत ही वचने गुप्त ठेवून ती मुद्रित केली आहेत.
10पुष्कळ लोक आपणांस शुद्ध व शुभ्र करतील; ते स्वच्छ होतील; पण दुर्जन दुर्वर्तन करतील; दुर्जनांपैकी कोणाला समज मिळणार नाही; पण जे सुज्ञ आहेत त्यांना तो प्राप्त होईल.
11नित्याचे बलिहवन बंद होईल व विध्वंसमूलक अमंगलाची स्थापना होईल, तेव्हापासून एक हजार दोनशे नव्वद दिवस लोटतील.
12जो धीर धरून तेराशे पस्तीस दिवसांची अखेर पाहील तो धन्य.
13तथापि अंतापर्यंत तू जाऊन स्वस्थ राहा; म्हणजे तुला आराम मिळेल आणि तू युगाच्या समाप्तीस आपले वतन प्राप्त करून घेण्यास उठशील.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in