YouVersion Logo
Search Icon

प्रेषितांची कृत्ये 6

6
सात जणांची निवड
1त्या दिवसांत शिष्यांची संख्या वाढत चालली असता हेल्लेणी यहूद्यांची इब्री लोकांविरुद्ध कुरकुर सुरू झाली; कारण रोजच्या वाटणीत त्यांच्या विधवांची उपेक्षा होत असे.
2तेव्हा बारा प्रेषितांनी शिष्यगणाला बोलावून म्हटले, “आम्ही देवाचे वचन सांगण्याचे सोडून पंक्तिसेवा करावी हे ठीक नाही.
3तर बंधुजनहो, तुम्ही आपल्यामधून पवित्र आत्म्याने व ज्ञानाने पूर्ण असे सात प्रतिष्ठित पुरुष शोधून काढा. त्यांना आम्ही ह्या कामावर नेमू;
4म्हणजे आम्ही स्वतः प्रार्थनेत व वचनाच्या सेवेत तत्पर राहू.”
5ही गोष्ट सर्व लोकांना पसंत पडली; आणि त्यांनी विश्वासाने व पवित्र आत्म्याने पूर्ण असा पुरुष स्तेफन आणि फिलिप्प, प्रखर, नीकानुर, तीमोन, पार्मिना व यहूदीयमतानुसारी नीकलाव अंत्युखीयकर ह्यांची निवड केली.
6त्यांना त्यांनी प्रेषितांसमोर उभे केले आणि त्यांनी प्रार्थना करून त्यांच्यावर हात ठेवले.
7मग देवाच्या वचनाचा प्रसार होत गेला; यरुशलेमेत शिष्यांची संख्या फार वाढत गेली; याजकवर्गातीलही पुष्कळ लोकांनी ह्या विश्वासाला मान्यता दिली.
स्तेफनावर हल्ला
8स्तेफन कृपा1 व सामर्थ्य ह्यांनी पूर्ण होऊन लोकांत मोठी अद्भुते व चिन्हे करत असे.
9तेव्हा लिबिर्तिन नामक लोकांच्या सभास्थानातील काही जण तसेच कुरेनेकर, आलेक्सांद्रियेकर आणि किलिकिया व आसिया ह्यांतील लोकांपैकी कित्येक उठले आणि स्तेफनाबरोबर वितंडवाद घालू लागले.
10पण तो ज्या ज्ञानाने व ज्या आत्म्याने बोलत होता त्यांना त्यांच्याने तोंड देववेना.
11तेव्हा त्यांनी काही लोकांना फूस देऊन, “आम्ही त्याला मोशेविरुद्ध व देवाविरुद्ध दुर्भाषण करताना ऐकले” असे म्हणण्यास पढवले.
12आणि लोकांना, वडिलांना व शास्त्र्यांना चेतवले. त्यांनी त्याच्यावर चाल करून त्याला धरून न्यासभेपुढे नेले;
13आणि त्यांनी बनावट साक्षीदार उभे केले; ते म्हणाले, “हा माणूस ह्या पवित्रस्थानाच्या व नियमशास्त्राच्या विरुद्ध बोलण्याचे सोडत नाही;
14कारण आम्ही त्याला असे बोलताना ऐकले की, हा नासोरी येशू हे स्थान मोडून टाकील आणि मोशेने आपल्याला लावून दिलेले परिपाठ बदलून टाकील.”
15तेव्हा न्यायसभेत बसलेले सर्व जण त्याच्याकडे निरखून पाहत असता त्यांना त्याचे मुख देवदूताच्या मुखासारखे दिसले.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in