प्रेषितांची कृत्ये 4
4
न्यायसभेपुढे पेत्र व योहान
1ते लोकांबरोबर बोलत असता त्यांच्यावर याजक, मंदिराचा सरदार व सदूकी हे चालून आले;
2कारण ते लोकांना शिक्षण देऊन, येशूच्या द्वारे मेलेल्यांतून पुन्हा उठणे आहे असे उघडपणे सांगत होते, ह्याचा त्यांना संताप आला.
3तेव्हा त्यांनी त्यांना अटक केली व संध्याकाळ झाली होती म्हणून सकाळपर्यंत त्यांना चौकीत ठेवले.
4तथापि वचन ऐकणार्यांतील पुष्कळांनी विश्वास ठेवला आणि अशा पुरुषांची संख्या सुमारे पाच हजार झाली.
5नंतर दुसर्या दिवशी असे झाले की, त्यांचे अधिकारी, वडील व शास्त्री,
6आणि प्रमुख याजक हन्ना आणि कयफा, योहान, आलेक्सांद्र व प्रमुख याजकाच्या कुळातील जितके होते तितके यरुशलेमेत एकत्र जमले.
7आणि त्यांनी त्यांना मध्ये उभे करून विचारले, “तुम्ही हे कोणत्या सामर्थ्याने किंवा कोणत्या नावाने केले?”
8तेव्हा पेत्र पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्यांना म्हणाला, “अहो लोकाधिकार्यांनो व वडील जनांनो,
9एका दुर्बल मनुष्यावर कसा उपकार झाला म्हणजे तो कशाने बरा झाला, ह्याविषयी आमची आज चौकशी व्हायची असेल,
10तर तुम्हा सर्वांना व सर्व इस्राएल लोकांना हे कळावे की, ज्याला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले, ज्याला देवाने मेलेल्यांतून उठवले, त्या नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने हा मनुष्य बरा होऊन तुमच्यापुढे उभा राहिला आहे.
11तुम्ही ‘बांधकाम करणार्यांनी तुच्छ मानलेला जो दगड कोनशिला झाला’ तो हाच आहे.
12आणि तारण दुसर्या कोणाकडून नाही; कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेले नाही.”
13तेव्हा पेत्राचे व योहानाचे धैर्य पाहून, तसेच हे निरक्षर व अज्ञानी इसम आहेत हे जाणून ते आश्चर्य करू लागले; आणि हे येशूच्या सहवासात होते हेही त्यांनी ओळखले.
14तरी बर्या झालेल्या त्या माणसाला त्यांच्याजवळ उभे असलेले पाहून त्यांना काही विरुद्ध बोलता येईना.
15मग त्यांनी त्यांना न्यायसभेच्या बाहेर जाण्याची आज्ञा केली आणि ते आपसांत विचार करून म्हणाले,
16“ह्या माणसांना आपण काय करावे? कारण त्यांच्याकडून खरोखर प्रसिद्ध चमत्कार घडला आहे, हे सर्व यरुशलेमकरांना कळून चुकले आहे; तेव्हा ते आपल्याला नाकारता येत नाही.
17तरी ते लोकांमध्ये अधिक पसरू नये म्हणून त्यांना अशी ताकीद द्यावी की, ह्यापुढे तुम्ही ह्या नावाने लोकांपैकी कोणाबरोबरही बोलू नये.”
18मग त्यांनी त्यांना बोलावून असे निक्षून सांगितले की, ‘येशूच्या नावाने अगदी बोलू नका अथवा शिकवूही नका.’
19परंतु पेत्र व योहान ह्यांनी त्यांना उत्तर दिले की, “देवाच्या ऐवजी तुमचे ऐकावे हे देवाच्या दृष्टीने योग्य की अयोग्य आहे हे तुम्हीच ठरवा;
20कारण जे आम्ही पाहिले व ऐकले ते न बोलणे हे आम्हांला शक्य नाही.”
21तेव्हा त्यांनी त्यांना पुन्हा ताकीद देऊन सोडून दिले; त्यांना शिक्षा कशी करावी हे लोकांमुळे त्यांना सुचेना; कारण घडलेल्या गोष्टींमुळे सर्व लोक देवाचा गौरव करत होते.
22बरे करण्याचा हा चमत्कार ज्या माणसावर घडला तो माणूस चाळीस वर्षांहून अधिक वयाचा होता.
पेत्र व योहान आपल्या मित्रांकडे परत येतात
23ते सुटल्यानंतर आपल्या मित्रमंडळीकडे गेले आणि मुख्य याजक आणि वडील जे काही त्यांना म्हणाले होते ते सर्व त्यांनी सांगितले.
24हे ऐकून ते एकचित्ताने देवाला उच्च स्वराने म्हणाले, “हे स्वामी, आकाश, पृथ्वी, समुद्र ह्यांचा व त्यांच्यात जे काही आहे त्या सर्वांचा उत्पन्नकर्ता तूच आहेस.
25आमचा पूर्वज, तुझा सेवक दावीद, ह्याच्या मुखाने पवित्र आत्म्याच्या द्वारे तू म्हटलेस,
‘राष्ट्रे का खवळली,
व लोकांनी व्यर्थ योजना का केल्या?
26प्रभूविरुद्ध व त्याच्या अभिषिक्ताविरुद्ध
पृथ्वीचे राजे उभे राहिले, व अधिकारी जमले;’
27कारण खरोखरच ज्याला तू अभिषेक केलास तो तुझा पवित्र ‘सेवक’ येशू ह्याच्या विरुद्ध ह्या शहरात परराष्ट्रीय व इस्राएल लोक ह्यांच्यासह हेरोद व पंतय पिलात हे एकत्र झाले;
28ह्यासाठी की, जे काही घडावे म्हणून तू स्वहस्ते व स्वसंकल्पाने पूर्वी योजले होते ते त्यांनी करावे.
29तर हे प्रभो, आता तू त्यांच्या धमकावण्याकडे पाहा;
30आणि बरे करण्याकरता तू आपला हात लांब करत असता आपल्या दासांनी पूर्ण धैर्याने तुझे वचन सांगावे असे कर; तुझा पवित्र सेवक येशू ह्याच्या नावाने चिन्हे व अद्भुते घडावीत असेही कर.”
31त्यांनी प्रार्थना केल्यावर ज्या जागेत ते जमले होते ती हादरली आणि ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन देवाचे वचन धैर्याने बोलू लागले.
समाईक निधी
32तेव्हा विश्वास धरणार्यांचा समुदाय एकदिलाचा व एकजिवाचा होता. कोणीही आपल्या मालमत्तेतील काहीही स्वतःचे आहे असे म्हणत नसे, तर त्यांचे सर्वकाही समाईक होते.
33प्रेषित मोठ्या सामर्थ्याने प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष देत होते; आणि त्या सर्वांवर मोठी कृपा होती.
34त्यांच्यातील कोणालाही उणे नव्हते, कारण जमिनींचे किंवा घरांचे जितके मालक होते तितके ती विकत आणि विकलेल्या वस्तूंचे मोल आणून
35प्रेषितांच्या चरणांपाशी ठेवत; मग ज्याच्या-त्याच्या गरजेप्रमाणे प्रत्येकाला वाटून देण्यात येत असे.
36कुप्र बेटात जन्मलेला योसेफ नावाचा लेवी होता. त्याला प्रेषित बर्णबा (म्हणजे बोधपुत्र) म्हणत. त्याची शेतजमीन होती;
37ती त्याने विकली व तिचे पैसे आणून ते प्रेषितांच्या चरणी ठेवले.
Currently Selected:
प्रेषितांची कृत्ये 4: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.