प्रेषितांची कृत्ये 17
17
थेस्सलनीका येथे पौल
1नंतर ते अंफिपुली व अपुल्लोनिया ह्यांच्यामधून जाऊन थेस्सलनीकास गेले. तेथे यहूद्यांचे सभास्थान होते.
2तेथे पौलाने आपल्या परिपाठाप्रमाणे त्यांच्याकडे जाऊन तीन शब्बाथ त्यांच्याबरोबर शास्त्रावरून वादविवाद केला.
3त्याने शास्त्राचा उलगडा करून असे प्रतिपादन केले की, “ख्रिस्ताने दुःख सोसावे व मेलेल्यांमधून पुन्हा उठावे ह्याचे अगत्य होते, आणि ज्या येशूची मी तुमच्यापुढे घोषणा करत आहे तोच तो ख्रिस्त आहे.”
4तेव्हा त्यांच्यापैकी काही जणांची खातरी होऊन ते पौल व सीला ह्यांना येऊन मिळाले; आणि भक्तिमान हेल्लेणी ह्यांचा मोठा समुदाय त्यांना मिळाला. त्यात प्रमुख स्त्रिया काही थोड्याथोडक्या नव्हत्या.
5परंतु ज्या यहूद्यांनी विश्वास ठेवला नाही त्यांनी हेव्याने आपणांबरोबर बाजारचे काही गुंड लोक घेऊन व घोळका जमवून नगरात घबराट निर्माण केली, आणि यासोनाच्या घरावर हल्ला करून त्यांना लोकांकडे बाहेर काढून आणण्याची खटपट करून पाहिली.
6परंतु त्यांचा शोध लागला नाही तेव्हा त्यांनी यासोनाला व कित्येक बंधूंना नगराच्या अधिकार्यांकडे ओढत नेऊन आरडाओरड करत म्हटले, “ज्यांनी जगाची उलटापालट केली ते येथेही आले आहेत;
7त्यांना यासोनाने आपल्या घरात घेतले आहे, आणि हे सर्व जण कैसराच्या हुकमांविरुद्ध वागतात, म्हणजे येशू म्हणून दुसराच कोणी राजा आहे असे म्हणतात.”
8हे ऐकवून त्यांनी लोकांना व शहराच्या अधिकार्यांना खवळवून सोडले.
9मग त्यांनी यासोनाचा व इतरांचा जामीन घेऊन त्यांना सोडून दिले.
बिरुया येथे पौल
10नंतर बंधुजनांनी पौल व सीला ह्यांना लगेच रातोरात बिरुयास पाठवले. ते तेथे पोहचल्यावर यहूद्यांच्या सभास्थानात गेले.
11तेथील लोक थेस्सलनीकातल्या लोकांपेक्षा मोठ्या मनाचे होते; त्यांनी मोठ्या उत्सुकतेने वचनाचा स्वीकार केला, आणि ह्या गोष्टी अशाच आहेत की काय ह्याविषयी ते शास्त्रात दररोज शोध करत गेले.
12त्यांतील अनेकांनी व बर्याच प्रतिष्ठित हेल्लेणी स्त्रिया व पुरुष ह्यांनी विश्वास ठेवला.
13तरीपण पौल देवाचे वचन बिरुयातही सांगत आहे हे थेस्सलनीकातल्या यहूद्यांना समजले, तेव्हा त्यांनी तिकडेही जाऊन लोकांना खवळवून चेतवले.
14त्यावरून बंधुजनांनी पौलाला समुद्राकडे जाण्यास लगेच पाठवले; आणि सीला व तीमथ्य हे तेथेच राहिले.
15तेव्हा पौलाला पोहचवणार्यांनी त्याला अथेनैपर्यंत नेले, आणि सीला व तीमथ्य ह्यांनी आपल्याकडे होईल तितक्या लवकर यावे अशी त्यांची आज्ञा घेऊन ते निघाले.
अथेनै येथे पौल
16पौल अथेनैस त्यांची वाट पाहत असता, ते शहर मूर्तींनी भरलेले आहे असे पाहून त्याच्या मनाचा संताप झाला.
17ह्यामुळे तो सभास्थानात यहूद्यांबरोबर व भक्तिमान लोकांबरोबर आणि बाजारात जे त्याला आढळत त्यांच्याबरोबर दररोज वाद घालत असे.
18तेव्हा एपिकूरपंथी व स्तोयिकपंथी ह्यांच्यापैकी कित्येक तत्त्वज्ञान्यांनी त्याला विरोध केला. कित्येक म्हणाले, “हा बडबड्या काय बोलतो?” दुसरे म्हणाले, “हा परक्या दैवतांची घोषणा करणारा दिसतो;” कारण येशू व पुनरुत्थान ह्यांविषयीच्या सुवार्तेची तो घोषणा करत असे.
19नंतर त्यांनी त्याला धरून अरीयपगावर नेऊन म्हटले, “तुम्ही दिलेली ही नवी शिकवण काय आहे हे आम्हांला समजावून सांगाल काय?
20कारण तुम्ही आम्हांला अपरिचित गोष्टी ऐकवत आहात; त्यांचा अर्थ काय हे समजून घ्यावे अशी आमची इच्छा आहे.”
21(काहीतरी नवलविशेष सांगितल्या किंवा ऐकल्याशिवाय सर्व अथेनैकर व तेथे राहणारे परके लोक ह्यांचा वेळ जात नसे.)
अरीयपगात पौलाने केलेले भाषण
22तेव्हा पौल अरीयपगाच्या मध्यभागी उभा राहून म्हणाला : “अहो अथेनैकरांनो, तुम्ही सर्व बाबतींत धर्मभोळे (देवदेवतांना फार मान देणारे) आहात असे मला दिसते.
23कारण मी फिरता फिरता तुमच्या पूज्य वस्तू पाहताना, ‘अज्ञात देवाला’ ही अक्षरे लिहिलेली वेदी मला आढळली. ज्यांचे तुम्ही अज्ञानाने भजन करता ते मी तुम्हांला जाहीर करतो.
24ज्या देवाने जग व त्यातले अवघे निर्माण केले तो स्वर्गाचा व पृथ्वीचा प्रभू असून हातांनी बांधलेल्या मंदिरात राहत नाही;
25आणि त्याला काही उणे आहे, म्हणून माणसांच्या हातून त्याची सेवा घडावी असेही नाही; कारण जीवन, प्राण व सर्वकाही तो स्वतः सर्वांना देतो.
26आणि त्याने एकापासून माणसांची सर्व राष्ट्रे निर्माण करून त्यांनी पृथ्वीच्या संबंध पाठीवर राहावे असे केले आहे; आणि त्यांचे नेमलेले समय व त्यांच्या वस्तीच्या सीमा त्याने ठरवल्या आहेत;
27अशासाठी की, त्यांनी देवाचा शोध करावा, म्हणजे चाचपडत चाचपडत त्याला कसेतरी प्राप्त करून घ्यावे. तो आपल्यापैकी कोणापासूनही दूर नाही;
28‘कारण आपण त्याच्या ठायी जगतो,
वागतो व आहोत;’
तसेच तुमच्या कवींपैकीही कित्येकांनी म्हटले आहे की,
‘आपण वास्तविक त्याचा वंश आहोत.’
29तर मग आपण देवाचे वंशज असताना मनुष्याच्या चातुर्याने व कल्पनेने कोरलेले सोने, रुपे किंवा पाषाण, ह्यांच्या आकृतीसारखा देव आहे असे आपल्याला वाटता कामा नये.
30अज्ञानाच्या काळांकडे देवाने डोळेझाक केली, परंतु आता सर्वांनी सर्वत्र पश्चात्ताप करावा अशी तो माणसांना आज्ञा करतो.
31त्याने असा एक दिवस नेमला आहे की, ज्या दिवशी तो आपण नेमलेल्या मनुष्याच्या द्वारे जगाचा न्यायनिवाडा नीतिमत्त्वाने करणार आहे; त्याने त्याला मेलेल्यांतून उठवून ह्याविषयीचे प्रमाण सर्वांस पटवले आहे.”
32तेव्हा मृतांच्या पुनरुत्थानाविषयी ऐकून कित्येक थट्टा करू लागले. कित्येक म्हणाले, “ह्याविषयी आम्ही तुमचे पुन्हा आणखी ऐकू.”
33इतके झाल्यावर पौल त्यांच्यामधून निघून गेला.
34तरी काही माणसांनी त्याला चिकटून राहून विश्वास ठेवला; त्यांत दिओनुस्य अरीयपगकर, दामारी नावाची कोणी स्त्री व त्यांच्याबरोबर इतर कित्येक होते.
Currently Selected:
प्रेषितांची कृत्ये 17: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.