YouVersion Logo
Search Icon

2 तीमथ्य 3

3
जवळ येऊन ठेपलेली संकटे
1शेवटल्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे.
2कारण माणसे स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर गर्विष्ठ, निंदक, आईबापांना न मानणारी, उपकार न स्मरणारी, अपवित्र,
3ममताहीन, शांतताद्वेषी, चहाडखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी,
4विश्वासघातकी, हूड, गर्वाने फुगलेली, देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी,
5सुभक्तीचे केवळ बाह्य रूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी अशी ती होतील; त्यांच्यापासूनही दूर राहा.
6त्यांच्यापैकी असे काही लोक आहेत की जे घरात हळूच शिरून पापांनी भारावलेल्या, नाना प्रकारच्या वासनांनी बहकलेल्या,
7सदा शिकत असूनही सत्याच्या ज्ञानाला कधी न पोहचणार्‍या, अशा भोळ्या स्त्रियांना वश करतात.
8यान्नेस व यांब्रेस ह्यांनी जसे मोशेला अडवले, तसे हेही सत्याला अडवतात; हे लोक भ्रष्टबुद्धी बनलेले व विश्वासासंबंधाने पसंतीस न उतरलेले असे आहेत,
9तरी हे अधिक सरसावणार नाहीत; कारण जसे त्यांचे मूर्खपण उघड झाले, तसे ह्यांचेही सर्वांना उघड होईल.
संकटांपासून बचाव
10तू माझे शिक्षण, आचार, संकल्प, विश्वास, सहनशीलता, प्रीती, धीर, माझा झालेला छळ, माझ्यावर आलेली संकटे ही ओळखून आहेस;
11मला अंत्युखियात, इकुन्यात व लुस्त्रात जे काही झाले ते व मी जो छळ सहन केला तो तू ओळखून आहेस; त्या सर्वांतून प्रभूने मला सोडवले.
12ख्रिस्त येशूमध्ये सुभक्तीने आयुष्यक्रमण करण्यास जे पाहतात त्या सर्वांचा छळ होईल;
13आणि दुष्ट व भोंदू माणसे ही दुसर्‍यांना फसवून व स्वतः फसून दुष्टपणात अधिक सरसावतील.
14तू तर ज्या गोष्टी शिकलास व ज्यांविषयी तुझी खातरी झाली आहे त्या धरून राहा.
15त्या कोणापासून शिकलास हे, आणि बालपणापासूनच तुला पवित्र शास्त्राची माहिती आहे हे तुला ठाऊक आहे; ते ख्रिस्त येशूमधील विश्वासाच्या द्वारे तुला तारणासाठी ज्ञानी करायला समर्थ आहे.
16प्रत्येक परमेश्वरप्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक, नीतिशिक्षण ह्यांकरता उपयोगी आहे,
17ह्यासाठी की, देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in