२ शमुवेल 23
23
दाविदाचे अखेरचे बोल
1दाविदाची शेवटची वचने ही आहेत : “ज्याला उच्चपदावर चढवले, जो याकोबाच्या देवाचा अभिषिक्त, जो इस्राएलाचा मधुर स्तोत्र गाणारा, तो इशायाचा पुत्र दावीद असे म्हणतो :
2परमेश्वराचा आत्मा माझ्या द्वारे म्हणाला, त्याचे वचन माझ्या जिव्हेवर आले.
3इस्राएलाचा देव म्हणाला, इस्राएलाचा दुर्ग मला म्हणाला, मानवांवर न्यायाने राज्य करणारा, देवाचे भय धरून त्यांच्यावर राज्य करणारा निर्माण होईल.
4सूर्योदयीच्या प्रभातेसारखा तो उदय पावेल, निरभ्र प्रभातेसारखा तो असेल, पर्जन्यवृष्टीनंतर सूर्यप्रकाशाने जमिनीतून हिरवळ उगवते तसा तो उगवेल.
5माझ्या घराण्याचा देवाशी असा संबंध नाही काय? कारण त्याने माझ्याशी निरंतरचा करार केला आहे; तो सर्व प्रकारे यथास्थित व निश्चित आहे; माझा संपूर्ण उद्धार व अभीष्ट ह्यांचा तो उदय होऊ देणार नाही काय?
6सर्व अधर्मी लोकांना काट्यांप्रमाणे टाकून देतील, कारण त्यांना हाती धरता येत नाही;
7जो कोणी त्यांना धरू पाहील त्याला लोखंड व भाल्याचा दांडा घेतला पाहिजे; ती आग लागून जागच्या जागी भस्म होतील.”
दाविदाचे शूर वीर
(१ इति. 11:10-47)
8दाविदाच्या पदरी असलेल्या शूर वीरांची नावे ही : तखमोनचा योशेब-बश्शेबेथ, हा सरदारांचा नायक होता; हाच असनी आदीनो; ह्याने भाला चालवून एका प्रसंगी आठशे माणसे मारली.
9त्याच्या खालोखाल एलाजार बिन दोदय बिन अहोही हा होता; दाविदाबरोबरच्या तिघा महावीरांपैकी हा एक होता, युद्धासाठी जमा झालेल्या पलिष्ट्यांना तुच्छ लेखून इस्राएल लोक त्यांच्यावर चालून गेले;
10तेव्हा आपला हात थकून तलवारीस चिकटेपर्यंत एलाजार पलिष्ट्यांना मार देत राहिला. त्या दिवशी परमेश्वराने मोठा विजय घडवून आणला, त्याच्यामागून लोक गेले ते केवळ लुटालूट करायला.
11त्याच्या खालोखाल आगे हरारी ह्याचा पुत्र शम्मा हा होता. पलिष्ट्यांनी एकत्र होऊन मसुरीच्या एका शेतात सैन्यव्यूह रचला तेव्हा लोक पलिष्ट्यांसमोरून पळून गेले.
12त्या शेताच्या मध्यभागी उभे राहून शम्माने शेताचे रक्षण केले व त्या पलिष्ट्यांचा वध केला; त्या प्रसंगी परमेश्वराने मोठा विजय घडवून आणला.
13तीस मुख्य सरदारांतले तिघे जण हंगामाच्या वेळी अदुल्लामाच्या गुहेत दाविदाकडे आले; तेव्हा पलिष्ट्यांचे सैन्य रेफाईम खोर्यात तळ देऊन होते.
14त्या वेळी दावीद गडावर असून बेथलेहेमात पलिष्ट्यांचे ठाणे बसले होते.
15दाविदाला उत्कट इच्छा होऊन तो म्हणाला, “बेथलेहेमाच्या वेशीजवळील विहिरीचे पाणी मला कोणी पाजील तर बरे.”
16त्या तिघा वीरांनी पलिष्ट्यांच्या छावणीत घुसून बेथलेहेमाच्या वेशीजवळील विहिरीचे पाणी काढून दाविदाकडे आणले; पण तो ते पिईना. त्याने ते परमेश्वराच्या नावाने ओतले.
17तो म्हणाला, “हे परमेश्वरा, असे कृत्य माझ्याकडून न घडो; जे आपल्या प्राणांवर उदार झाले त्यांचे हे रक्त मी प्यावे काय?” ह्यास्तव तो ते पिईना; त्या तीन वीरांनी हे कृत्य केले.
18सरूवेचा पुत्र यवाबाचा भाऊ अबीशय हा तिघांचा प्रमुख होता. त्याने आपला भाला तीनशे माणसांवर चालवून त्यांना ठार केले व त्या तिघांमध्ये त्याने नाव मिळवले.
19त्या तिघांहून त्याची महती अधिक होती म्हणून तो नायक झाला ना? तरी त्या पहिल्या तिघांच्या योग्यतेस तो पोहचला नाही.
20कबसेल येथला एक माणूस होता; त्याने पुष्कळ पराक्रम केले होते; त्याच्या यहोयादा नामक पुत्राचा बनाया म्हणून एक पुत्र होता, त्याने मवाबी अरीएल ह्याच्या दोघा पुत्रांना ठार मारले; आणि बर्फाच्या दिवसांत कूपात उतरून एका सिंहाला ठार केले.
21त्याने एका धिप्पाड मिसरी पुरुषाला ठार मारले; त्या मिसर्याच्या हाती भाला होता, पण बनाया केवळ एक काठी घेऊन त्याच्यावर चालून गेला; व त्याने त्या मिसर्याच्या हातचा भाला हिसकावून घेऊन त्याच भाल्याने त्याचा वध केला.
22असे करून यहोयादाचा पुत्र बनाया ह्याने त्या तिघा वीरांमध्ये नाव मिळवले.
23त्या तिघांहून त्याची महती मोठी होती तरी पहिल्या तिघांच्या योग्यतेस तो पोहचला नाही. दाविदाने त्याला आपल्या हुजरातीवर नेमले.
24यवाबाचा भाऊ असाएल ह्या तिसांपैकी होता; बेथलेहेमच्या दोदोचा पुत्र एलहानान,
25शाम्मा हरोदी, अलीका हरोदी,
26हेलस पलती, इक्केश तकोई ह्याचा पुत्र ईरा,
27अबीएजर अनाथोथी, मबुन्नय हूशाथी,
28सलमोन अहोही, महरय नटोफाथी,
29बाना नटोफाथी ह्याचा पुत्र हेलेब, बन्यामिन्यांच्या गिबातला रीबय ह्याचा पुत्र इत्तय,
30बनाया पिराथोनी, गाशाच्या ओढ्याजवळचा हिद्दय,
31अबी-अलबोन, अर्वाथी, अजमावेथ बरहूमी,
32अलीहबा शालबोनी, याशेनाच्या पुत्रांतील योनाथान,
33शाम्मा हरारी, शारार अरारी ह्याचा पुत्र अहीयाम,
34माकाथीचा पुत्र अहसबय ह्याचा पुत्र अलीफलेट, अहीथोफेल गिलोनी ह्याचा पुत्र अलीयम,
35हेस्री कर्मेली, पारय अर्बी,
36सोबातील नाथोन ह्याचा पुत्र इगाल, बानी यादी,
37सेलक अम्मोनी, सरूवेचा पुत्र यवाब ह्याचा शस्त्रवाहक नहरय बैरोथी,
38ईरा इथ्री, गारेब इथ्री,
39उरीया हित्ती, मिळून एकंदर सदतीस.
Currently Selected:
२ शमुवेल 23: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.