YouVersion Logo
Search Icon

२ शमुवेल 15

15
अबशालोम दाविदाविरुद्ध बंड पुकारतो
1ह्यानंतर असे झाले की अबशालोमाने आपल्यासाठी रथ, घोडे व आपल्यापुढे दौडण्यासाठी पन्नास माणसे ठेवली.
2अबशालोम नित्य पहाटेस उठून वेशीकडे जाणार्‍या रस्त्यात उभा राही आणि कोणी फिर्यादी दाद मागण्यासाठी राजाकडे आला म्हणजे त्याला बोलावून “तू कोणत्या नगराचा आहेस,” असे विचारी; तेव्हा तो म्हणे, “तुझा दास इस्राएलाच्या अमुक अमुक वंशातला आहे.”
3तेव्हा अबशालोम त्याला म्हणे, “पाहा, तुझे प्रकरण चांगले व वाजवी आहे; पण तुझे ऐकून घेण्यासाठी राजाच्या वतीने कोणी मनुष्य नेमलेला नाही.”
4अबशालोम त्याला आणखी म्हणे, “मला ह्या देशात न्यायाधीश केले असते तर किती बरे झाले असते? एखाद्याने आपला कज्जा किंवा प्रकरण माझ्याकडे आणले असते तर मी त्याला न्याय दिला असता.”
5एखादा त्याला मुजरा करायला जवळ येई तेव्हा तो आपला हात पुढे करून त्याला धरून त्याचे चुंबन घेई.
6इस्राएलातले जे जे लोक राजाकडे न्याय मागण्यासाठी येत त्या सर्वांशी तो असाच वागे; ह्या प्रकारे अबशालोमाने इस्राएल लोकांची मने हरण केली.
7चार वर्षे संपल्यावर अबशालोम राजाला म्हणाला, “मला परवानगी असावी, म्हणजे परमेश्वराला मी जो नवस केला आहे तो हेब्रोन येथे जाऊन फेडीन.
8मी अरामातील गशूर येथे राहत होतो तेव्हा आपल्या दासाने असा नवस केला होता की, परमेश्वराने मला यरुशलेमेत माघारी नेले तर मी परमेश्वराप्रीत्यर्थ अर्पणे करीन.”
9राजा त्याला म्हणाला, “खुशाल जा.” मग तो उठून हेब्रोनास गेला.
10अबशालोमाने इस्राएलाच्या सर्व वंशांकडे हेर पाठवून जाहीर केले की, “रणशिंगाचा शब्द तुम्ही ऐकाल तेव्हा असा घोष करा की, अबशालोम हेब्रोनास राजा झाला आहे.”
11अबशालोमाच्या सांगण्यावरून त्याच्याबरोबर दोनशे पुरुष गेले. ते भोळ्या भावाने गेले; त्यांना काहीएक ठाऊक नव्हते.
12यज्ञ करीत असताना अबशालोमाने दाविदाचा मंत्री गिलोनी अहीथोफेल ह्याला त्याचे नगर गिलो येथून बोलावून आणले. बंड वाढत गेले व अबशालोमाकडे लोक एकसारखे जमत गेले.
13तेव्हा एका जासुदाने येऊन दाविदाला सांगितले, “इस्राएल लोकांची मने अबशालोमाकडे वळली आहेत.”
14हे ऐकून दावीद यरुशलेमेतल्या आपल्या सर्व सेवकांना म्हणाला, “चला, आपण पळून जाऊ; न गेलो तर अबशालोमाच्या हातांतून कोणी सुटायचा नाही, निघून जाण्याची त्वरा करा, नाहीतर तो अचानक आपल्याला पकडून आपल्यावर अरिष्ट आणील व शहरावर तलवार चालवील.”
15राजाचे सेवक त्याला म्हणाले, “पाहा, स्वामीराज, राजाच्या मनास येईल त्याप्रमाणे करायला आपले दास तयार आहेत.”
16मग राजा निघून गेला व त्याच्यामागून त्याच्या घरची माणसे गेली. त्याच्या ज्या दहा स्त्रिया उपपत्नी होत्या त्यांना घर सांभाळायला ठेवून तो गेला.
17राजा निघाला तेव्हा सर्व लोक त्याच्यामागून गेले व ते बेथ-मरहाक येथे थांबले.
18त्याचे सर्व करेथी, पलेथी व त्याच्याबरोबर गथहून आलेले सहाशे गथकर हे त्याच्याबरोबर चालले.
19राजा इत्तय गित्ती ह्याला म्हणाला, “तू आमच्याबरोबर का येतोस? तू आपला परत जाऊन राजाजवळ राहा; तू तर परका व हद्दपार केलेला आहेस; तू आपल्या स्थानी परत जा.
20तू कालचा आलेला माणूस; मी वाट फुटेल तिकडे जाणार, तर आज तुला आमच्याबरोबर इकडेतिकडे दौडवत का फिरवावे? तर तू आपला परत जा, आणि आपल्या भाऊबंदांनाही परत ने; दया व सत्य ही तुझ्यासमागमे राहोत.”
21इत्तयाने राजाला उत्तर केले, “परमेश्वराच्या जीविताची आणि माझ्या स्वामीराजांच्या जीविताची शपथ; प्राण जावो की राहो, जिकडे माझे स्वामीराज जातील तिकडे आपला सेवकही असणार.”
22दावीद इत्तयास म्हणाला, “जा, पार निघून जा.” तेव्हा इत्तय गित्ती ह्याची सर्व माणसे व सर्व मुलेबाळे ही पार निघून गेली.
23सर्व देशाने मोठा आकांत केला आणि सर्व लोक पार गेले; राजा किद्रोन ओहळापलीकडे गेला; सर्व लोकही पार उतरून गेले; ते रानाच्या वाटेने गेले.
24तेव्हा पाहा, सादोक व त्याच्याबरोबर सर्व लेवी देवाच्या कराराचा कोश घेऊन आले; त्यांनी देवाचा कोश खाली ठेवला आणि सर्व लोक नगरातून बाहेर पार निघून जात तोपर्यंत अब्याथार वर राहिला.
25राजा सादोकास म्हणाला, “देवाचा कोश नगरात परत घेऊन जा; परमेश्वराची कृपादृष्टी माझ्यावर झाली तर तो मला परत आणील आणि हा कोश व आपले मंदिर मला पुन्हा दाखवील;
26पण मी तुझ्यावर आता प्रसन्न नाही असे तो म्हणाल्यास, पाहा, मी येथे हजर आहे, त्याच्या मर्जीस वाटेल तसे त्याने माझे करावे.”
27राजा सादोक याजकाला म्हणाला, “तू द्रष्टा आहेस ना? तू नगरात सुखरूप परत जा, आणि तुमच्याबरोबर तुमच्या दोन्ही पुत्रांनी म्हणजे तुझा पुत्र अहीमास आणि अब्याथाराचा पुत्र योनाथान ह्यांनीही जावे.
28पाहा, तुमच्याकडून मला काही संदेश येईपर्यंत मी रानामध्ये नदीच्या उतारानजीक थांबतो.”
29तेव्हा सादोक व अब्याथार ह्यांनी देवाचा कोश परत यरुशलेमेला नेला व ते जाऊन तेथे राहिले.
30दावीद जैतून पर्वताचा चढाव चढून गेला; तो रडत रडत वर चढून गेला; आपले मस्तक झाकून तो अनवाणी चालला; त्याच्याबरोबरची सर्व माणसे आपली मस्तके झाकून रडत रडत वर चढून गेली.
31कोणी दाविदाला सांगितले की, “अहिथोफेल हाही बंडखोरांना सामील होऊन अबशालोमाबरोबर आहे.” हे ऐकून दावीद म्हणाला, “हे परमेश्वरा, अहीथोफेलाची मसलत फोल कर.”
32डोंगराच्या माथ्यावर ज्या ठिकाणी देवाची आराधना करीत असत तेथे दावीद जाऊन पोहचला, तेव्हा हूशय अर्की त्याला भेटायला आला; त्याचा अंगरखा फाटलेला होता व त्याच्या डोक्यात धूळ घातलेली होती.
33दावीद त्याला म्हणाला, “तू माझ्याबरोबर आलास तर मला तू भार मात्र होशील.
34तर तू नगरात परत जाऊन अबशालोमाला म्हण, ‘महाराज, मी आपला दास होतो; पूर्वी जशी मी आपल्या पित्याची नोकरी केली तशी मी आता आपली नोकरी करतो;’ असे केल्याने तू माझ्यासाठी अहीथोफेलाची मसलत निष्फळ करशील.
35तेथे तुझ्याबरोबर सादोक व अब्याथार याजक हे असणार नाहीत काय? जी काही बातमी तुला राजमंदिरातून मिळेल ती तू सादोक व अब्याथार याजकांना कळव.
36पाहा, त्यांच्याबरोबर त्यांचे दोन पुत्र म्हणजे सादोकाचा पुत्र अहीमास व अब्याथाराचा पुत्र योनाथान हेही आहेत; जे काही तुमच्या कानी पडेल ते त्यांच्या हस्ते मला सांगून पाठव.”
37तेव्हा दाविदाचा मित्र हूशय नगरात गेला; अबशालोमही यरुशलेमेत दाखल झाला.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Videos for २ शमुवेल 15