YouVersion Logo
Search Icon

२ शमुवेल 11

11
दावीद आणि बथशेबा
1राजे लोक युद्धांच्या मोहिमेस जातात त्या वेळी म्हणजे वर्षारंभी दाविदाने यवाबाला व त्याच्याबरोबर त्याच्या नोकरचाकरांना व सर्व इस्राएल लोकांना पाठवले; त्यांनी अम्मोन्यांचा संहार करून राब्बा नगरास वेढा घातला; पण दावीद यरुशलेमेतच राहिला.
2संध्याकाळच्या वेळी दावीद पलंगावरून उठून राज-मंदिराच्या गच्चीवर जाऊन फिरू लागला; तेव्हा एक स्त्री स्नान करताना त्याने तेथून पाहिली; ती स्त्री दिसायला फार सुंदर होती.
3मग दाविदाने चाकर पाठवून त्या स्त्रीविषयी विचारपूस केली; तेव्हा कोणी म्हटले, “ती अलीयामाची कन्या व उरीया हित्ती ह्याची बायको बथशेबा आहे ना?”
4तेव्हा दाविदाने जासूद पाठवून तिला बोलावून आणले, ती दाविदाकडे आली आणि दाविदाने तिच्याशी समागम केला; (ती आपल्या अशुद्धतेपासून शुद्ध झाली होती.) मग ती आपल्या घरी गेली.
5त्या स्त्रीला गर्भ राहिला; तेव्हा तिने दाविदाला निरोप पाठवून सांगितले, ‘मी गरोदर आहे.’ 6दाविदाने यवाबाला निरोप पाठवला की, “उरीया हित्ती ह्याला माझ्याकडे पाठवून द्या.” तेव्हा यवाबाने त्याला दाविदाकडे पाठवले.
7उरीया दाविदाकडे आला तेव्हा त्याने त्याला यवाब व त्याचे लोक कसे काय आहेत आणि युद्ध कसे चालले आहे हे विचारले.
8मग दावीद उरीयाला म्हणाला, “आपल्या घरी जा व हातपाय धू,” उरीया राजमंदिरातून निघाला व त्याच्या पाठोपाठ राजाकडून त्याला काही इनाम गेले.
9उरीया आपल्या स्वामीच्या इतर सर्व चाकरांबरोबर राजवाड्याच्या दारीच निजून राहिला, आपल्या घरी गेला नाही.
10उरीया आपल्या घरी गेला नाही हे दाविदाने ऐकले तेव्हा तो त्याला म्हणाला, “तू प्रवास करून आला आहेस ना? तर तू आपल्या घरी का जात नाहीस?”
11उरीया दाविदाला म्हणाला, “कोश, इस्राएल व यहूदा मांडवात राहत आहेत आणि माझा धनी यवाब व माझ्या धन्याचे सेवक खुल्या मैदानात तळ देऊन आहेत; असे असताना मी घरी जाऊन खाऊपिऊ आणि आपल्या स्त्रीबरोबर निजू काय? आपल्या जीविताची शपथ, आपल्या प्राणाची शपथ, मी असले काम करणार नाही.”
12दावीद उरीयाला म्हणाला, “आजही येथेच राहा; उद्या मी तुला रवाना करीन.” मग उरीया त्या दिवशी व दुसर्‍या दिवशीही यरुशलेमेत राहिला.
13दाविदाने बोलावल्यावरून त्याने येऊन त्याच्यासमोर खाणेपिणे केले व त्याला त्याने दारू पाजून मस्त केले. संध्याकाळ झाली तेव्हा तो आपल्या स्वामीच्या सेवकांबरोबर आपल्या खाटेवर निजायला गेला, पण घरी गेला नाही.
14सकाळी दाविदाने यवाबाच्या नावे पत्र लिहून उरीयाच्या हाती पाठवले.
15त्या पत्रात असे लिहिले होते की, “तुंबळ युद्धाच्या तोंडी उरीयाला ठेवा; आणि त्याला तेथेच सोडून मागे हटा; म्हणजे त्याला मार लागून तो मरेल.”
16मग यवाबाने नगराची चांगली टेहळणी करून जेथे शूर योद्धे असल्याचे त्याला माहीत होते तेथे उरीयाला नेमले.
17मग नगरातील पुरुषांनी बाहेर पडून यवाबाशी युद्ध केले; तेव्हा दाविदाच्या सेवकांपैकी काही कामास आले आणि उरीया हित्ती हाही गतप्राण झाला.
18मग यवाबाने जासूद पाठवून दाविदाला युद्धाचा सर्व अहवाल कळवला;
19त्याने जासुदास आज्ञा केली की, “तू युद्धाची सर्व हकिकत राजाला कळवल्यावर,
20राजा जर संतापून म्हणाला की, ‘तुम्ही त्या नगराच्या एवढे जवळ जाऊन का युद्ध केले? शत्रू तटावरून बाण सोडतील हे तुम्हांला ठाऊक नव्हते काय?
21यरुब्बेशेथाचा पुत्र अबीमलेख ह्याला कोणी मारले? तेबेसात त्याच्यावर एका बायकोने कोटावरून जात्याची वरची तळी टाकून त्याचा प्राण घेतला की नाही? तर तुम्ही तटाच्या एवढे जवळ का गेलात?’ तेव्हा त्याला तू एवढेच सांग की, ‘आपला सेवक उरीया हित्ती हाही मृत्यू पावला.”’
22तेव्हा जासुदाने जाऊन यवाबाचा सर्व निरोप निवेदन के ला.
23जासूद दाविदाला म्हणाला, “ते लोक आमच्यावर प्रबळ होऊन मैदानात आमच्यावर चालून आले, व आम्ही त्यांना वेशीपर्यंत हटवले.
24मग तिरंदाजांनी तटावरून आपल्या सेवकांवर बाण सोडले; राजाचे कित्येक लोक कामास आले व आपला सेवक उरीया हित्ती हाही कामास आला.”
25दावीद त्या जासुदाला म्हणाला, “तू जाऊन यवाबाला सांग, ह्यावरून तू उदास होऊ नकोस, कारण तलवार दोन्ही पक्षांचा सारखाच संहार करते, तर तू अधिक नेटाने त्या नगराशी लढून त्याचा विध्वंस कर; ह्या प्रकारे तू त्याला हिंमत दे.”
26आपला नवरा उरीया मृत्यू पावला आहे असे उरीयाच्या स्त्रीने ऐकले तेव्हा ती नवर्‍यासाठी शोक करू लागली.
27तिचे सुतक संपल्यावर दाविदाने लोक पाठवून तिला आपल्या घरी बोलावून आणून ठेवून घेतले व ती त्याची स्त्री झाली. पुढे तिला पुत्र झाला; पण दाविदाने हे जे कृत्य केले त्यावरून परमेश्वराची त्याच्यावर इतराजी झाली.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in