YouVersion Logo
Search Icon

२ राजे 24

24
1यहोयाकीमाच्या कारकिर्दीत बाबेलचा राजा नबुखद्नेसर ह्याने स्वारी केली; यहोयाकीम तीन वर्षे त्याचा अंकित होऊन राहिला; मग त्याने त्याच्यावर उलटून बंड केले.
2परमेश्वराने आपले सेवक संदेष्टे ह्यांच्या द्वारे सांगितलेल्या वचनाप्रमाणे यहूदाचा नाश करावा म्हणून त्याच्यावर खास्दी, अरामी, मवाबी व अम्मोनी ह्यांच्या टोळ्या पाठवल्या.
3यहूदी लोकांना आपल्यासमोरून घालवावे म्हणून नि:संशय हे सर्व परमेश्वराच्या आज्ञेने यहूदावर आले; मनश्शेने केलेल्या सर्व पापकर्मांमुळे व त्याने निरपराध जनांचा रक्तपात केल्यामुळे असे झाले.
4त्याने यरुशलेम निरपराध जनांच्या रक्ताने भरून टाकले म्हणून परमेश्वर क्षमा करीना.
5यहोयाकीमाच्या बाकीच्या कृत्यांचे व त्याने जे काही केले त्या सर्वांचे वर्णन यहूदाच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय?
6यहोयाकीम आपल्या पितरांजवळ जाऊन निजला व त्याच्या जागी त्याचा पुत्र यहोयाखीन राजा झाला.
7मिसर देशाचा राजा कधी आपला देश सोडून बाहेर पडला नाही, कारण मिसर देशाच्या नाल्यापासून महानद फरात येथवर जो सर्व मुलूख मिसरी राजाचा होता तो बाबेलच्या राजाने काबीज केला होता.
यहोयाखीन आणि त्याचे सरदार ह्यांना कैद करून बाबेलास नेण्यात येते
(२ इति. 36:9-10)
8यहोयाखीन राज्य करू लागला तेव्हा तो अठरा वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत तीन महिने राज्य केले; त्याच्या आईचे नाव नेहूष्टा; ती यरुशलेमेच्या एलनाथानाची कन्या.
9त्याने आपल्या बापाच्या करणीप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते केले.
10त्याच्या कारकिर्दीत बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याच्या सेवकांनी यरुशलेमेवर स्वारी करून नगराला वेढा दिला.
11बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याच्या सेवकांनी नगराला वेढा घातला असताना तो स्वतः तेथे आला;
12तेव्हा यहूदाचा राजा यहोयाखीन आपली आई, सेवक, सरदार व खोजे ह्यांना बरोबर घेऊन बाबेलच्या राजाकडे गेला; बाबेलच्या राजाने आपल्या कारकिर्दीच्या आठव्या वर्षी त्याला पकडले.
13मग त्याने परमेश्वराच्या मंदिरात व राजवाड्यात ठेवलेले सारे धन लुटून नेले; शलमोन राजाने जी सोन्याची पात्रे करून परमेश्वराच्या मंदिरात ठेवली होती ती सर्व फोडून त्यांचे त्याने तुकडे केले; तसे होणार हे परमेश्वराने सांगितलेच होते.
14त्याने अवघे यरुशलेम म्हणजे सर्व सरदार, सर्व पराक्रमी वीर मिळून एकंदर दहा हजार लोक आणि सर्व कारागीर व लोहार ह्यांना कैद करून नेले; देशात अगदी कंगाल लोकांखेरीज कोणी राहिले नाही.
15त्याने यहोयाखीनास बाबेलास नेले; राजाची आई, राजाच्या स्त्रिया, खोजे व देशातील मोठमोठे लोक ह्यांना त्याने कैद करून यरुशलेमेहून बाबेलास नेले.
16एकंदर सात हजार धट्टेकट्टे लोक आणि एक हजार कारागीर व लोहार बाबेलच्या राजाने कैद करून बाबेलास नेले; हे सारे युद्धास लायक व बळकट होते.
17बाबेलच्या राजाने त्याच्या जागी त्याचा चुलता मत्तन्या ह्याला राजा केले; त्याने त्याचे नाव बदलून सिद्कीया असे ठेवले.
सिद्कीयाची कारकीर्द
(२ इति. 36:11-16; यिर्म. 52:1-3)
18सिद्कीया राज्य करू लागला तेव्हा तो एकवीस वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत अकरा वर्षे राज्य केले; त्याच्या आईचे नाव हमूटल; ती लिब्ना येथील यिर्मया ह्याची कन्या.
19यहोयाकीमाप्रमाणे त्याचे वर्तन असून परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले.
20परमेश्वराच्या कोपामुळे यरुशलेम व यहूदा ह्यांची अशी दशा झाली की शेवटी त्याने त्यांना आपल्या दृष्टीआड केले. आणि सिद्कीयाने बाबेलच्या राजाविरुद्ध बंड केले.

Currently Selected:

२ राजे 24: MARVBSI

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in