२ करिंथ 6
6
1आम्ही त्याच्यासह कार्य करता करता विनंती करतो की, तुम्ही देवाच्या कृपेचा स्वीकार व्यर्थ होऊ देऊ नये;
2(कारण तो म्हणतो :
“अनुकूल समयी मी तुझे ऐकले,
व तारणाच्या दिवशी मी तुला साहाय्य केले.”
पाहा, आताच ‘समय अनुकूल आहे;’ पाहा, आताच ‘तारणाचा दिवस’ आहे.)
3आम्ही करत असलेल्या सेवेत काही दोष दिसून येऊ नये म्हणून आम्ही कोणत्याही प्रकारे अडखळण्यास कारण होत नाही;
4तर सर्व गोष्टींत देवाचे सेवक म्हणून आम्ही आपली लायकी पटवून देतो; फार धीराने, संकटांत, विपत्तींत, पेचप्रसगांत,
5फटके खाण्यात, बंदिवासांत, दंग्याधोप्यांत, काबाडकष्टांत, जागरणांत, उपवासांत;
6तसेच शुद्धतेने, ज्ञानाने, सहनशीलतेने, ममतेने; पवित्र आत्म्याने, निष्कपट प्रीतीने,
7सत्याच्या वचनाने, देवाच्या सामर्थ्याने; आणि उजव्या व डाव्या हातातील नीतिमत्त्वाच्या शस्त्रास्त्रांनी,
8गौरवाने व अपमानाने, अपकीर्तीने व सत्कीर्तीने, आम्ही आपली लायकी पटवून देतो; फसवणारे मानलेले तरी आम्ही खरे;
9अप्रसिद्ध मानलेले तरी सुप्रसिद्ध; ‘मरणोन्मुख’ असे मानलेले तरी पाहा, ‘आम्ही जिवंत आहोत;’ ‘शिक्षा भोगणारे’ असे मानलेले ‘तरी जिवे मारलेले नाही;’
10दु:खी मानलेले तरी सर्वदा आनंद करणारे; दरिद्री मानलेले तरी पुष्कळांना सधन करणारे; कफल्लक असे मानलेले तरी सर्ववस्तुसंपन्न, अशी आम्ही आपली लायकी पटवून देतो.
मनाचे औदार्य दाखवावे म्हणून विनंती
11अहो करिंथकरांनो, तुमच्याबरोबर बोलण्यास आमचे तोंड मोकळे झाले आहे, आमचे ‘अंत:करण विशाल झाले आहे.’
12संकुचित अंत:करणाविषयी म्हणाल तर, तुमचीच अंत:करणे संकुचित आहेत; आमची नाहीत.
13तेव्हा तुम्हांला आपली मुले समजून मी असे सांगतो की, तुम्हीही आमची परतफेड करण्यासाठी आपली अंत:करणे तशीच विशाल करा.
देवभक्त नसलेल्यांशी मैत्री करू नये म्हणून इशारा
14तुम्ही विश्वास न ठेवणार्यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका; कारण नीती व स्वैराचार ह्यांची भागी कशी होणार? उजेड व अंधार ह्यांचा मिलाफ कसा होणार?
15ख्रिस्ताची बलियाराशी1 एकवाक्यता कशी होणार? विश्वास ठेवणारा व विश्वास न ठेवणारा हे वाटेकरी कसे होणार?
16देवाच्या मंदिराचा मूर्तींबरोबर मेळ कसा बसणार? आपण तर जिवंत देवाचे मंदिर आहोत; देवाने असे म्हटले आहे की,
“‘मी त्यांच्यामध्ये वास करून राहीन.
मी त्यांचा देव होईन, व ते माझे लोक होतील.’
17म्हणून
‘त्यांच्यामधून निघा व वेगळे व्हा,’
असे प्रभू म्हणतो,
‘आणि जे अशुद्ध त्याला शिवू नका;
म्हणजे मी तुम्हांला स्वीकारीन;’
18आणि मी तुम्हांला ‘पिता असा होईन,’
तुम्ही ‘मला पुत्र’ व कन्या असे व्हाल,
‘असे सर्वसमर्थ प्रभू म्हणतो.”
Currently Selected:
२ करिंथ 6: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.