२ करिंथ 3
3
ख्रिस्तानुयायीच पौलाची शिफारसपत्रे आहेत
1आम्ही पुन्हा आपली वाखाणणी करू लागलो आहोत काय? अथवा जशी कित्येकांना लागतात तशी आम्हांला तुमच्यासाठी किंवा तुमच्यापासून शिफारसपत्रे पाहिजेत काय?
2तुम्हीच आमचे पत्र, आमच्या अंत:करणांवर लिहिलेले, सर्व माणसांना कळलेले आणि त्यांनी वाचलेले असे आहात;
3शाईने नव्हे, तर सदाजीवी देवाच्या आत्म्याने कोरलेले, दगडी पाट्यांवर नव्हे तर ‘मांसमय अंत:करणरूपी पाट्यांवर’ ‘कोरलेले’, आमच्या सेवेच्या योगे तयार झालेले ख्रिस्ताचे पत्र, असे तुम्ही प्रसिद्ध आहात.
4आम्हांला ख्रिस्ताच्या द्वारे देवासंबंधी असा भरवसा आहे.
5आम्ही स्वत: कोणतीही गोष्ट आपण होऊनच ठरवण्यास समर्थ आहोत असे नव्हे, तर आमच्या अंगची पात्रता देवाकडून आलेली आहे;
6त्यानेच आम्हांला नव्या कराराचे सेवक होण्यासाठी समर्थ केले; तो करार लेखी नव्हे, तर आध्यात्मिक आहे; कारण लेख जिवे मारतो, परंतु आत्मा जिवंत करतो.
नियमशास्त्रवैभवापेक्षा शुभवृत्तवैभव अधिक तेजस्वी
7जिचा लेख दगडांवर कोरलेला असून जिचे पर्यवसान मृत्यूत होत असे ती सेवा एवढी तेजस्वी होती की ‘मोशेच्या चेहर्याचे तेज’ नाहीसे होत चालले असूनही इस्राएल लोकांना जर त्याच्या चेहर्याकडे टक लावून पाहवेना,
8तर आध्यात्मिक सेवा विशेषेकरून तेजस्वी होणार नाही काय?
9कारण ज्या सेवेचा परिणाम दंडाज्ञा ती जर तेजोमय होती, तर जिचा परिणाम नीतिमत्त्व ती किती विशेषेकरून अधिक तेजोमय असणार.
10इतकेच नव्हे, तर ‘जे तेजस्वी होते ते’ ह्या तुलनेत अपरंपार तेजापुढे तुलनेने ‘तेजोहीन ठरले’.
11नष्ट होत चाललेले जर तेजयुक्त आहे, तर जे शाश्वत ते कितीतरी अधिक तेजस्वी असणार.
12तर मग आम्हांला अशी आशा असल्यामुळे आम्ही फार धिटाईने बोलतो;
13इस्राएल लोकांनी जे नाहीसे होत चालले होते त्या तेजाकडे एकसारखी दृष्टी लावू नये ‘म्हणून मोशे आपल्या मुखावर आच्छादन घालत असे,’ तसे आम्ही करत नाही.
14परंतु त्यांची मने कठीण झाली; कारण जुना करार वाचून दाखवण्यात येतो तेव्हा तेच आच्छादन आजपर्यंत तसेच न काढलेले राहते; ते ख्रिस्तामध्ये नाहीसे होते.
15आजपर्यंत मोशेचा ग्रंथ वाचून दाखवण्यात येतो तेव्हा त्यांच्या अंत:करणावर आच्छादन राहते;
16परंतु त्यांचे अंत:करण प्रभूकडे वळले म्हणजे ‘आच्छादन काढले जाते.’
17प्रभू आत्मा आहे;1 आणि जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळीक आहे.
18परंतु आपल्या मुखांवर आच्छादन नसलेले आपण सर्व जण आरशाप्रमाणे ‘प्रभूच्या वैभवाचे’ प्रतिबिंब पाडत आहोत;2 आणि प्रभू जो आत्मा त्याच्या द्वारे, तेजस्वितेच्या परंपरेने, आपले रूपांतर होत असता आपण त्याच्याशी समरूप होत आहोत.
Currently Selected:
२ करिंथ 3: MARVBSI
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.